Homeब्लॅक अँड व्हाईटयशस्वी होऊ इच्छिणाऱ्या...

यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकासाठीः मेंटॉर!

ज्ञान आणि अनुभव यांचा साठा करायचा नसतो. ज्ञान वाटल्यानं वृद्धींगत होतं आणि अनुभवाची शिदोरी समृद्ध समाजासाठी योगदान देते. उद्योजकतेचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. अजित मराठे व राजेंद्र सावंत हे तरुण मार्गक्रमण करू लागतात. त्यात रोज नवं काही शिकत जातात. टक्केटोणपे खात अनुभवांचं गाठोडं जमा होतं. यातून ते शिखरही गाठतात. कमावलेलं ज्ञान आणि समृद्ध अनुभवविश्व इतर व्यावसायिकांसोबत शेअर करण्याची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. हातपाय मारत नशीब आजमावणाऱ्या उद्योजक तरुणांसाठी ‘मार्स गुरुकुल’च्या माध्यमातून ते आपलं ज्ञानभांडार खुलं करतात. या दोन तरुणांनी उभ्या केलेल्या ‘निर्माण’ची गाथा आणि ‘मार्स गुरुकुल’मार्फत उद्यमी घडवण्याच्या प्रयत्नांची कथा म्हणजे ‘मेंटॉर’!

डॉ. सुरेश हावरे, अणुशास्त्रज्ञ व यशस्वी उद्योजक, चेअरमन, हावरे प्रॉपर्टीज आपल्यां प्रस्तावनेत लिहितात- ‘निर्माण’ची सुरुवात शून्यातून झाली आहे, याचा मी साक्षीदार आहे. गेल्या पंचवीस वर्षांची त्यांची वाटचाल माझ्या नजरेसमोर आहे. कष्टाशिवाय काहीच साध्य होत नाही (होऊही नये, असं माझं मत आहे.). उद्योगात यशस्वी होण्यासाठी या दोघांनीही अपार कष्ट उपसले आहेत. उद्योगात आनंद शोधण्याचं कसबही त्यांना अवगत झालं आहे. ते जे काही करतात, ते एन्जॉयही करतात. ही त्यांची खासियत आहे. एकदा का ‘मार्स गुरुकुल’मध्ये प्रवेश घेऊन तुम्ही स्वतःला त्यांच्याकडे सुपूर्द केलंत, की पुढची सगळी काळजी ते स्वतः घेतात. हा काही ट्यूशन क्लास नाही. ही एक मैत्री आहे. तुमचा हात हातात धरून तुमचा रस्ता प्रशस्त करण्याचं काम ते करताहेत. म्हणूनच तर त्यांनी स्वतःला फ्रेंड, फिलॉसॉफर व गाईड या भूमिकेत ठेवलं आहे. इथे तुम्हाला जे मिळेल, ते कुठेही मिळणार नाही, असा माझा अनुभव सांगतो.

