Tuesday, September 17, 2024
Homeमाय व्हॉईसपाहा काळाचा महिमा.....

पाहा काळाचा महिमा.. फडणवीस तावडेंकडे तर, पवार लालबागच्या राजाकडे!

काळाचा महिमा बघा. शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला तर देवेंद्र फडणवीस विनोद तावडे यांच्या घरी! तसे पाहिले तर हे दोन्ही नेते आपापल्या पक्षातले मातब्बर नेते. परंतु डोळ्यासमोर विधानसभेच्या निवडणुका आणि त्याला सामोरे जाताना कोणतीही रिस्क न घेण्याची या दोन्ही नेत्यांची दूरदृष्टी, त्यांना असे निर्णय घेण्यास भाग पाडू लागली आहे.

फडणवीस

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष. अजितदादांनी पक्षात फूट पाडून राष्ट्रवादी काँग्रेसवरच कब्जा केल्यानंतर पेटून उठलेले पवार आता दर्शनालाही जाऊ लागले आहेत. गेल्या पन्नास वर्षांच्या राजकारणात स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे शरद पवार आता हिंदुत्वाच्या बाजूने झुकताहेत की काय, असा प्रश्न पडावा अशा घटनांचे पवार साक्षीदार होत आहेत. छत्रपती शिवरायांच्या नावाने कधीही जयजयकार न करता आपल्या भाषणाची सुरुवात नेहमी शाहू, फुले, आंबेडकर यांना अभिवादन करून करणारे शरद पवार आपण नेहमी पाहतो. धर्मनिरपेक्षतेचा पुकारा करताना आपण रूढी, परंपरा, सणवार याला सार्वजनिक जीवनात फारसे महत्त्व देत नाही, अशी पवारांची भूमिका कायम राहिलेली आहे.

फडणवीस

मात्र पक्षफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना त्यांनी थेट रायगड गाठले. तुतारी चिन्हाचे अनावरण त्यांनी रायगडाला साक्षीला ठेवत केले. इतकेच नव्हे तर सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सुरुवात त्यांनी बारामतीतल्या काटेवाडीतल्या हनुमान मंदिरात नतमस्तक होऊन केली. आज सकाळी सकाळी ते चक्क मुंबईत लालबागला असलेल्या लालबागचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीच्या दर्शनाला गेले. गेल्या काही वर्षांपासून नवसाला पावणारा गणपती असा प्रचार या गणपतीबाबत केला जात आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी पवार आपले जावई सदानंद सुळे तसेच नात रेवती सुळे यांच्यासोबत धडकले. दर्शन घेऊन, छानसे फोटोशूट करून पवार तेथून निघाले. येथे त्यांनी कोणता नवस केला ते बाप्पाच जाणो. मात्र, समाजमाध्यमांवर मात्र पवारांनी बळीराजा तसेच जनसामान्यांच्या प्रश्नावर लढण्याचे बळ मिळो असे आर्जव गणरायासमोर केल्याचे जाहीर केले.

फडणवीसांचीही गणेशदर्शन डिप्लोमसी

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मुंबईतल्या विलेपार्ले येथील निवासस्थानी पाहायला मिळाले. तावडे यांच्याकडे दीड दिवसाचा गणेशोत्सव असतो. या उत्सवात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या घरच्या गणरायाला नमन करण्यासाठी फडणवीस तेथे पोहोचले.

