Tuesday, September 17, 2024

‘जय’ हो!

गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात मैदानात आणि मैदानाबाहेर भारताचा दबदबा राहिला आहे. भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेक शानदार विजय मिळवून स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्येदेखील महत्त्वाच्या पदावर अनेक भारतीयांनी स्थान मिळवून तेथेदेखील भारतीय क्रिकेटची उंची वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. बीसीसीआयचे युवा सचिव ३५ वर्षीय जय शाह यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. हे अध्यक्षपद भूषविणारे शाह हे आयसीसीचे सर्वात युवा अध्यक्ष ठरणार आहेत. या अगोदर भारताच्या जगमोहन डालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन, शशांक मनोहर यांनी हे मानाचे पद भूषविले होते.

२००९ साली अहमदाबाद क्रिकेट संघटनेत कार्यकारिणी सदस्य म्हणून जय शाह यांनी प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या १५ वर्षांच्या छोट्या कालावधीत त्यांनी एकदम आयसीसीच्या अध्यक्षपदी झेप घेतली. सुरुवातीच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव हीच जय यांची ओळख होती. परंतु त्यानंतर आपल्या उत्तम प्रशासकीय कामकाजाचा ठसा जय यांनी उमटवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जास्त प्रसिद्धीच्या झोतात न राहता जय आपले कामकाज करतात, हीच त्यांची ख्याती झाली आहे. अहमदाबाद क्रिकेट संघटनेतील प्रवेशानंतर अनेक मोठी पदे घेत आता ते लवकरच आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. २००९नंतर २०१३मध्ये गुजरात क्रिकेट संघटनेचे जय सहसचिव झाले. त्यानंतर २०१५ साली बीसीसीआयच्या वित्त आणि विपणन समितीत जय यांना स्थान मिळाले. अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेले जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमच्या जडणघडणीत जय शाह यांचा मोठा वाटा राहिला आहे. सप्टेंबर २०१९मध्ये बीसीसीआयच्या सचिवपदाची मोठी जबाबदारी जय यांच्या खांद्यावर आली. त्यावेळी माजी कसोटीवीर आणि भारताचा कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होते.

२०२१मध्ये आशियाई क्रिकेट कौंसिलचे अध्यक्ष म्हणून जय निवडून आले. २०२२मध्ये आयसीसीच्या वित्त-वाणिज्य समितीत जय यांना स्थान मिळाले. २०२०-२०२१ या कोरोनाच्या कठीण काळात शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जैवसुरक्षित वातावरणात ही स्पर्धा घेण्यात आली. कोरोनाचा भारतातील प्रभाव वाढल्यानंतर मध्ये काही काळ लीग थांबविण्यात आली होती. परंतु नंतर युएईमध्ये याच्या उर्वरित सामन्यांची स्पर्धा होऊन आयपीएलची यशस्वी सांगता झाली. कोरोनाच्या त्या काळात क्रिकेट विश्वातील इतर देशात होणाऱ्या लीग थांबविण्यात आल्या होत्या, परंतु त्याही परिस्थितीत आयपीएलचे यशस्वी आयोजन करून जय यांनी आपल्यात असलेल्या उत्तम नेतृत्त्वगुणांची चमक दाखविली होती.

आपल्या सचिव पदाच्या काळात शाह यांनी काही धडाडीचे निर्णय घेतले. देशांतर्गत होणाऱ्या स्थानिक महत्त्वाच्या स्पर्धांत सर्वच खेळाडूंना खेळणे बंधनकारक करण्यात आले. जे खेळाडू खेळणार नाहीत त्याच्यावर कठोर कारवाईचा बडगादेखील उचलण्यात आला. याच कारणामुळे श्रेयस अय्यर, इशान किशन यांना करारबद्ध खेळाडू यादीतून वगळण्याचा धाडसी निर्णय शाह यांनी घेतला. पुरुषांप्रमाणेच महिला क्रिकेटपटूंनादेखील प्रोत्साहन देण्यासाठी महिलांची आयपीएल लीग दोन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आली. ऑक्टोबर २०२२मध्ये पुरुष आणि महिला भारतीय क्रिकेटपटूंना समान मानधन देण्याचा निर्णयदेखील शाह यांचाच होता. बेंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीची नव्याने उभारणी करण्यात शाह यांचे मोठे योगदान होते. तसेच २०२२मध्ये आयपीएलच्या प्रसिद्धीमाध्यमांच्या ५ वर्षांच्या हक्कासाठी बीसीसीआयला तब्बल ४८,३९० कोटी रुपये भरभक्कम रक्कम मिळाली होती. या बोलीसाठी शाह यांचे नियोजन यशस्वी ठरले.

