भारतीय नौदलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) तयार करत असलेल्या दोन प्रगत युद्धनौकांपैकी त्रिपुट, या पहिल्या युद्धनौकेचे गोव्यात नुकतेच जलावतरण करण्यात आले. सागरी परंपरेनुसार, अथर्ववेदाच्या मंत्रोच्चारात गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत रीता श्रीधरन यांच्या हस्ते जहाजाचे जलावतरण झाले. भारतीय नौदलाच्या अदम्य भावनेचे तसेच दूरवर आणि खोलवर मारा करण्याच्या क्षमतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शक्तिशाली बाणावरून या जहाजाचे नाव त्रिपुट ठेवण्यात आले आहे.
25 जानेवारी 19 रोजी संरक्षण मंत्रालय आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्यात त्रिपुट श्रेणीतील दोन प्रगत युद्धनौका तयार करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. शत्रूच्या क्षेत्रातील जहाजे, पाणबुड्या आणि विमानांविरुद्ध लढाऊ कारवाईच्या दृष्टीने या जहाजांची रचना करण्यात आली आहे.

त्रिपुट श्रेणीची जहाजे 124.8 मीटर लांब आणि 15.2 मीटर रुंद आहेत. त्याची पाण्याखालील खोली 4.5 मीटर आहे. त्याचे वजन अंदाजे 3600 टन आहे आणि गती कमाल 28 सागरी मैल आहे. ही जहाजे स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालींनी सुसज्ज आहेत.
जीएसएलमध्ये जहाजबांधणी झालेल्या त्रिपुट श्रेणीतील जहाजे रशियाकडून विकत घेतलेल्या तेग आणि तलवार श्रेणीच्या जहाजांप्रमाणे आहेत. भारतीय शिपयार्डद्वारे प्रथमच स्वदेशात या युद्धनौका बनवल्या जात आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाअंतर्गत, शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्ससह बहुतांश उपकरणे आणि सुटे भाग स्वदेशी आहेत. यामुळे भारतीय उत्पादन कंपनीद्वारे मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादन, देशात रोजगारनिर्मिती आणि क्षमतावाढ सुनिश्चित होईल.