Homeब्लॅक अँड व्हाईटभल्याभल्यांना पुरून उरणारी...

भल्याभल्यांना पुरून उरणारी मूठभर देशाची ‘मोसाद’!

मूठभर देशाची चिमूटभर गुप्तचर संस्था हे ‘मोसाद’चे खरे स्वरूप. मात्र कारवाया जगद्व्यापी. भल्याभल्यांनाही पुरून उरणाऱ्या. आजुबाजूला असलेली अरब शत्रूराष्ट्रं, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह यातून मोसादनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला अक्षरशः तारलं आहे. तिच्याच कारवायांचा मागोवा घ्यायचा हा प्रयत्न केला आहे लेखक पंकज कालुवाला यांनी त्यांच्या ‘इस्रायलची मोसाद’ या पुस्तकात.

अनेक महिन्यांपासून इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध सुरू आहे. त्या युद्धाची भीषणता जगात बघितली जात आहे. पण माघार घ्यायला कोणीच तयार नाही. इस्रायल, या देशावर जगातील अनेक देश हल्ले थांबवा म्हणून दबाव आणत आहेत. पण इस्रायल आपल्या भूमिकेवर ठाम आहे. काय आहे या छोट्याशा देशाची ताकद. हे जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे.

आपल्याकडे ‘कोणत्याही शस्त्रापेक्षा ते शस्त्र चालवणारा मानवी मेंदू महत्त्वाचा’ असं म्हणतात. या म्हणीत बरंचसं तथ्यही आहे. पण विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक व जास्त मारक क्षमतेची अस्त्र-शस्त्रं तयार व्हायला लागल्यानंतर ही म्हण सावधपणे वापरावी लागते. आताची आधुनिक युद्धं जिंकायची तर कार्यक्षम व बुद्धिमान मेंदूबरोबरच आधुनिक शस्त्रास्त्रांचीही जोड द्यावी लागते. अनेकदा या आधुनिक शस्त्रांच्या ताकदीसमोर मानव हतबल ठरताना दिसतो. त्यामुळेच कोणतंही नवं शस्त्र बाजारात आलं किंवा एखाद्या देशाच्या सैन्यदलात दाखल झालं की, इतर देशांची ते विकत घेण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळविण्यासाठी चढाओढ सुरू होते. इस्रायलचं गुप्तहेर खातं ‘मोसाद’ याचं तर अशा सर्वच शस्त्रांकडे बारीक लक्ष असतं. म्हणूनच १९५९-६० साली निरनिराळ्या आधुनिक शस्त्रांस्त्रांबरोबरच मिग-21 ही फायटर विमानं इजिप्त-इराकसारख्या अरब देशांच्या वायूदलात सामील झाल्याची बातमी तेल अविव्हला मिळाली. तेव्हा मोसादच्या तंबूत खळबळ माजली. त्यातूनच नंतर जन्माला आली एखादे अख्खेच्या अख्खे मिग-21 विमान पळवून आणण्याची योजना. ‘ऑपरेशन पेनिसिलीन’ या नावाने ती राबविण्यात आली अन् यशस्वीही ठरली.

आता आपण मोसादने ही कारवाई कशी तडीस नेली ते पाहणार आहोत.

इस्रायलला कैचीत पकडण्याचा आणि त्याचबरोबर आपला स्वार्थही साधून घेण्याचा फ्रान्सचा दुहेरी कावा होता. १९७१-७२ साली पेट्रोलियमच्या उत्पादनात एकदम घट झाली आणि जगभर इंधनाची टंचाई निर्माण झाली. १९७३ साली पेट्रोलियम उत्पादक अरब राष्ट्रांनी त्यात आणखी भर घातली. आपलं उत्पादन त्यांनी मुद्दाम घटवलं आणि खनिज तेलाची भाववाढ केली. ही भाववाढही थोडीथोडकी नव्हे तर एकदम अडीचपट. ह्या भाववाढीचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आपोआपच पडू लागला. ज्या देशांची अर्थव्यवस्था या पेट्रोलियम पदार्थांवर अवलंबून आहे, त्यांना याची झळ तीव्रतेने बसू लागली.

फ्रान्सच्या बाबतीत म्हणायचं तर त्या देशात जलविद्युत निर्मिती होत नाही किंवा होऊ शकत नाही. दगडी कोळश्याच्या खाणी नसल्यामुळे औष्णिक ऊर्जानिर्मितीही शक्य नाही. त्यामुळे आपली ऊर्जेची गरज भागविण्यासाठी फ्रेंचांना अवलंबून राहावं लागतं अणुऊर्जा आणि पेट्रोलियमवर. फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर अणुविद्युत केंद्र आपल्याला दिसतात ती त्यामुळेच. अणुविद्युत ऊर्जेमुळे मानवाची ऊर्जेची गरज काही प्रमाणात भागते हे खरं असलं तरी निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळ्या मार्गांनी ऊर्जा मिळवावी लागते. त्यात पेट्रोलियमआधारित ऊर्जेचाही समावेश होतो. ती तशी मिळवता आली तरच समतोल साधता येतो. फ्रान्सच्या बाबतीत हा मोठा असमतोल निर्माण झाला.. पुढे काय झाले ते या पुस्तकात सविस्तर वाचायला मिळते.

या पुस्तकाची पहिली आवृत्ती २०१२मध्ये प्रसिद्ध झाली. यात इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ची माहिती २९ प्रकरणांद्वारे सविस्तरपणे देण्यात आली आहे. ‘मोसाद’ने जगभरात राबवलेल्या ऑपरेशन्सची, मोहिमांची इत्थंभूत माहिती या पुस्तकात छायाचित्रांसह देण्यात आली आहे.

इस्रायलची मोसाद

लेखक: पंकज कालुवाला

प्रकाशक: परम मित्र पब्लिकेशन्स

पृष्ठे- ६३२ / मूल्य- ७५० ₹.

सवलत मूल्य- ६३५ ₹.

टपालखर्च- १०० ₹.

मोसाद

खरेदीसाठी संपर्कः ग्रंथ संवाद वितरण- 8383888148

Continue reading

अशी आहे रा. स्व. संघाची शतकी वाटचाल

संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले प्रकरण संघ कार्याचा प्रारंभ: विजयादशमी 25 सप्टेंबर 1925 नागपूर, हे असून शेवटचे प्रकरण क्रमांक ७०:...

.. आणि दिवाळी अंकाबाबत झालेली चर्चा फक्त चर्चाच राहिली!

परवा ८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता मोबाईल वाजला. दचकून जागा झालो आणि फोनवरचे बोलणे ऐकल्यावर कानावर विश्वासच बसला नाही. माझा परममित्र आणि ग्रंथ संवाद डिजिटल साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक जितेंद्र जैन तथा पप्पू याचे निधन झाले होते. दोनच दिवसांपूर्वी माझे...

वाचनीय, चिंतनीय व संग्राह्य असे ‘मृत्युंजय भारत’!

'मृत्युंजय भारत' या पुस्तकाचा  प्रकाशन सोहळा पुण्यात नुकताच प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला.‌ हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह, सुरेश जोशी उपाख्य 'भैयाजी' जोशी यांनी विविध प्रसंगी दिलेल्या ११ व्याख्यानांचे संकलन आहे. व्याख्यानांचे विषय- १) राष्ट्रीय...
Skip to content