स्वतःबद्दलचं त्यांनी केलेलं पुस्तकातलं विवेचन अत्यंत प्रामाणिक आहे. जे घडलं किंवा बिघडलं, ते जसंच्या तसं त्यांनी या पुस्तकात मांडलं आहे. हे सोपं वाटत असलं, तरी अत्यंत अवघड काम आहे. मी चुकलो, मला ठेच लागली, पण इतरांना ती लागू नये, असाच त्यांचा त्यामागील हेतू असावा. शेजारच्या घरात डोकावणं, हा माणसाचा सहज स्वभाव आहे. तसाच तो इतरांच्या जीवनात डोकावण्याचाही आहे. इथे तर सारं जीवनच आपल्यासमोर या दोघांनी उघड केलं आहे. वाचक, उद्योजक त्यातून खूप शिकतील, असा माझा विश्वास आहे. ‘मार्स गुरुकुल’चा उद्योजकांना झालेला फायदा म्हणजे, या दोघांचा इम्पॅक्ट शेवटच्या प्रकरणात जिथे अभिप्राय आपण वाचतो त्यात दिलेला आहे. अनेक उद्योजकांचा टर्नओव्हर पाच ते दहा पटींनी वाढल्याची कबुली त्यात दिसते. उद्योग जगतात वावरताना एक गोष्ट प्रखरपणे लक्षात येते. ती म्हणजे, उद्योजक छोट्याछोट्या ठिकाणी अडकलेला आहे. उद्योजक होण्याची काही पाठशाळा आज उपलब्ध नाही. आणि पोहणं जसं पुस्तक वाचून येत नाही, त्यासाठी पाण्यात उतरावंच लागतं. तसंच उद्योजकाचंही आहे. केल्याशिवाय तो येत नाही. प्रत्येक अनुभव आपणच घेण्याची गरज नसते. दुसऱ्यांच्या अनुभवांतूनही शिकायचं असतं. हाच तर पुस्तकाचा नेमका फायदा आहे. मराठे आणि सावंत यांनी उद्योजकांना ही शिदोरीच दिली आहे. म्हणूनच हे पुस्तक प्रत्येकाजवळ असलं पाहिजे आणि ते प्रत्येकानं वाचलं पाहिजे.

दुसरी प्रस्तावना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योजक दीपक घैसास यानी लिहिली आहे. ते लिहितात- भारतीय संस्कृतीत देणारा हात मोलाचा मानला जातो. ‘निर्माण फाउंडेशन’ची कल्पना हे त्याचंच प्रतीक आहे. अर्थात, पालकांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांचं व दोघांच्या पत्नींनी त्यांना दिलेल्या साथीचं हे फळ आहे. त्या मार्गानं त्यांनी दत्तक घेतलेल्या शैक्षणिक संस्था व दूरदृष्टी ठेवून आपल्या व्यवसायाला पूरक ठरणारं कौशल्य तयार करण्याबाबत दाखवलेली जागरूकता हे व्यावसायिक व सामाजिक उद्दिष्टं हातात हात घालून कशी साध्य करता येतील, याचं उत्तम उदाहरण आहे. त्याच अनुषंगानं त्यानंतर त्यांनी सुरू केलेलं ‘मार्स गुरुकुल’. वास्तविक गुरुकुल ही आपली पारंपरिक शिक्षण पद्धती आहे. इथे शिष्य हा गुरूच्या घरीच राहून शिक्षण घेत असतो. हे शिक्षण केवळ औपचारिक शिक्षण देणारं नसतं, तर स्वतःचं जीवन समृद्ध करण्यासाठी व एक आदर्श माणूस म्हणून समाजात उभं राहण्याचे संस्कार मिळवण्याचं केंद्र असतं. मला वाटतं, ‘मार्स गुरुकुल’ ही संकल्पना त्याच दृष्टिकोनातून आली असावी. अजित व राजेंद्रच्या या सर्व धडपडीमध्ये घेण्यापेक्षा देण्याची भावना मला दिसते. आपल्या अनुभवांचा फायदा इतर व्यावसायिकांना मिळावा, हा त्यांचा आग्रह काही नवीन नाही. पण गुरुकुल विचार पद्धतीप्रमाणे त्यांच्यातून केवळ यशस्वी व्यावसायिकच नव्हे, तर समाजाभिमुख व सच्च्या मूल्यांचा माणूस घडावा हाही मानस असावा.

