Homeन्यूज अँड व्ह्यूजसर्वात तरुण आयपीएल...

सर्वात तरुण आयपीएल करोडपती, वैभव सूर्यवंशी!

आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात सर्वात लहान वयात करोडपती होण्याचा मान बिहारचा सलामीचा युवा फलंदाज, अवघ्या १३ वर्षे १८८ दिवसांच्या असलेल्या वैभव सूर्यवंशीने मिळवला आहे. आयपीएल स्पर्धेच्या क्रिकेटपटूंच्या बोलीकडे जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले असते. कुठला संघ, कुठला खेळाडू घेणार आणि त्यासाठी किती रक्कम मोजणार याची चर्चा लिलावा अगोदर क्रिकेटप्रेमींमध्ये रंगलेली असते. आता होणाऱ्या २०२५च्या या स्पर्धेसाठी संजू सॅमसन कर्णधार असलेल्या राजस्थान रॉयल संघाने वैभवला करारबद्ध करून आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला. आयपीएल स्पर्धेत खेळणारा आजवरचा तो सर्वात तरुण खेळाडू ठरणार आहे. या लिलावासाठी आलेल्या खेळाडूंच्या नावातदेखील तोच वयाने सर्वात लहान क्रिकेटपटू होता. आता आयपीएल लिलावात बाजी मारून वैभवने बिहारची एक वेगळी ओळख क्रिकेटविश्वाला करून दिली आहे. लिलावासाठी वैभवची मूळ रक्कम सुरुवातीला ३० लाख रुपये ठेवण्यात आली होती. परंतु त्यानंतर त्याला आपल्या संघात घेण्यासाठी दिल्ली आणि राजस्थान संघात रस्सीखेच सुरु झाली. अखेर राजस्थानने या युवा खेळाडूला १ कोटी १० लाख रुपये देऊन आपल्या संघासाठी करारबद्ध करण्यात यश मिळविले. त्याच्या आयपीएल प्रवेशामुळे सारेच क्रिकेटविश्व अचंबित झाले आहे.

सध्या वैभव ८व्या इयत्तेत शिकत आहे. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी वैभवने बिहारतर्फे रणजी करंडक सामन्यात पदार्पण केले. बलाढ्य मुंबईविरुद्ध तो आपला पहिला रणजी सामना खेळला. रणजी स्पर्धेत पदार्पण करणारा १२ वर्षे २८४ दिवसांचा असलेला वैभव सर्वात तरुण खेळाडू ठरला. यंदा सप्टेंबर महिन्यात १९ वर्षांखालील युवा कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवान शतकी खेळी करुन तो प्रकाशझोतात आला. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात त्याने अवघ्या ५८ चेंडूत १०४ धावा फटकावताना १४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्याची ही विक्रमी खेळी ठरली. त्यानंतर झालेल्या १९ वर्षांखालील भारतीय अ संघ, ब संघ, बांगलादेश, इंग्लंड याच्यातील चौरंगी मालिकेतदेखील त्याची बॅट चांगली चालली. त्याने 3 सामन्यात २ अर्धशतके फटकावली. बिहार क्रिकेट संघटनेच्या रणधीर वर्मा एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत त्याने तिहेरी शतक फटकावून विक्रमी खेळी केली. तर गतवर्षी कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत झारखंडविरुद्ध खेळताना वैभवने पहिल्या डावात १५१ आणि दुसऱ्या डावात ७६ धावांची शानदार खेळी केली होती.

वयाच्या १२व्या वर्षी त्याने प्रतिष्ठेच्या विनू मकड करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले. बिहारमधील समस्तीपूर येथील ताजपूर गावचा हा युवा क्रिकेटपटू. त्याचे वडिल संजीव चांगले क्रिकेट खेळाडू होते. परंतु भारतातर्फे खेळण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले होते. मग आपल्या मुलाला चांगला क्रिकेटपटू तयार करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यासाठी स्वतः चांगले प्रशिक्षक बनले. या खेळातील बारकाव्यांचा अभ्यास केला. ५व्या वर्षी टेनिस बॉलने वैभवच्या क्रिकेट खेळाचा शुभारंभ झाला. सुरुवातीच्या काळात वैभवच्या वडिलांनी घराजवळच खेळपट्टी, मैदान तयार करून तेथेच त्याच्याकडून जास्तीतजास्त सराव करून घेतला. ती खेळपट्टी आणि मैदान तयार करण्यासाठी त्यांनी आपली शेतजमीनदेखील विकली. मग २ वर्षांनी त्याला समस्तीपूर येथील क्रिकेट अकादमीत पाठवले. तेथे सुरूवातीला ब्रजेश झा यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले. काही वर्षांनी वडिल त्याला पाटणा येथील मनीष ओझा यांच्या जीसीसी अकादमीत घेऊन जाऊ लागले. त्यासाठी रोज अनेक मैलांचा प्रवास करून छोट्या वैभवला ते स्कूटरवरून पाटणा येथे नेत असत. ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवच्या फलंदाजीत चांगलीच सुधारणा झाली. मग स्थानिक क्रिकेट स्पर्धेत वैभव आपल्या बॅटची चमक दाखवू लागला.

