Homeमाय व्हॉईसमुंबईत मिळतील तितक्या...

मुंबईत मिळतील तितक्या जागांवर राज ठाकरे समाधानी?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती केल्याचे जाहीर केले असले तरीही कोण किती जागा लढवणार याचा पेच अद्यापही कायम असल्याचे समजते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळतील तितक्या जागांवर समाधान मानण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली असली तरी त्या जागा जिंकून येतील अशाच हव्यात यावर त्यांनी जोर दिला आहे. त्याचवेळी राज ठाकरेंबरोबर मुंबईसह पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, मीरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली या किमान सहा महापालिकांमध्ये युती करण्यासाठी उतावीळ असलेले उद्धव ठाकरे यांनी त्याला तत्त्वतः मान्यता दिली असल्यामुळेच राज ठाकरे यांनी काल मुंबईपुरता युती जाहीर करून इतर महापालिका निवडणुकीतले आपले पत्ते गुलदस्त्यातच ठेवले, असे कळते.

मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून एका मंचावर आलेले ठाकरे बंधू गेल्या काही महिन्यांपासून वरचेवर भेटू लागले आणि या भेटीचा परिपाक युती जाहीर करण्यात झाला. गेल्या पाच महिन्यांपासून या दोघांमध्ये चर्चा चालू होती. गेल्या दोन आठवड्यांमध्ये एकमेकांचे प्रतिनिधीही चर्चेत सहभागी झाले. यात प्रामुख्याने कोणत्या कोणत्या महापालिकांमध्ये निवडणुकीत युती करायची आणि जागेचे समीकरण कसे असेल यादृष्टीने चर्चा झाली. मात्र या चर्चेअंतीसुद्धा दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप अजूनही निश्चित झालेले नाही. मात्र, या सर्व काळात दोन्ही ठाकरे बंधुंच्या समर्थकांमध्ये निर्माण झालेली भावना आणि या भावनांचा वाढता रेटा लक्षात घेऊन जागावाटप निश्चित होण्यापूर्वीच राज ठाकरेंनी शिवसेना (उबाठा)बरोबरच्या युतीची घोषणा केली.

ठाकरे

गेल्या चार वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्याआधी पाच वर्षे तेव्हाची अखंड शिवसेना सत्तेत आली तीसुद्धा बऱ्याच लटपटी-खटपटी करून… त्यावेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे लढले होते. यात शिवसेनेला 84 तर भाजपाला 82 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी सत्तेत असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारला स्थैर्याची निकड होती. ही निकड पूर्ण करताना भाजपाने शिवसेनेला महापौरपद देऊ केले आणि सत्तेत सहभागी न होता पहारेकरी म्हणून बसण्याची तयारी केली व ते बसलेही. दरम्यानच्या काळात तेव्हाच्या शिवसेनेने मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांचे पक्षांतर घडवून त्यांना आपल्या गोटात घेतले आणि पक्षाचे संख्याबळ 90 वर नेले. पुढे काही अपक्ष आणि इतर लहान पक्षांचे सहकार्यसुद्धा त्यांना मिळाले आणि पाच वर्षे त्यांनी सत्ता राबवली. याच काळात कोविडची महामारी आली त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी होते. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला सरकारकडूनही पूर्ण पाठिंबा मिळाला, पण कोविडच्याच काळात खिचडी घोटाळा, मृतदेहांच्या पेट्यांचा कफन घोटाळा झाल्याचा आरोप झाला.

शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक बाहेर पडले आणि ठाकरे सरकार गडगडले. यानंतर मात्र ठाकरेंना आपला पक्ष अजूनही पूर्णपणे सावरता आलेला नाही. पक्षातली पडझड अजूनही सुरूच आहे. पक्षाला सावरण्यापेक्षा ते सत्ताधाऱ्यांवर दुगाण्या झाडण्यातच धन्यता मानतात. राज ठाकरेंना यापूर्वीही सत्ता मिळवणे आणि राज्य करणे अशी ईर्शा कधीही नव्हती. त्यांना फ्क्त सेलेब्रीटीच्या थाटात, किंगमेकरच्या भूमिकेत वावरायला आवडते. या माध्यमातून जे काही फायदे मिळतील ते घ्यायचे हे त्यांचे आतापर्यंतचे धोरण राहिले आहे. याकरीता आपले अस्तित्त्व टिकवायचे, ते दाखवायचे आणि आपली न्यूझन्स व्हॅल्यू वाढवायची हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आतापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिला आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना (उबाठा)बरोबर युती करताना राज ठाकरेंनी कमी जागा मिळाल्या तरी चालतील, पण त्या निवडून येण्यासारख्या असाव्यात अशी अट घातल्याचे समजते. उद्धव ठाकरेंना ते पुरते ओळखून आहेत. किंबहुना त्याचमुळे साधारण 20 वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कार्यरत असतानाही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून मनसे स्थापन केली. त्यामुळे जागावाटपात उद्धव ठाकरेंकडून दगाफटका होऊ नये म्हणून राज ठाकरेंनी सेना (उबाठा)बरोबरची युती फक्त मुंबईपुरताच जाहीर केली. इतर ठिकाणच्या युतीची घोषणा अजूनही जाहीर केली नाही.

