स्वीडनच्या अवघ्या २५ वर्षीय मोंडो डुप्लांटिसने अॅथलेटिक्सविश्वात पोल व्हॉल्ट क्रीडा प्रकारात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घालून नुकताच जबरदस्त धमाका उडवून दिला आहे. गेल्या ५ वर्षांत मोंडोने थोडेथोडके नव्हे तर, तब्बल १४ नव्या विश्वविक्रमांची नोंद करुन साऱ्या अॅथलेटिक्स जगाचे लक्ष वेधून घेतले. टोकिओ येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत डुप्लांटिसने आपल्या १४व्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. २०२०मध्ये पोलंड येथे केटोरुन शहरात डुप्लांटिसने ६.१७ मीटर झेप घेत आपल्या पहिल्या विश्वविक्रमाचा श्री गणेशा केला. त्यानंतर हाच मीटरचा बार उंचावत आता विश्वविक्रम ६.३० मीटर एवढ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. अवघ्या ५ वर्षांतील त्याची १४ विश्वविक्रमाची कामगिरी थक्क करुन सोडणारी आहे. सध्या विश्वविक्रम आणि मोंडो डुप्लांटिस हे जणूकाही पोल व्हॉल्टमधील समीकरणच होऊन गेले आहे. १९८०-९०च्या दशकात रशियाच्या सर्जी बुबुकाने जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला होता. सलग सहावेळा विश्व स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सर्जीने तेव्हा पोल व्हॉल्टमध्ये १७ विश्वविक्रम नोंदवले होते. वयाच्या ३१व्या वर्षी बुबुकाने शेवटचा ६.१४ मीटरचा जागतिक विक्रम नोंदवला होता. पुढे मग फ्रान्सच्या रेनॉ लाविलेनी सर्जीचा विश्वविक्रम मोडीत काढला. त्याने ६.१८ मीटरची झेप घेत सर्जीला मागे टाकले. आता त्याच रेनॉच्या विश्वविक्रमात डुप्लांटिसने तब्बल १२ मीटरची सुधारणा केली आहे.

पोल व्हॉल्टमध्ये ६.१० मीटरच्या पुढे झेप घेणारे आतापर्यंत केवळ सर्जी बुबुका, रेनॉ लाविलेनी, मोंडो हे विश्वातील तीनच जण झेप घेऊ शकले आहेत. २०२०च्या टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेत मोंडोने सुवर्णपदक मिळवले होते. पण तेव्हा त्याने विश्वविक्रम केला नव्हता. एवढ्या लहान वयात मोंडोने आतापर्यत विश्वातील सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. ऑलिंपिक स्पर्धेत दोन सुवर्ण, जागतिक इनडोअर, आऊट डोअर स्पर्धेत प्रत्येकी ३ सुवर्ण, डायमंड लीग स्पर्धेत ५ सुवर्ण, विश्व इनडोअर टूर स्पर्धेत २ सुवर्ण, युरोपिय चॅम्पियनशिपमध्ये ३ सुवर्ण, युरोप इनडोअर स्पर्धेत सुवर्ण, विश्व ज्युनियर, युरोपियन ज्युनियर, विश्व युवा स्पर्धेत सुवर्णपदकांची त्याने कमाई केली आहे. आतापर्यंत मोंडोच्या नावावर विविध प्रमुख स्पर्धांतील २२ सुवर्ण, १५ रौप्य, २ कांस्यपदकाची नोंद आहे. त्याने एकूण ३९ पदकांची घसघशीत कमाई केली आहे. मोंडोने आतापर्यत ३ महाव्दिपात १४ विविध देशात आपले विश्वविक्रम साजरे केले आहेत. आतापर्यंत त्याने ३५पेक्षा जास्त स्पर्धात ६.१० मीटरपेक्षा जास्त झेप घेतली आहे. सप्टेंबर २०२२पासून सलग ४९ स्पर्धांत तो नंबर वन आहे.

