अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन कार्यकाळात भारतातील मतदान प्रक्रियेसाठी अमेरिकेने दिलेल्या 21 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फ्लोरिडातील मियामी येथे झालेल्या एफआयआय प्रायोरिटी शिखर परिषदेला संबोधित करताना ट्रम्प यांनी अमेरिकन निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतीयांना अमेरिकेत दुसऱ्याला कुणाला तरी निवडून आणायचे होते, असा अप्रत्यक्ष आरोपही ट्रम्प यांनी केला.
ट्रम्प यांनी म्हटले आहे की, भारतातील मतदान प्रक्रियेसाठी आपल्याला 21 दशलक्ष खर्च करण्याची आवश्यकता का आहे? मला वाटते की, ते दुसऱ्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करत होते. आपल्याला भारत सरकारला ठणकावून सांगावे लागेल. रशियाने अमेरिकेत सुमारे दोन हजार डॉलर्स खर्च केले. त्या तुलनेत भारतीय खर्च खूप मोठा होता. रशियाने दोन हजार डॉलर्स काही इंटरनेट जाहिरातींवर खर्च केला.
ट्रम्प यांनी भारताची मजबूत आर्थिक स्थिती आणि अमेरिकन वस्तूंवरील उच्च करांकडे लक्ष वेधले. त्यांनी म्हटले की, भारताला करांतून खूप पैसे मिळाले. भारत हा अमेरिकेच्या बाबतीत जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतातील शुल्क खूपच जास्त असल्याने अमेरिकी उद्योग तिथे आता क्वचितच प्रवेश करू शकतात. हाच मुद्दा धरून ट्रम्प यांनी परदेशातील मतदानावर लाखो डॉलर्स खर्च करण्याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. ट्रम्प पुढे म्हणाले की, मला भारताबद्दल खूप आदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिका दौऱ्यावर आले होते; पण आम्ही भारतातील मतदानासाठी 21 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देत आहोत. अमेरिकेतील मतदानाचे काय? अरे, आम्ही इकडे 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केले. त्याला लॉकबॉक्स म्हणतात.