Thursday, November 21, 2024
Homeएनसर्कलमनसुख हिरेन हत्त्येचा...

मनसुख हिरेन हत्त्येचा तपास अखेर एनआयएकडेच!

मनसुख हिरेन यांच्या हत्त्येचे प्रकरण एटीएसकडून काढून ते अखेर एनआयएकडे सुपूर्द करण्याचे आदेश महाराष्ट्रातल्या ठाणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातल्या आरोपींना सर्व कागदपत्रांसह संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एनआयएकडे सोपविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबईतल्या एँटिलिया, या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीची तसेच या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एसआयटीकडे सोपविला होता. परंतु केंद्र सरकारने स्कॉर्पिओचे प्रकरण एनआयएकडे चौकशीसाठी सोपविले आणि राज्य सरकारला नाईलाजाने हा तपास एनआयएकडे सोपवावा लागला.

हा तपास एनआयएकडे गेल्यावरही शासनाने मनसुख हिरेन प्रकरण एटीएसकडेच तपासासाठी राखले. स्कॉर्पिओचा तपास हाती घेतल्यानंतर लगेचच एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेची जवळजवळ १२ तास चौकशी केली आणि लगेचच त्याला अटकही केली. त्यामुळे वाझेला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या राज्य सरकारचे धाबे दणाणले. त्यानंतरही मनसुख हिरेन प्रकरणात वाझेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. वाझेने ठाणे न्यायालयात केलेल्या अंतरीम जामीन अर्जाच्या सुनावणीत एटीएसने मनसुख प्रकरणाच्या चौकशीसाठी वाझेचा ताबा मागितला. न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलल्याने हा ताबा पोलिसांना मिळाला नाही.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटींच्या वसुलीचे काम वाझेकडे सोपविल्याचा गौप्यस्फोट एका पत्राद्वारे केला. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. मात्र, यानंतर लगेचच एटीएसकडून मनसुख प्रकरणात दोघा आरोपींना अटक करण्यात आली व सचिन वाझेला मुख्य आरोपी करण्यात आले. एक व्हॉल्वो कारही पोलिसांनी जप्त केली. या तत्परतेबद्दल केंद्रीय विधि व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आश्चर्यही व्यक्त केले होते.

मनसुख हिरेन

मनसुख हिरेन, एँटलिया प्रकरणातल्या स्कॉर्पिओचे मालक असल्यामुळे त्यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपासही एनआयएने करावा, असे निर्देश केंद्रीय गृह खात्याने दिले. मात्र, तरीही हा तपास एआयएकडे सोपविण्याऐवजी एटीएसच त्याचा तपास करत होते. काल एटीएसचे प्रमुख जयजीत सिंह यांनी या तपासाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी अर्धा तास चर्चाही केली. त्यामुळे आज एआयएने आज ठाणे सत्र न्यायालयात स्वतंत्र अर्ज करून महाराष्ट्र सरकार मनसुख प्रकरणाचा तपास आपल्याकडे सोपवायला तयार नसून त्यांना तसे आदेश द्यावेत, अशी विनंती केली. न्यायालयाने ती मान्य करत हा तपास एनआयएकडे सोपविण्याचे आदेश दिले.

त्याआधी मंगळवारी मनसुख हिरेन यांच्या हत्त्येशी काहीही संबंध नसल्याचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने केलेले दावे खोटे असून त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत, अशी माहिती पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांनी दिली.

एटीएसने ७ मार्च रोजी अनोळखी व्यक्तींविरोधात मनसुख यांच्या हत्त्येचा गुन्हा नोंदवला. हिरेन कुटुंबाने संशय व्यक्त केल्याने ८ मार्चला वाझेला चौकशीसाठी एटीएसने बोलावले होते. चौकशीदरम्यान वाझेने सर्व आरोप फेटाळले. मात्र तपासादरम्यान वाझेनेच मनसुख यांची हत्त्या घडवली हे स्पष्ट करणारे सबळ पुरावे आमच्या हाती लागले, असा दावा सिंह यांनी केला.

केंद्रीय गृह विभागाने गेल्या आठवड्यात मनसुख हत्त्येचा तपासही एनआयएकडे सोपवला. मात्र एटीएसने ठाणे येथील मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांकडून वाझेचा एनआयएकडून ताबा घेण्यासाठी ट्रान्स्फर वॉरंट मिळवले. याबाबत २५ मार्चला एनआयएच्या विशेष न्यायालयातही अर्ज केला जाणार आहे. वाझेचा या गुन्ह्यातील सहभाग उघड करणारे पुरावे हाती लागल्याने त्याची अटक, कोठडीतील चौकशी अनिवार्य आहे. त्याआधारे मनसुख यांच्या हत्त्येमागील हेतू, सहआरोपींची माहिती उघड होऊ शकेल, असेही सिंह म्हणाले.

मनसुख हिरेन

आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली सिम कार्ड व मोबाइल नष्ट केल्याची माहिती मिळाली आहे. एटीएसने याप्रकरणी दोघा आरोपींना अटक केली आहे. नरेश गोर आणि विनायक शिंदे अशी त्यांची नावे आहेत.

नरेश गोर बुकी असून त्याचे मुंबई, ठाण्यात पत्त्याचे अवैध क्लबही आहेत.  त्याने आपल्या साथीदाराकरवी गुजरातच्या एका कंपनीच्या नावे काही सिम कार्ड मिळवून वाझेच्या सूचनेनुसार ती सहआरोपी विनायक शिंदेला दिली. शिंदे बहुचर्चित लखनभैया हत्त्या  प्रकरणातील आरोपी असून सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. कोरोनाच्या निमित्ताने पॅरोल मिळवत कारागृहाबाहेर आलेला शिंदे वाझेच्या सतत संपर्कात होता. मनसुख यांच्या हत्येत त्याचा प्रत्यक्ष सहभाग आढळल्याची माहितीही सिंह यांनी दिली.

एटीएस पथकाने दमण येथून जप्त केलेल्या वोल्वो गाडीत आरोपींनी मनसुख यांची हत्त्या केल्याचा संशय एटीएसला आहे. ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी मंगळवारी कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ञांनी गाडी बारकाईने तपासली. ही गाडी दमण येथील रहिवासी अभिषेक अगरवाल यांच्या मालकीची आहे.

अभिषेक यांचा बॅटरीवर चालणाऱ्या सायकल, लहान मुलांच्या स्कूटर विक्रीचा व्यवसाय आहे. निलंबनात असताना वाझे अभिषेक यांच्या व्यवसायात भागीदार होते. तेव्हापासून अभिषेक-वाझे एकमेकांना ओळखतात. ४ मार्चदरम्यान वाझेने ही गाडी काही कारणास्तव आपल्या ताब्यात घेतली होती.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content