हेच तावडे, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्रालयासह अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री होते. मात्र त्या काळात कधीही फडणवीस तावडे यांच्या घरी गणेश दर्शनासाठी गेले नव्हते. मराठा समाजाचे ते नेते असल्यामुळे आणि कुशल संघटक असल्याने तावडे तेव्हा मुख्यमंत्रीपदाचे एक दावेदार मानले जात होते. मास लीडर म्हणून त्यांची तशी ख्याती नसली तरी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्याबरोबरीने एक स्वतंत्र गट तयार करण्यात तावडे यशस्वी झाले होते. याचाच परिणाम पुढे झाला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा बाळगणारे आणि त्यादृष्टीने हालचाल करणारे विनोद तावडे यांना ते आमदार असलेल्या मुंबईतल्या बोरीवली मतदारसंघातून उमेदवारीच नाकारण्यात आली. यामागे फडणवीस यांचीच मोठी भूमिका होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात आजही होत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडत असतानाच तावडे यांनी चतुर खेळी केली. त्यांनी सरळ केंद्रीय पक्षाच्या केंद्रीय संघटनेत आपले बस्तान बसवले. सध्या ते पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी सरचिटणीस पदावर आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचे सातत्याने बारकाईने लक्ष आहे. फडणवीस जरी आज महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असले तरी त्यांना भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून दिल्लीत बोलावले जाऊ शकते. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला सारण्याच्या प्रयत्नात असलेल्या नेत्यांपैकी तावडेही एक नेते आहेत, असे बोलले जाते. त्यामुळेच तावडे यांच्या घरी गणेश दर्शनाच्या निमित्ताने जात फडणवीस यांनी त्यांचे मन राखण्याचा केलेला प्रयत्न असावा, अशी अटकळ बांधली जात आहे.

तावडे यांच्याच घरी फडणवीस राज्याचे माजी राज्यमंत्री राज के पुरोहित यांच्याशी चर्चा करतानाही दिसले. आता राजपुरोहित तेथे कसे पोहोचले आणि फडणवीस त्यांच्याशी नेमके काय बोलले हे त्यांनाच ठाऊक. परंतु याच राज पुरोहितचे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातले तिकीट कापून त्याठिकाणी पक्षात नव्याने दाखल झालेले राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देऊन राज पुरोहित यांचे राजकीय भवितव्य गडद करण्याचे काम याच फडणवीस यांनी केले होते, असे बोलले जाते.

तावडे, राज पुरोहित हे जुन्या फळीतले असे काही नेते आहेत की जे गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर कायम राहिले होते. याच दर्शनाच्या कार्यक्रमात फडणवीस यांनी भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. उत्तर भारतीयांना चुचकारताना फडणवीस यांनी हे पाऊल टाकले असावे असे बोलले जात आहे. पक्षाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये तसेच महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी जाऊनही फडणवीस यांनी गणरायाचे आशीर्वाद घेतले. केशव उपाध्येही फडणवीसविरोधी गोटातले समजले जातात आणि चित्रा वाघ यांना विधान परिषद तसेच राज्यसभेच्या सदस्यत्वाने हुलकावणी दिल्यामुळे त्या काहीशा नाराज आहेत. त्यामुळेच यानिमित्ताने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केल्याचे मानले जाते.

1 COMMENT

  1. छान झालाय लेख. शेवटी राजकारणात टिकून जिंकायचे असेल तर ताठ राहून चालतच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

लालबागचा राजा टेन्शनमध्ये!

मुंबईतला लालबागचा राजा सध्या टेन्शनमध्ये आहे. पावू कुणाला, या प्रश्नाने त्याला ग्रासले आहे. सर्वसामान्यांच्या डोक्यावर आपला आशिर्वादाचा हात ठेवायचा की त्या सामान्य जनतेचे भले करण्याच्या आणाभाका घेणाऱ्या राजकीय नेत्यांकडे पाहायचे? आणि या नेत्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे भले करायचे तर नेमक्या...

कामांध समाजमनाने लॉकडाऊनचा काळही सोडला नाही!

बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र हादरला होता. या कारणांवरून बदलापूरमध्ये अभूतपूर्व असे आंदोलन झाले होते. राज्यात विरोधी बाकांवर बसणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जनआंदोलनाला पर्वणी मानत सक्रीय पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर राज्य सरकारच्या लाडकी...

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे धाबे दणाणले?

महाराष्ट्रात सध्या विरोधातल्या महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीविरूद्ध तसेच घडलेल्या घटनांचा वापर करत विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत. मग, सरकारची लाडकी बहीण योजना असो की बदलापूरची घटना, की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना... सरकारविरूद्ध आंदोलन करत, विरोधी...
error: Content is protected !!
Skip to content