२०२१मध्ये भारतात त्यांच्याच नेतृत्त्वाखाली बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपचे यशस्वी आयोजन केले. हनुमान भक्त असलेले जय शिस्तप्रिय आणि साधी राहणी असाच त्यांचा लौकिक आहे. ते यशस्वी उद्योजकदेखील असून आज त्यांची मालमत्ता सव्वाशे कोटी रुपये आहे. निरमा विद्यापिठातून जय यांनी बीटेकची डिग्री घेतली. २०१५मध्ये आपली कॉलेज मैत्रीण असणाऱ्या रितीशाशी जय विवाहबद्ध झाले. जय यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले. उत्तम प्रशासक आणि चांगल्या नेतृत्त्वाची क्षमता शाह यांच्यात असल्यामुळे ते आयसीसीचा कारभार नव्या उंचीवर नेऊन ठेवतील, असा विश्वास भारतीय खेळाडूंनी व्यक्त केला आहे.

आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशासाठी शाह यांच्या नेतृत्त्वाखाली बीसीसीआयने किल्ला लढवला होता. बीसीसीआयचा तो लढा यशस्वी होऊन दोन्ही स्पर्धांत क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला होता. आता बीबीसीआयच्या युवा अध्यक्षांसमोर भावी काळात मोठी आव्हाने आहेत. त्याला ते कसे सामोरे जातात हे बघणे महत्त्वाचे ठरेल. कसोटी क्रिकेट सामने जिवंत ठेवण्यासाठी आयसीसीला भविष्यात ठोस पावले उचलावी लागणार आहेत. ऑलिंपिकमध्ये क्रिकेट खेळाच्या समावेशासाठी आयसीसीला सर्वस्व पणाला लावावे लागेल. क्रिकेटची लोकप्रियता इतर देशात वाढविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारे फार कमी देश आहेत. काही मोजक्या बलाढ्य देशांचा अपवाद वगळता इतर देशांच्या खेळाच्या दर्जातदेखील सुधारणा करण्याचे मोठे आव्हान आयसीसीसमोर असेल. वाढते टी-२० आणि वन-डे सामने याचबरोबरीने कसोटी सामन्यांचादेखील समतोल राखण्यासाठी आयसीसीला प्रयत्न करावे लागतील.

बीसीसीआयचे सचिव असताना आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला भारतीय संघ जाणार नाही, असे शाह यांनी जाहीर करुन तो निर्णयदेखील अंमलात आणला. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील सामने अन्यत्र हलवण्यात आले. आता मात्र पाकिस्तानमध्ये चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. त्यातील भारताच्या सहभागाबाबतचा निर्णय शाहांसाठी परीक्षा घेणारा असेल. येत्या १ डिसेंबरला शाह आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. सध्या न्युझीलंडचे ग्रेग बार्कली हे आयसीसीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या दोन “टर्म” झाल्या असून ते तिसऱ्या “टर्म”साठी इच्छुक नसल्यामुळे शाह आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होतील. आयसीसीच्या अध्यक्षपदी असताना डालमिया, पवार, श्रीनिवासन, मनोहर यांनी केलेल्या चांगल्या कामकाजाचा ठसा शाहदेखील उमटवतील, अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमी करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पॅरालिम्पिक: भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला सलाम

पॅरिस येथे संपन्न झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करुन नवा इतिहास रचला. भारताने या स्पर्धेत प्रथमच ७ सुवर्ण, ९ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण २९ पदके मिळवून पदकतालिकेत १८वा क्रमांक मिळवला. गेल्या टोकियो स्पर्धेत भारताने १९ पदके...

लढवय्या सलामीवीर शिखर धवन!

भारताचा माजी डावखुरा लढवय्या सलामीवीर, ३८ वर्षीय शिखर धवनने अखेर आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. गेल्या २ वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघासाठी शिखरला दरवाजे बंद झाले होते. दुखापती, खराब फॉर्म आणि गिल-जयस्वाल या युवा सलामीच्या...

भारतीय हॉकीचा दर्जा उंचावणे आवश्यक

भारतीय हॉकी संघाला आगामी काळात प्रमुख आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांत चांगली कामगिरी करायची असेल तर भारतीय हॉकी संघाच्या खेळात आणखी सुधारणा होणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक राखण्यात भारतीय हॉकी संघाला यश आले. परंतु गेली...
error: Content is protected !!
Skip to content