राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. कोणतीही रिस्क न घेता महायुतीतील भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील पक्ष पराभूत मनोवृत्तीने निवडणुका लढवत होते. मात्र या निवडणुका भाजप विरुद्ध शिवसेना आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशाच पाहयला मिळाल्या. भाजपमधील स्थानिक राजकारणाचा फटका विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला बसला. मंत्रीपदापासून वंचित राहिलेले भाजपचे फायरब्रँड नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली नाराजी माध्यमांसमोर स्पष्ट केली. मुनगंटीवार यांनी माध्यमांमार्फत घरचा आहेर दिल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ माजली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुनगंटीवार यांनी पक्षातले वास्तव मांडल्यामुळे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची फारच गोची झाली.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीकडे पूर्ण दुर्लक्ष केले. सध्या त्यांचे टार्गेट मुंबई महानगरपालिका असल्याने त्यांनी राज्यातील या महत्त्वाच्या निवडणुकांकडे दुर्लक्ष केले. परंतु यामुळे उर्वरित महाराष्ट्रात पक्षसंघटना खिळखिळी झाली. काँग्रेसला या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. भाजपला न मिळणारी मते यावेळी पर्याय म्हणून काँग्रेसकडे वळली. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे पर्याय नाकारले. त्याचप्रमाणे प्रस्थापित मंत्री आणि नेत्यांना या निवडणुकीत चांगलाच फटका बसला. गरजेपेक्षा कोकणात जास्त लक्ष देणारे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेने चांगला धडा शिकवला. सिंधुदुर्गातून खासदार नारायण राणे आणि रत्नागिरीत उदय सामंत आणि रामदास कदम यांना आव्हान देणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना या निकालातून धडा मिळाला. रायगडमध्ये अहंकाराचा दर्प चढलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सर्व विरोधकांनी मिळून धडा शिकवला. श्रीवर्धनमध्ये तर दोन्ही शिवसेना तटकरे यांना धडा शिकवण्यासाठी एकत्र आल्या. श्रीवर्धनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मंत्री भरत गोगावले यांनी मदत केली. त्यामुळे महाड, श्रीवर्धन हे दोन महत्त्वाचे बालेकिल्ले तटकरे यांच्या हातातून निसटले. फक्त रोहा नगरपरिषद तटकरे यांच्या ताब्यात राहिली. कर्जत नगरपरिषद महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात येते. कर्जत आणि खोपोली या दोन्ही महत्त्वाच्या नगरपरिषदा तटकरे यांनी आपल्या ताब्यात घेऊन थोरवे यांना धडा शिकवला.

सिंधुदुर्गात कणकवली आणि मालवण या नगरपरिषदा राणे कुटुंबियांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या नगरपरिषदा जिंकून शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेतला. परंतु आपले मंत्रीपद वाचवण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री भाजपच्या कळपात होते. मुंबईतील भाजप कार्यालयाच्या भूमिपूजन अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांना दुसऱ्या रांगेत बसवण्यात आले होते. अमित शाह यांच्या हस्ते खासदार दानवे यांनाही पुष्पगुच्छ देण्यात आला होता. मात्र नारायण राणे यांच्याकडे यावेळी दुर्लक्ष झाले. दुर्लक्ष झाले की जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले हे नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणोत. परंतु ही खदखद निलेश राणे यांच्या मनात होती. कणकवली नगरपरिषदेत स्थानिक आघाडी केली आणि मालवण नगर परिषदेत शिवसेनेच्या ममता वराडकर यांना निवडून आणले. दोन्ही ठिकाणी भाजपला त्यांनी धूळ चाारली. परंतु या निवडणुकीत राणे कुटुंबीयांमध्ये उभी फूट पडली. खासदार नारायण राणे आणि निलेश राणे एका बाजूला आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे दुसऱ्या बाजूला.

ठाण्यात अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपरिषदांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत होती. अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार निवडून आल्या. मात्र बहुमत शिवसेनेला मिळाले. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत भाजपने आणि राष्ट्रवादीने युती केली होती. येथेसुद्धा भाजपच्या नगराध्यक्षा निवडून आल्या. मात्र शिवसेनेच्या 24 आणि भाजप आणि राष्ट्रवादीच्या 25 जागा निवडून आल्या. या निकालावरून ठाणे आणि उल्हासनगर महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता फार धूसर झाली आहे. बदलापूरमध्ये काँग्रेसच्या बारा जागा निवडून आल्या. शिवसेनेला पराभूत करण्यासाठी येथे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपची बी टीम म्हणून भूमिका बजावली. अन्यथा शिवसेनेला येथेही बहुमत मिळाले असते.
अंबरनाथ आणि बदलापूरमधील निकालानंतर आता ठाणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीतही शिवसेनेशी युती करू नये असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महायुतीतील पक्षांशी भेटीगाठीचे राजकारण करत असले तरी त्यांनाही ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने स्वतंत्र लढावे असे वाटत आहे. पाहुया काय होते ते..
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत.)
संपर्कः 9820355612

