Wednesday, February 5, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजतिसऱ्या प्रयत्नात न्युझीलंड...

तिसऱ्या प्रयत्नात न्युझीलंड महिला संघाची बाजी!

दुबईत झालेल्या महिलांच्या ९व्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्युझीलंड महिला संघाने नवा इतिहास रचताना अखेर तिसऱ्या प्रयत्नात जेतेपदाला गवसणी घातली. याअगोदर २००९ आणि २०१० या दोन विश्वचषक स्पर्धेत न्युझीलंड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २००९च्या पहिल्या स्पर्धेत त्यांना इंग्लंडकडून हार खावी लागली होती. तर २०१०च्या स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाने त्यांना नमवले होते. अखेर १४ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर जगज्जेतेपदाचे न्युझीलंड महिला क्रिकेट संघाचे स्वप्न पूर्ण झाले, असेच म्हणावे लागेल.

आतापर्यंत त्यांच्या पुरुष क्रिकेट संघाला कुठलीच विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकता आली नाही. त्यांच्या महिला संघाने मात्र आता पुरुष संघाला याबाबत चक्क मागे टाकण्याचा आगळा पराक्रम केला. तेव्हा त्यांच्या पुरूष संघाने महिला संघाकडून जेतेपदाचा धडा गिरवायला हरकत नाही. रविवार, २० ऑक्टोबर हा दिवस न्युझीलंड क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला. त्यांच्या पुरुष संघाने बेंगळुरू येथे झालेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ७ गडी राखून शानदार विजय मिळवला. तब्बल ३६ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा न्युझीलंड संघाने भारतभूमीत भारताला नमविण्याचा पराक्रम केला. तर त्यांच्या महिला संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकून दुहेरी धमाका उडवून दिला.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी न्युझीलंड संघ जेतेपदाच्या शर्यतीत कुठेच नव्हता. स्पर्धेला येण्याअगोदर तब्बल १० सामन्यांत न्युझीलंड संघ पराभूत झाला होता. त्यामुळे त्यांच्याकडुन विजेतेपदाची फारशी अपेक्षा कोणी बाळगली नव्हती. परंतु विश्वचषक स्पर्धेत मात्र चक्क विजेतेपदावर कब्जा करून न्युझीलंड संघाने चांगलीच खळबळ माजवली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. न्युझीलंड संघाने ही स्पर्धा जिंकल्यामुळे आता महिला किकेटविश्वाला नवा जगज्जेता मिळाला. या स्पर्धेत न्युझीलंड संघाने आपला खेळ चांगलाच ऊंचावला. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली झाली, तर क्षेत्ररक्षणदेखील चांगलेच ऊच्च दर्जाचे होते. काही सामने तर न्युझीलंडने अफलातून क्षेत्ररणाच्या जोरावर जिंकले.

निर्णायक लढतीत पराभूत होणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा दुदैवी ठरला. याअगोदर अमेरिकेत झालेल्या पुरुषांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्यांच्या संघाला भारताकडून हार खावी लागली होती. महत्त्वाच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ मोक्याचा क्षणी नांगी टाकतो हा इतिहास होऊन बसलाय. त्यामुळे त्यांच्यामागे चोकर्सची बिरुदावली चिकटली. आता दुर्दैवाने त्याच्या महिला संघाबाबतदेखील तसेच समीकरण होऊ लागले आहे. गतवर्षीदेखील महिलांच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. यंदाच्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत करून गेल्यावेळच्या पराभवाचा बदला घेतला. परंतु यंदा अंतिम सामन्यात त्यांनी‌ न्युझीलंड संघाकडून शरणागती पत्करली.

विजयासाठी १५९ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर होते. परंतु त्यांना २० षटकात ९ बाद १२६ धावांची मजल मारली आली. नाणेफेक जिंकून प्रथम न्युझीलंडला फलंदाजी देण्याचा आफ्रिकन कर्णधाराचा निर्णय चुकला. न्युझीलंडने २० षटकात ५ बाद १५८ धावांची चांगली मजल मारली. त्यांच्या कारने सर्वाधिक ४३ धावा केल्या तर ब्रुकने ३८ धावा केल्या. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्यामुळे न्युझीलंडला १५० धावांचा टप्पा ओलांडता आला. १५९ धावांचे विजयी लक्ष्य घेऊन उतरणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. कर्णधार लॉरा-तांझिमने ५१ धावांची भागीदारी केली. ७व्या षटकात तांझिम बाद झाली. तर त्यानंतर १०व्या षटकात कर्णधार लॉरा बाद झाली. तेथूनच दक्षिण आफ्रिकेची पडझड सुरु झाली. १६ षटकांत ६ बाद १०० धावा अशी आफ्रिकेची घसरगुंडी उडाली. शेवटचे ३ फलंदाज २७ धावांतच माघारी परतले. तेथेच त्यांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. न्युझीलंडतर्फे मेर आणि केरने सुरेख मारा करताना प्रत्येकी ३ बळी टिपले. अंतिम सामन्यात अष्टपैलू खेळ करणारी केर त्यांच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने या स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाची छान चमक दाखवून ६ सामन्यांत १५ बळी घेताना १३५ धावादेखील फटकावल्या. तिला स्पर्धेतील आणि अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