मोंडोचा जन्म १० नोव्हेंबर १९९९ साली लाफियाट, लुईझियाना, अमेरिका येथे झाला. त्याचे वडिल अमेरिकन तर आई स्वीडनची नागरिक आहे. डुप्लांटिस घराणे हे क्रीडाप्रेमी. त्यामुळे मोंडो खेळाकडे वळला नसता तर नवलच म्हणायचे. त्याचे वडिल स्वतः चांगले पोल व्हॉल्ट खेळाडू होते. ५.८० मीटरचा अमेरिकन विक्रम त्यांच्या नावावर होता. आई हेलेना उत्तम हेप्टथलॉन, व्हॉलीबॉल खेळाडू होती. तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांत स्वीडनचे प्रतिनिधीत्वदेखील केले होते. मोठे भाऊ एंडियासदेखील चांगला पोल व्हॉटपटू तर दुसरा एंटोनी बेसबॉल चांगला खेळायचा. बहिण जोहानाने पोल व्हॉल्टमध्ये स्वीडनचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यामुळे खेळाचे बाळकडू या सर्वांकडून त्याला मिळाले. वयाच्या चौथ्या वर्षी मोंडोने पोल व्हॉल्टचा श्रीगणेशा केला. मग त्याने मागे वळून बघितलं नाही. वडिल आणि दोघा भावांच्या तालमीत मोंडो चांगला तयार झाला. थोड्याच वर्षांत त्याने विविध वयोगटात चमक दाखवण्यास सुरूवात केली. त्याचे शालेय शिक्षण लायाफेट स्कूलमध्ये तर कॉलेजचे शिक्षण लुईझियाना विद्यापीठात झाले.

वयाच्या १५व्या वर्षी त्याने २०१५मध्ये विश्व युवा स्पर्धा जिंकली. २०१६मध्ये २० वर्षांखालील विश्व युवा स्पर्धेत मोंडोचा तिसरा क्रमांक लागला. २०१७मध्ये युरोपियन ज्युनियर स्पर्धेत तो पहिला आला. २०१८मध्ये २० वर्षांखालील विश्व युवा स्पर्धेत मोंडोने सुवर्णपदक मिळवले. लॉरियस विश्व पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्पोर्टस् प्रेस महासंघाचा पुरस्कार, एआईपीएस पुरस्कार, बीबीसी स्पोर्टस् पर्सन ऑफ दी इयर पुरस्कार, पीएपीएल इन्वर एक्पिप पुरस्कार, स्वीडनच्या क्रीडा अकादमीचा पुरस्कार, स्वीडन व्हिटोरिया पुरस्कार, स्वीडनच्या प्रेस असो.चा पुरस्कार, स्वीडीश जेरिंग पुरस्कार आदि विविध पुरस्काराने मोंडोला गौरविण्यात आले आहे. २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने त्याला उगवता खेळाडू पुरस्कार दिला होता. त्यांचाच चार वेळा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारदेखील मोंडोला मिळाला होता. युरोपियन अॅथलेटिक्स महासंघानेदेखील याच पुरस्काराने त्याला सन्मानित केले आहे. जगप्रसिद्ध फोर्ब्सच्या अंकात जगातील नामांकित व्यक्तींमध्ये मोंडोचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२४मध्ये मोंडो डुप्लांटिस स्वीडीश मॉडेल आणि कंन्टेट क्रिएटर डेनर इनग्लॅडरशी विवाहबंधनात अडकला. पोल व्हॉल्टमधील आपल्या अफलातुन कामगिरीच्या जोरावर डुप्लांटिसने या खेळाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आता भविष्यात मोंडोचे लक्ष्य ६.५० मीटर ऊंची पार करण्याचे आहे. डुप्लांटिस पोल व्हॉल्टचा हा बार आणखी किती उंचीवर नेऊन ठेवतो याकडे आता साऱ्या जगाचे लक्ष असेल.