Wednesday, February 12, 2025
Homeएनसर्कलचित्रपटांद्वारे जाणून घ्या...

चित्रपटांद्वारे जाणून घ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त, आज दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह व्याख्यान आणि चित्रपटाचे प्रसारण महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व समाजमाध्यमांवरून करण्यात येणार आहे.

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वा. आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी ३ वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण सायं. ६ वाजता करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सायं. ७.३० वा. ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमामधून ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान प्रसारित होईल. माहितीपट, व्याख्यान व चित्रपटाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉ. आंबेडकर यांना ही अनोखी आदरांजली वाहिली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक –  https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रिकरणाचा समावेश या १७ मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. तर, जी. जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. दत्ता डावजेकर संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक आहेत. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते.

भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ची निर्मिती असलेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी ३ वाजता महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या वतीने एन. एस. थापा यांनी १९८१मध्ये या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए. वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण सायं. ६ वाजता महासंचालनालयाच्या ट्विटर या समाजमाध्यमावरुन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ. बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्त्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहायला हवा.

या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामुट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्यादेखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मितीसहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथालेखन सोनी तारापोरवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेत. चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर, फोटोदिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांच्या व्याख्यानाचे थेट प्रसारण सायं. ७.३० वाजता महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आणि बाबासाहेबांचे ऋणानुबंध तसेच भारतीय राज्यघटना या विषयांवर हे व्याख्यान आहे.

Continue reading

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत हरेश्वर, काजल विजेते

मुंबईच्या शिवाजी पार्क जिमखाना आयोजित आणि सारस्वत बँक पुरस्कृत १६व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या हरेश्वर बेतवंशीने आपले पहिले विजेतेपद पटकविताना अनुभवी पुण्याच्या सागर वाघमारेचा सरळ दोन सेटमध्ये २५-८, २२-१४ असा पराभव...

ब्रिटन रेल्वे आणि यशराज फिल्म्स एकत्र साजरा करणार प्रेमाच्या उत्सव!

२०२५मध्ये आधुनिक रेल्वेच्या २००व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रिटनची रेल्वे आणि भारतातील सर्वात मोठी फिल्म प्रोडक्शन कंपनी यशराज फिल्म्स एकत्र येत आहेत. रेल्वे 200, या ऐतिहासिक सोहळ्याचा एक भाग म्हणून, दोन्ही देशांमधील संस्कृतींना जोडणाऱ्या प्रेमाच्या शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी हा अनोखा उपक्रम...

कुणीतरी आहे तिथं : सौरमालेबाहेर आहे पृथ्वीच्या सहापट मोठी ‘सुपर अर्थ’!

शास्त्रज्ञांना आपल्या सौरमालेच्या बाहेर आणखी एक पृथ्वी सापडली आहे. ही 'सुपर अर्थ' आपल्यापासून साधारणतः 20 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. हा ग्रहही पृथ्वीप्रमाणेच सूर्यासारख्या एका ताऱ्याभोवती फिरतोय. खगोल शास्त्रज्ञांनी या सुपर अर्थचे "HD 20794 d" असे नामकरण केले आहे. पृथ्वीच्या पलीकडेही...
Skip to content