केरने या स्पर्धेत सर्वाधिक १५ बळी घेऊन नव्या विक्रमाचीदेखील नोंद केली. तिने अगोदरचा इंग्लंडची अॅना आणि ऑस्ट्रेलियाची मेगन या दोघांचा प्रत्येकी १३ बळींचा विक्रम मोडीत काढला. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विक्रमी ६वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली. आतापर्यंत झालेल्या या स्पधेत केवळ तिसऱ्यांदा ऑस्टेलियाच्या संघाला अंतिम फेरी गाठता आली नाही. ७४ धावांची जबरदस्त खेळी करणारी बॉश त्यांच्या विजयाची शिल्पकार होती. तिने ४८ चेंडू खेळताना ६ चौकार आणि १ षटकार मारले. तिने लॉरासोबत ९६ धावांची दुसऱ्या विकेटसाठी भक्कम भागिदारी करुन आफ्रिकेचा विजय निश्चित केला. ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी देण्याचा आफ्रिकेचा निर्णय यशस्वी ठरला. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करुन ऑस्ट्रेलियाला १३४ धावात रोखण्यात यश मिळवले. त्यांच्या मुनीने सर्वाधिक ४४ धावा केल्या. आफ्रिकेच्या सोकाने सुरेख गोलंदाजी करताना २ बळी टिपले.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्युझीलंडने माजी विजेत्या विंडीजला पराभूत केले. “अ” गटात ऑस्ट्रेलियाने पहिला आणि न्युझीलंडने दुसरा क्रमांक मिळवला होता. तर “ब” गटात सरस धावगतीच्या जोरावर विंडीजने पहिला आणि आफ्रिकेने दुसरा क्रमांक मिळवला होता. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात आपले चारही सामने जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ होता. भारतीय संघाकडून स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात होती. परंतु भारतीय संघाने सुमार दर्जाचा खेळ करुन भारतीय क्रिकेटप्रेमींची चांगलीच निराशा केली. बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडकडून भारतीय संघ पराभूत झाला. दुबळ्या पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध भारताने विजय मिळवला. परंतु ते विजय स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी पुरेसे नव्हते. त्यात भारतीय संघाची धावगतीदेखील चांगली नव्हती. भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी फारशी चांगली झाली नाही. त्यातच सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका भारतीय संघाला बसला.

आता कर्णधार हरमनप्रीत सिंगला या जबाबदारीतून मुक्त करण्याची वेळ आली आहे. गेली २-३ वर्षे भारतीय संघाची कामगिरी चांगलीच खालावली आहे. त्यामुळे नव्याने संघबांधणी करण्याची गरज आहे. अगोदर ठरल्याप्रमाणे ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती. परंतु तेथील अस्थिरतेचे वातावरण बघून ही स्पर्धा शेवटच्या क्षणी दुबईत हलवण्याचा निर्णय आयसीसीने घेतला. स्पर्धेतील चुरशीच्या सामन्यांनी स्पर्धेची रंगत वाढवली. ऑस्ट्रेलियाचा अपवाद वगळता उपांत्य फेरीत कोणते तीन संघ जाणार याचा फैसला गटातील शेवटचे सामने होईपर्यंत निश्चित नव्हते. त्यामुळे स्पर्धा किती चुरशीची झाली याची कल्पना आपल्याला येते. न्युझीलंडचा हा विजय त्याच्या महिला संघासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे न्युझीलंडमध्ये आता महिला क्रिकेट अधिक जोर धरेल अशी आशा करुया. भविष्यात न्युझीलंड महिला संघ अशीच दमदार सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखण्यात कितपत यशस्वी ठरेल ते आता बघायचे.

Continue reading

ही तर मुंबईला पत्करावी लागलेली नामुष्कीच!

विक्रमी ४२ वेळा भारतीय क्रिकेट विश्वातील मानाची समजली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई क्रिकेट संघावर यंदाच्या मोसमातील या स्पर्धेतील अ गटातील ६व्या फेरीतील लढतीत दुबळ्या जम्मू काश्मिर संघाविरुद्ध आपल्याच वांद्रे संकुलातील स्टेडियममध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे...

अखेर जागतिक खो-खो स्पर्धेचे बिगुल वाजले!

गेली अनेक वर्षे भारतीय खो-खो प्रेमी ज्या जागतिक खो-खो स्पर्धेची वाट पाहत होते, अखेर त्याची पूर्तता अखिल भारतीय खो-खो महासंघाने करुन दाखविली. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्यावहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करुन आता या खेळाला जागतिक...

कांबळे कुटुंबियांनी उचलले मर्दानी खेळ जिवंत ठेवण्याचे शिवधनुष्य

पारंपरिक शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळ जिवंत ठेवण्याचे मोलाचे कार्य गेली अनेक वर्षे रत्नागिरी येथील कांबळे कुटुंबीय करत आहेत. दिवंगत महादेव व्यायामशाळा वेतोशी, रत्नागिरीच्या माध्यमातून हे कार्य गेली अनेक वर्षे सुरु आहे. सध्या या कार्याचा वारसा वस्ताद सुधीर कांबळे यांनी...
Skip to content