Thursday, April 17, 2025
Homeटॉप स्टोरीजाधवांचे घोडे दामटल्याने...

जाधवांचे घोडे दामटल्याने उबाठाचे विरोधी पक्षनेतेपद लांबणीवर?

महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षांचे संख्याबळ न पाहता विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी राज्य सरकारने तयारी दाखवताना सुचविलेले सुनील प्रभू यांचे नाव डावलून भास्कर जाधव यांचे नाव शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दामटल्याने विरोधी पक्षनेतेपदाची नेमणूकच आता लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. कालच शिवसेनेच्या उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाकरीता भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केला असल्याचे माध्यमांना सांगितले. मात्र, यावर अनुकूल निर्णय घेण्याऐवजी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ जाधव यांच्या गळ्यात घालण्यापूर्वी सर्व तांत्रिक बाबी तपासण्याचा पवित्रा विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतल्याचे कळते. त्यामुळे उबाठाने भास्कर जाधव यांचे नाव विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मुक्रर केले असले तरी इतक्यात तरी त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जाते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतले घटकपक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांनी घवघवीत यश मिळवले. विरोधी पक्ष म्हणून वावरणाऱ्या महाविकास आघाडीला या निवडणुकीत सपशेल अपयश आले. 288 जागांपैकी महायुतीकडे 237 जागा आल्या तर महाविकास आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या मिळून 51 जागा निवडून आल्या. यात सर्वात जास्त आमदार शिवसेनेच्या उबाठा गटाचे आहेत. उबाठाने या निवडणुकीत वीस जागा जिंकल्या. त्याखालोखाल काँग्रेसने 16 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने दहा जागा जिंकल्या. विधानसभेमध्ये सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद दिले जाते. मात्र कॅबिनेट दर्जाचे हे विरोधी पक्षनेतेपद देण्याची जबाबदारी देण्याचे सर्व अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांकडे आहेत. लोकसभेतल्या 2006च्या सुधारणेनुसार एकूण सदस्यांच्या दहा टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षालाच विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता येतो. हा निकष विधानसभेलाही लागू होतो का, त्याचप्रमाणे इतर राज्यांच्या विधानसभांमध्ये कोणते नियम आहेत, याची माहिती घेऊन निर्णय घेण्याचा पवित्रा विधानसभा अध्यक्षांनी घेतल्याचे कळते. लोकसभेतला निकष विधानसभेकरीता लावल्यास कोणत्यातरी एका विरोधी पक्षाने किमान 28 जागा जिकायला हव्यात. इतक्या जागा कोणालाही जिंकता आलेल्या नाहीत. त्यामुळे लोकसभेचा नियम येथे वापरला तर कोणत्याही पक्षाला मिळणार नाही. मात्र याबाबतचा निर्णय अध्यक्ष घेऊ शकतात.

विरोधी

दरम्यान, विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी कोणते निकष आहेत का, अशी विचारणा उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानमंडळ सचिवांकडे केली होती. त्यावर त्यांना दिलेल्या उत्तरात तशी कोणतीही कायदेशीर तरतूद करण्यात आलेली नसल्याचे विधानमंडळ सचिवालयाने कळवले असल्याचे समजते. त्यामुळे कालच उबाठा गटाकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाबाबत दावा केला गेला. काँग्रेसने सुरूवातीला उबाठाच्या या दाव्याला विरोध केला. परंतु उबाठाने विधान परिषदेतले विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवल्याने काँग्रेसने त्याला मान्यता दिल्याचे समजते. विधान परिषदेत विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसचे संख्याबळ उबाठापेक्षा जास्त आहे.

शिवसेनेच्या उबाठा गटाने याआधीच आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव आधीपासूनच शड्डू ठोकून बसले आहेत. आपल्याला अशी संधी मिळणार नाही अशी खात्री वाटल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी एका जाहीर सभेत आपल्याला आपली क्षमता वापरायला मिळत नाही अशी खदखद व्यक्त केली होती. मात्र अधिवेशन सुरू होण्याआधीच ठाण्यामध्ये झालेल्या उबाठाच्या मेळाव्यात त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवताना त्यांना चोराची अवलाद असे संबोधले. भास्कर जाधव यांची ही बदललेली भूमिका ‘मातोश्री’ला खूश करण्यासाठी होती आणि त्यात त्यांना यश आले. त्यांच्या नावाची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी घोषणा करण्यात आली. परंतु भास्कर जाधव यांचा एकूण आक्रमक स्वभाव लक्षात घेऊन आणि त्यांनी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली जळजळीत टीका पाहता सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या नावाला मान्यता मिळण्याची शक्यता कमी आहे. याच भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत 5 जुलै 2021 रोजी विधानसभेत पीठासीन अधिकारी असताना भाजपाच्या १२ आमदारांना गैरवर्तणुकीच्या आरोपावरून निलंबित केले होते.

विरोधी

उबाठाने विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड केली असली तरी त्यांना विरोधी पक्षनेतेपद देऊ नये असा एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आग्रह होता व आहे. एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांच्या नावाला काहीसे अनुकूल असले तरीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मात्र ठाकरे परिवाराला कडाडून विरोध आहे. तो लक्षात घेऊन ते तशी भूमिका घेण्याची शक्यता फार कमी आहे. उद्धव ठाकरे यांनी ही चाचपणी केल्यानंतर तसेच पक्षांतर्गत असलेली खदखद लक्षात घेऊन पुत्रप्रेमाला काही प्रमाणात तिलांजली देत भास्कर यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे केला. मात्र सत्ताधाऱ्यांनी सुचविलेले सुनील प्रभू यांचे नावही मान्य केले नाही. मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू हे उबाठाचे जरी आक्रमक नेते असले तरी ते एक संयमी नेते म्हणून ओळखले जातात. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये विधिमंडळाच्या सभागृहात कशा पद्धतीने भूमिका घेतली पाहिजे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्याशिवाय ते उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतले आहेत. सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप राहणार नाही, असे सत्ताधाऱ्यांकडून सुचविण्यात आले होते. परंतु ठाकरेंनी ते मान्य केले नसल्याचे कळते.

Continue reading

‘एप्रिल मे 99’ने होणार मराठी चित्रपट महोत्सवाला सुरूवात

मुंबईच्या प्रभादेवीतल्या महाराष्ट्र कला अकादमीमधील पु. ल. देशपांडे सभागृहात येत्या २१ ते २४ एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४१ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन २१ एप्रिलला सायंकाळी ६...

इरेडाने जाहीर केला 1,699 कोटींचा निव्वळ नफा!

एनबीएफसी आणि बँकिंग क्षेत्रातील लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करणारी ठरली पहिली कंपनी ठरतानाच भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने (इरेडा) 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक 1,699 कोटी रुपयांचा करपश्चात म्हणजेच निव्वळ नफा जाहीर केला आहे. कंपनीने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी त्यांचे...

दादर-माटुंगा केंद्रात रंगला संगीत नाट्यमहोत्सव

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी संस्था गेली १६ वर्षे हा महोत्सव आयोजित करत आहे. संगीत अमृतवेल हे खल्वायन, रत्नागिरी निर्मित, आणि डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित, मनोहर...
Skip to content