राज्यात होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा राग आळवतानाच कर्नाटकातल्या विजयामुळे जोशात असलेल्या काँग्रेसने स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. पुण्याच्या लोकसभा निवडणुकीपुरताच आपला दावा मर्यादित न ठेवता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक ताकद असल्याचे स्पष्टच सांगितले. इतकेच नव्हे तर गौतम अदाणी शरद पवार यांच्या घरी राहयला गेले तरी अदाणीच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आघाडीत आता ठाकरे गटही असल्यामुळे स्थानिक स्तरावर समन्वय असणे महत्त्वाचे असल्याचे सांगत आघाडीत बिघाडीचीच लक्षणे दिसत असल्याचे सूचित केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आजपासून दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे. प्रत्येक जागेचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेसची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. काँग्रेस सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या जागावाटपावर काही परिणाम होणार नाही. भाजपाचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य असून या बैठकीनंतर मविआच्या बैठकीत पुढची रणनिती निश्चित केली जाईल, असे पटोले यांनी सांगितले.

३० मतदारसंघात भाजपाच्या महत्त्वाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. देशभर काँग्रेस हाच पर्याय असून भाजपाविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त, ४८ जागा असणारे राज्य आहे. या प्रत्येक जागेवर विजयी होण्यासाठी काय करता येईल याची व्यूहरचना या बैठकीत ठरवली जाणार आहे. मविआचे घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट पक्षालाही जागावाटपावेळी विचारात घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगपती अदाणी यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, कोण कोणाला भेटतो याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. अदाणी पवारांच्या घरी राहयला गेले तरी आम्हाला त्याचे काही नाही. ते कोणाला भेटतात, हा आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न नाही. अदाणी व काँग्रेसची वयैक्तिक दुश्मनी नाही. परंतु आमचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. मोदी-अदाणी यांचा संबंध काय? आणि अदानीच्या कंपनीत २० हजार कोटी रुपये कुठून आले? सर्व कंपन्या अदाणींनाच का विकल्या जात आहेत? अदाणी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी ही काँग्रेसची मागणी कायम आहे. मोदी सरकार ही मागणी मान्य का करत नाही? हा जनतेच्या पैशाचा प्रश्न आहे म्हणून काँग्रेस जाब विचारत राहणार, कोणाला व्यक्तिगत संबंध ठेवायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे.

काँग्रेसची लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक आजपासून
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबईत टिळक भवन, या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून बैठकीला राज्यातील प्रमुख नेते व सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. आज पहिल्या दिवशी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या मतदारसंघाचा आढावा घेतला गेला. शनिवारी पुणे, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सोलापूर, माढा, बारामती, शिरुर, मावळ, रायगड, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, ठाणे, भिवंडी व कल्याण या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे सर्व माजी मंत्री, विधान परिषद गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित असतील. लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, २०१९च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्षही या बैठकीला उपस्थित आहेत.

स्थानिक पातळीवर समन्वय महत्वाचा – अशोक चव्हाण
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहेच. पण आता या आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय राहणे महत्त्वाचे आहे. चर्चअंती मविआचा जो उमेदवार ठरेल त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काँग्रेस राज्यातील ४८ मतदारसंघातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दोन दिवसांची आढावा बैठक घेत आहे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले.
या बैठकीतून प्रत्येक मतदारसंघातील नेते व पदाधिकारी यांचे मत काय आहे, त्यांच्या भागात कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत याची साधकबाधक चर्चा होणार आहे. या बैठकांनंतर जिल्हा पातळीवर जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील. २०१९ची परिस्थिती व आत्ताची परिस्थिती यात फरक आहे. एखाद्या निवडणुकीत जागा कमी जिंकल्या म्हणजे तीच परिस्थिती कायम राहत नसते, परिस्थिती बदलत असते. सर्व बाजूंचा विचार करुन निर्णय घेतला जाईल. तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपाचा पराभव करणे कठीण नाही. जागावाटपावरून महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. आम्ही एकत्र राहून भाजपाला पराभूत करू, असेही त्यांनी सांगितले.