बिहार क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी छोट्या वैभवची फलंदाजीतील चमक बघून त्याला बिहार संघात लहान वयातच स्थान दिले. मिळालेल्या संधीचे वैभवने सोने केल्यामुळेच आता तो राजस्थान संघासाठी करारबद्ध झाला आहे. क्रिकेट हा खेळ त्याच्या नसानसात भरला आहे. सतत क्रिकेटचाच तो विचार करत असतो. तो चाणाक्ष असून त्याची बुद्धिमत्तादेखील तल्लख असल्याचे बिहार रणजी संघाचे प्रशिक्षक प्रमोद कुमार सांगतात. उपहार आणि चहापानाच्या वेळीदेखील वैभव तुम्हाला सतत कसला ना कसला सराव करत असताना दिसेल. या वयात त्याने चेंडूला कसे सामोरे जायचे आणि फटक्यांची निवड कशी करायची याचा चांगला अभ्यास केलाय. बचाव आणि आक्रमण हे दोन्ही गुण त्याच्या फलंदाजीत बघायला मिळतात. ड्राइव्ह्ज, कट, पूल या फटक्यांवर त्याने आताच चांगली हुकूमत मिळविली असल्याचे प्रमोद कुमार यांचे मत आहे. भविष्यात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगायला हरकत नसल्याचे कुमार स्पष्ट करतात. आयपीएलच्या मोठ्या अनुभवामुळे त्याच्या फलंदाजीत आणखी बरीच सुधारणा दिसेल असा कुमार यांना विश्वास आहे. राजस्थान संघाचे मुख्य प्रशिक्षक भारताचे माजी कर्णधार, प्रशिक्षक आणि शैलीदार फलंदाज राहुल द्रविड आहेत. द्रविड यांनी वैभवसाठी होकार दिल्यामुळे त्याच्यात नक्कीच चांगली गुणवत्ता असेल यात शंका नाही. त्यामुळे २०२५च्या आयपीएल स्पर्धेत वैभवच्या कामगिरीकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.

जेद्दाह येथे झालेल्या आयपीएलच्या लिलावात भारताचा यष्टीरक्षक आणि फटकेबाज डावखुरा फलंदाज ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला लखनौ संघाने तब्बल २७ कोटी देऊन आपल्या संघात दाखल करुन घेतले. दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता संघाचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर असून त्याला पंजाब संघाने २६.७५ कोटी रुपये देऊन करारबद्ध केले आहे. या दोघांची सुरुवातीची पायभूत रक्कम अवघी २ कोटी रुपये होती. याअगोदर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलदाज स्टार्क आयपीएलमध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू होता. कोलकाता संघाने त्याच्यासाठी तेव्हा २४.७५ कोटी एव्हढी रक्कम मोजली. यंदाच्या स्पर्धेत विदेशी खेळाडूंमध्ये इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला गुजरात संघाने १५.७५ कोटी रुपये देऊन खरेदी केले. अष्टपैलू व्यंकटेश अय्यरलादेखील पंजाबने २६.७५ कोटी रुपये मोजून आपल्या संघात दाखल केले. यंदाच्या या मेगा लिलावात अनेक विक्रम मोडले गेले. त्यामुळे पंत आणि अय्यरच्या कामगिरीकडे त्यांच्या संघाचे लक्ष असणार आहे हे निश्चित!

Continue reading

तिसऱ्या प्रयत्नात भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास!

हरमनप्रीत कौरच्या यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आपल्या तिसऱ्या प्रयत्नात वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचला. या ऐतिहासिक जेतेपदामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या लाखो चाहत्यांना दिवाळीनंतर लगेचच पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची आगळी...

बॅडमिंटनमधले तपस्वीः मनोहर गोडसे!

बॅडमिंटन आणि मनोहर गोडसे यांचे एक अतूट नातं आहे, जे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुटूच शकत नाही. बॅडमिंटन हा जणू काही गोडसे यांचा श्वास आहे, असेच म्हणावे लागेल. नुकतेच वयाच्या ८६व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या गोडसे यांनी तब्बल सहा दशकांपेक्षा जास्त...

कविसंमेलनाप्रमाणे ऐटीत संपन्न झाले कुस्तीसंमेलन!

आपल्याकडे‌ साहित्यसंमेलन, विज्ञानसंमेलन, नाट्यसंमेलन, कवीसंमेलन वैगेरे नियमित आयोजित केली जातात, पण कुस्तीसंमेलनाचेदेखील राज्यात गेली तीन वर्षं शानदार आयोजन केले जात आहे, याची माहिती फार कमी क्रीडा‌प्रेमींना असेल. फलटण‌‌ येथील कुस्तीमित्र, कुस्तीवर प्रचंड प्रेम करणारे‌, कुस्तीवेडे‌ वस्ताद संपतराव जाधव, आपल्या सुजन...
Skip to content