व्यावसायिकांनी कोणकोणत्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे, याची नऊ सूत्रं या लेखकद्वयीनं पुस्तकाच्या उत्तरार्धात दिली आहेत. वास्तविक या प्रत्येक सूत्राचं एक याप्रमाणे नऊ पुस्तकं लिहिण्याइतकं साहित्य अजित आणि राजेंद्रकडे आहे, पण त्यांनी त्याचं अर्कसार पन्नास पानांत दिलं आहे. आपण स्वयंपाकाची चव घेऊन आज जेवण कसं असेल, याचा अंदाज बांधतो. हे पुस्तक म्हणजे हा चव घेण्याचाच कार्यक्रम आहे. नेतृत्त्वगुण, व्यावसायिक रणनीती, अनुभवाचं माहात्म्य, अर्थज्ञान, जमाखर्चाचा ताळमेळ, व्यवस्थापकीय निर्णयप्रक्रिया, व्यावसायिक ध्येय व उद्देश, मंदीत तग धरणं आणि आपल्या भोवतालची साथ या नऊ सूत्रांचा ऊहापोह त्यांनी अगदी मोजक्या शब्दांत केला आहे. मला वाटतं, हे पुस्तक वाचल्यावर प्रत्येक व्यावसायिकाला एक चेकलिस्ट बनवता येईल व स्वतःच्या प्रगतीचा आढावा स्वतःलाच घेता येईल.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात ‘मार्स गुरुकुल’च्या काही नशीबवान लाभार्थीचं मनोगत दिलं आहे. तोही भाग मला आवडला. कारण त्यामुळे या सूत्रांचं महत्त्व केवळ पुस्तकी नसून, व्यावसायिक लाभाचं आहे, याची खात्री वाचकांना मिळते. ही सूत्रं अंगीकारण्याची प्रेरणाही मिळते. मेंटॉर म्हणजे शिक्षक किंवा गुरू नव्हे, तो ज्ञान देत नाही किंवा उपाय सांगत नाही, तर व्यवसायात तरण्यासाठी, प्रगती करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन, स्वतःच्या संपन्न अनुभवांचा फायदा घेत देत असतो. अजित व राजेंद्र हे दोघंही उत्तम मेंटॉर आहेत. त्यांच्याकडे हातचं न राखता देण्याची प्रवृत्ती आहे. माझ्या मते, जास्तीतजास्त व्यावसायिकांनी या पुस्तकातल्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. व्यवसायात यशाची खात्री नसते, पण समाधानाची असते. हे लेखकद्वय याच प्रयत्नात आहेत. अजित व राजेंद्र यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा!

मेंटॉर

लेखक: डॉ. अजित मराठे / राजेंद्र सावंत

संपादन: अभय कुलकर्णी

प्रकाशक: मेनका प्रकाशन

मूल्य: ३००/- रुपये टपालखर्च: ५०/- रुपये

मेंटॉर

पुस्तक खरेदीसाठी संपर्क: ग्रंथ संवाद (8383888148, 9702070955)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

ताणतणाव, नातेसंबंध उलगडणारे ‘झाले जलमय…’!

झाले जलमय... लेखिका डॉ. सुचिता पाटील सर्वद फाऊंडेशन आणि नरेश राऊत फाऊंडेशनच्या संचालिका आहेत. या संस्थेमार्फत लेखिका आदिवासी बंधूभगिनींच्या कल्याणासाठी काम करीत आहेत. त्यामुळे या पुस्तकाचे सर्व पैसे आदिवासी, गरीब मुलांसाठी दिले जाणार आहेत. डॉ. सुरुची डबीर यांनी आपल्या प्रस्तावनेत...

अशी आहे रा. स्व. संघाची शतकी वाटचाल

संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले प्रकरण संघ कार्याचा प्रारंभ: विजयादशमी 25 सप्टेंबर 1925 नागपूर, हे असून शेवटचे प्रकरण क्रमांक ७०:...

.. आणि दिवाळी अंकाबाबत झालेली चर्चा फक्त चर्चाच राहिली!

परवा ८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता मोबाईल वाजला. दचकून जागा झालो आणि फोनवरचे बोलणे ऐकल्यावर कानावर विश्वासच बसला नाही. माझा परममित्र आणि ग्रंथ संवाद डिजिटल साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक जितेंद्र जैन तथा पप्पू याचे निधन झाले होते. दोनच दिवसांपूर्वी माझे...
Skip to content