डिजिटल रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन अँड अॅडव्हाईझरी प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर डॉटकॉमच्या अलीकडच्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत देशभरातील आठ प्रमुख बाजारपेठांमध्ये घरांची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत १९%ने कमी झाली. त्याचे कारण आहे मालमत्तेच्या वाढत्या किंमती. मालमत्तेच्या वाढत्या किंमतींमुळे मुंबई, पाण्यातली घरांचे नवीन प्रकल्पही रखडले. मंदावलेल्या वृद्धीमुळे खरेदीदारही सावधगिरी बाळगून आहेत.
हाऊसिंग डॉटकॉमचे स्वामित्व ज्यांच्याकडे आहे त्या आरईए इंडियाचाच एक भाग असलेल्या प्रॉपटायगर डॉटकॉमने सादर केलेल्या रिअल इनसाइट रेसिडेन्शियल: क्यू१ २०२५ (जानेवारी-मार्च २०२५) अहवालानुसार या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नवीन घरांचा पुरवठादेखील १०%नी कमी झाला आहे, कारण विकासकांनी गेल्या काही वर्षांमधील किंमतीत झालेल्या नाट्यमय वृद्धीनंतर स्वतःच्या अपेक्षाही वाढवल्या. परिणामी जगातील सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या आपल्या देशात मोठ्या भागाच्या खरेदीदारांसाठी घर खरेदी करणे परवडण्याजोगे राहिले

नाही. हाऊसिंग डॉटकॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे ग्रुप चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ध्रुव अग्रवाल म्हणाले की, वाढत्या महागाईचा विपरीत परिणाम विक्रीवर आधीच दिसू लागला आहे. त्यात जागतिक ट्रेड-वॉरमुळे नवीन अनिश्चितता आली आहे. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की, खरेदीदार गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगत आहेत आणि विशेष करून रिअल इस्टेटसारख्या मोठ्या गुंतवणुकीबाबतीत ते अधिकच सावध झाले आहेत. जर भारतीय रिझर्व बँकेने रेपो रेट पाव टक्क्यांनी कमी केल्याचे जाहीर केले नसते, तर विक्रीतील ही घट अधिकच तीव्र झाली असती.
या अहवालानुसार, जानेवारी-मार्च या तिमाहीत १००,००० पेक्षा कमी घरे विकली गेली. या विश्लेषणात समाविष्ट करण्यात आलेल्या बहुतांशी शहरांत ही संख्या घटल्याचे दिसते. बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये हा ट्रेंड दिसला नाही तर हैदराबाद, मुंबई आणि पुण्यात ही विक्री तीव्रतेने कमी झालेली दिसली. बेंगळुरूमध्ये २०२४च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ११,७३१ घरांच्या विक्रीसह १३%ची वाढ पाहायला मिळाली. चेन्नईमध्येही ४,७७४ घरांच्या विक्रीसह ८%ची वाढ झाली. या तुलनेत इतर प्रमुख शहरांत घरांच्या विक्रीत घसरण झालेली पाहायला मिळाली. यात अहमदाबाद १०,७३० (-१७%), दिल्ली एनसीआर ८४७७ (-१६%), हैदराबाद १०,४६७ (-२६%), कोलकाता ३,८०३ (-१%), मुंबई ३०,७०५ (-२६%) आणि पुणे १७,२२८ (-२५) येथे घरांची विक्री मंदावलेली दिसली.
मार्केट करेक्शनचे संकेत नवीन पुरवठ्यात जी घट आली आहे त्यातूनदेखील दिसत होते. आठपैकी पाच शहरांतील नव्या घरांच्या लॉन्चच्या संख्येत वार्षिक घट दिसून आली. पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादेत संख्येच्या दृष्टीने सर्वात तीव्र घसरण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये २०२४च्या तुलनेत नवीन लॉन्च झालेल्या घरांच्या संख्येत क्रमशः १५,५४३ (-३८%), १०,१५६ (-३३%), २,३८४ (-२३%)ची घट झाली आहे. इतर प्रमुख शहरे जसे की, चेन्नई ४,०७० (-१४%), मुंबई ३१,३२२ (-१५%) येथेही नवीन प्रकल्पात घट झाली असल्याचे पाहायला मिळाले. याउलट बेंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि कोलकाता येथे मात्र नवीन लॉन्च प्रकल्पात वाढ झाली आहे. ही वाढ क्रमशः १८,१८३ (८२%), ७,९५२ (१६%) आणि ३,५३४ (१३८%) इतकी आहे.