Tuesday, March 11, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसदेवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे...

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री?

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे मावळते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला भाजपाचे केंद्रीय नेतृत्त्व मान्यता देणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १३२ जागा जिंकल्या तर शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. तसेच या तीनही पक्षांचे सहयोगी अशा प्रत्येकी तीन सदस्यांचा त्यांना पाठिंबा आहे. अशा स्थितीत भाजपाकडे तब्बल १३५ आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे भाजपाला बहुमताकरीता फक्त दहा सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे, जी कधीही आणि कशीही पूर्ण होऊ शकते हे महायुतीतले भाजपाचे सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही जाणतात. त्यामुळेच आमदारांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

फडणवीस

शिवसेना वा राष्ट्रवादी, यापैकी एक जरी पक्ष भाजपाबरोबर राहिल्यास भाजपाचे सरकार निर्विवादपणे बहुमतात येते. त्यामुळे दुसरा पक्ष याला आडकाठी न करता सरकारमध्ये सहभागी होईल. जर महायुतीतला एकही मित्रपक्ष सोबत नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलेल्या भाजपाच्या आमदारांची संख्या इतकी आहे की त्यांच्या जोरावर भाजपा एकट्याच्या जीवावर अल्पमतातले सरकार काही काळ सहजपणे चालवू शकते. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाच्या भाजपाच्या दाव्याला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विरोध राहणार नाही. राहता राहिला मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा, तर त्यांना नव्या सरकारमध्ये एकतर देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागणार किंवा त्यांचा उपमुख्यमंत्रीपदासाठी उत्तराधिकारी नेमून केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद घ्यावे लागेल.

भाजपाला महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद घ्यायचे असल्यास सध्यातरी त्यांच्यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतरही ज्या पद्धतीने मनोज जरांगेंचे आंदोलन झेलत त्यांनी भाजपाला घवघवीत यश मिळवून दिले त्याचे फळ त्यांना निश्चितच द्यावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर काम करताना आलेला अनुभव लक्षात घेऊन फडणवीसच असे एक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत जे पाच वर्षे अगदी सहज सरकार चालवू शकतील. एकनाथ शिंदे तसेच अजित पवार या दोघांकडेही असलेल्या आमदारांची संख्या दुर्लक्ष करण्यासारखी नाही. त्यामुळे मंत्रीमंडळात त्यांच्या आग्रहवजा दादागिरीला तोंड देण्याची क्षमता फडणवीसांकडेच आहे, हे भाजपाचे पक्षश्रेष्ठी जाणतात. प्रसासनावरची पकड, जनाधार आणि सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर असलेला समन्वय यातही फडणवीस कोठेही कमी पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत द्यावे.

फडणवीस

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही फडणवीस यांच्या नावाला भाजपा नेत्यांनी हिरवा कंदिल दाखवल्याचे म्हटले आहे. शिवसेनेचे काही नेते शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाकरीता आग्रही आहेत. परंतु भाजपाच्या श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपद भाजपाकडेच ठेवण्याची भूमिका घेतल्यानंतर स्वतः शिंदे यांनीही त्याला अप्रत्यक्ष दुजोरा देत यावरून महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. महायुती म्हणून आपण एकत्र लढलो. आजही महायुती भक्कम आहे आणि उद्याही ती भक्कम राहील. माझ्यावरील प्रेमाखातीर कोणीही मुंबईत येऊ नये. वर्षा, या शासकीय निवासस्थानी जमू नये, असे आवाहनही स्वतः शिंदे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टद्वारे केले आहे.

भाजपा मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवणार असल्याने फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद देताना त्यांच्याकडील गृह खाते पुढेही त्यांच्याकडेच राहील. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (उपक्रमे) ही खाती राहतील तर अजितदादांकडे अर्थ व नियोजन ही खाती राहतील. उरलेल्या खात्यांचे वाटप करताना सर्व पक्षांना न्याय मिळेल असे पाहिले जाईल. त्यासाठीच नवे सरकार स्थापन होण्यास दोन-चार दिवस लागतील, असे बोलले जाते. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोठ्या स्वरूपात शपथविधीचा कार्यक्रम घेण्यात येईल. यादृष्टीने पंतप्रधानांची वेळ कधी मिळते यावरही सरकार स्थापनेचा मुहूर्त निश्चित होईल, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सध्याच्या विधानसभेचा कार्यकाल संपत असल्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपविला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी शिंदे यांना पुढचे सरकार स्थापन होईपर्यंत कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून कारबार पाहण्याचे आदेश दिले.

Continue reading

धनंजय मुंडेंचा राजीनामा! आता टार्गेट पंकजाताई?

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्याप्रकरणानंतर पकडण्यात आलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराडबरोबर जवळचे संबंध असल्याच्या आरोपावरून आज अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी...

नराधम कोण? बलात्कार करणारा की पोलिसाविरुद्धच खोटा गुन्हा दाखल करणारा?

गुन्हेगार ठरण्याआधीच नराधम ठरवणारे तुम्ही कोण? गेल्या तीन दिवसांपासून पुण्याच्या स्वारगेट बसडेपोत उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसमध्ये झालेल्या कथित बलात्काराचे प्रकरण मराठी वृत्तवाहिन्यांवर दिवसरात्र गाजतंय. या कथित बलात्कारप्रकरणी आता संशयित आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक झाली आहे. 26...

महाकुंभातल्या महिलांचे ‘व्हिडिओ’ विकणारे दोघे महाभाग महाराष्ट्रातले!

उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात पवित्र स्नान करणाऱ्या तसेच स्नानानंतर कपडे बदलणाऱ्या महिलांचे लपतछपत व्हिडिओ काढून विकणाऱ्या तीन महाभागांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली असून त्यात महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश आहे. व्रज पाटील आणि प्रज्वल तेली अशा महाराष्ट्रातल्या दोन...
Skip to content