ठाकरे

23 डिसेंबरपासून महापालिका निवडणुकीसाठी नामांकनअर्जही दाखल होण्यास सुरूवात झाली. येत्या 30 तारखेपर्यंत उमेदवारीअर्ज दाखल करण्याची मुदत आहे. असे असतानाही केवळ निवडणुकीसाठी मुले पळवणाऱ्या दोन टोळ्या फिरत आहेत. त्यामुळे उमेदवारांचीही घोषणा होणार नाही. प्रत्येक उमेदवाराला थेट कळवले जाईल. जागावाटपाबाबत काहीही माहिती दिली जाणार नाही, असे सांगत राज ठाकरेंनी युती जाहीर करण्याकरीता घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यालाच बगल दिली. राज ठाकरेंनी फक्त मुंबईपुरता युती जाहीर केल्यानंतरही एका प्रश्नाच्या उत्तरात नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर युती काल रात्री जाहीर करण्यात आल्याचे सांगत आपण युतीसाठी किती अगतिक व बेचैन आहोत हे दाखवून दिले. महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी, एकही पक्ष त्यात राहिला नाही. मात्र महाविकास आघाडी कायम आहे, असे सांगत आघाडी पुरती निकालात निघाल्याचे सूचित केले.

अजितदादांची राष्ट्रवादी निवडणुकीनंतर महायुतीत

या निवडणुकीत मनसेशी सोबत केल्यास मराठीतेर तसेच मुसलमानांची मते खेचण्यात अडचणी निर्माण होतील, हे ओळखून काँग्रेसने मुंबईत या युतीबरोबर न जाता स्वबळाचा नारा दिला. हिंदुत्व आणि मराठीबरोबरच मराठीतेर मतदारांना खेचण्यासाठी भाजपा तसेच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला लांब ठेवले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीकडून मुसलमान मतांनाही जवळ केले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला नवाब मलिक यांना निवडणूकप्रमुख म्हणून नेमले गेल्याचे कारण पुढे करत भाजपा व शिवसेनेने युतीत घेतले नाही. निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत भाजपा व शिवसेना राष्ट्रवादीला सहभागी करून घेणार आहे. याचदृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे कळते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजपा-सेना युतीविरोधात लढणार आहे.

शरद पावारांचे दोन्ही दगडांवर पाय

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांनी मुंबईत ठाकरे बंधुंबरोबर किंवा काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. या दोन्ही ठिकाणी जागावाटपासाठी त्यांच्याकडून प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते. पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांनी अजित पवार यांच्या पक्षाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

(लेखक महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

रडारड पक्षकार्यकर्त्यांची! अगदी संजय राऊतांसह!!

महाराष्ट्रात मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. आता माघारीचे पर्व सुरू झाले आहे. यामध्ये कोणाची, कुठे आणि कोणाबरोबर, कोणत्या पातळीवर, युती किंवा आघाडी झाली हे हळूहळू स्पष्ट होईलच,...

ठाकरेसाहेब, बरे झाले हो नागपूरला आलात! फार उपकार झाले बघा महाराष्ट्रावर!!

महाराष्ट्र विधिमंडळाचे छोटेखानी अधिवेशन नागपूरमध्ये नुकतेच पार पडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अधिवेशनात फार काही होईल अशी अपेक्षा कोणी बाळगलेलीही नव्हती. मात्र नेहमीप्रमाणे विदर्भ आणि मराठवाडा या भागासाठी काही चांगल्या आणि भरघोस घोषणा केल्या जातील ही...

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण अमित शाहांच्या दरबारी! मध्यरात्रीनंतर गुफ्तगू!!

महाराष्ट्रातल्या मुंबईसह अनेक महापालिकांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला कसे सामावून घ्यायचे यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी रात्री भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतली. मध्यरात्रीनंतर...
Skip to content