Homeब्लॅक अँड व्हाईटपेनल्टी कॉर्नरवर हमखास...

पेनल्टी कॉर्नरवर हमखास गोल करणाऱ्या खेळाडूंची भारताकडे वानवा

बिहारमधील राजगीर शहरात झालेल्या दहाव्या आशियाई‌ चषक हॉकी स्पर्धेत हरमनप्रीत सिंगच्या यजमान भारतीय हॉकी संघाने जेतेपदाचा शानदार विजयी चौकार लगावला. आशिया खंडातील या प्रतिष्ठेच्या हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावून भारताने पुढील वर्षी हॉलंड, बेल्जियम येथे होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीचे तिकिट पक्के केले. अंतिम सामन्यात भारताने काहीशा एकतर्फी लढतीत गतविजेत्या बलाढ्य दक्षिण कोरियाचा ४-१ गोलांनी सहज पराभव केला. सामन्याच्या सुरूवातीला पहिल्याच मिनिटाला सुखजित सिंगने पहिला गोल करून भारताचे खाते उघडले. त्यानतंर भारताने कोरियावर दबाव टाकला. चेंडूवर सुरूवातीपासून नियंत्रण मिळवले. पहिल्या दोन सत्रात भारताने सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. चेंडू बराच वेळ कोरियन गोलक्षेत्रात ठेवण्यात भारतीय आघाडी फळीतील खेळाडूंना यश आले. त्यामुळे गोलरक्षक पाठक, करकेरा या दोघांना बचाव करण्याचे फारसे कामच राहिले नाही. मग तोच दबाव‌ शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात भारताला यश आले. भक्कम बचाव आणि जोरदार आक्रमण याचा सुरेख मिलाफ साधून भारताने कोरियाला विजयाची बिलकुल संधीच दिली नाही. दोन गोल करणारा‌ दिलप्रीत सिंग भारतीय विजयाचा शिल्पकार होता तर अमित रोहिदासने चौथा गोल करून भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

कोरियाच्या सॉनने पेनल्टी कॉर्नरवर त्यांचा एकमेव गोल केला. पण त्यामुळे सामन्याच्या निकालात फारसा फरक पडणारा नव्हता. उभय संघातील साखळी लढत २-२ गोलांनी बरोबरीत सुटली होती. पण निर्णायक लढतीत भारताने ही बरोबरीची कोंडी सहज फोडली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करुन भारतीय विजयात मोलाची भूमिका बजावली. तेव्हढीच साथ सहकाऱ्यांची मिळाल्यामुळे भारताला पुन्हा एकदा या चषकावर नाव कोरण्यात यश आले. तब्बल आठ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाने या स्पर्धेत बाजी मारली. २०१७मध्ये ढाक्का येथे झालेली स्पर्धा भारताने शेवटी जिंकली होती. तर त्याअगोदर २००३, २००७मध्ये भारत या स्पर्धेत विजेता होता. दक्षिण कोरियाने सर्वाधिक पाचवेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

‘अ’ गटात समावेश असलेल्या भारताची या स्पर्धेत सुरूवात फारशी चांगली झाली नाही. सलामीच्या सामन्यात चीनवर विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या भारताची चांगलीच दमछाक झाली. अखेर कप्तान हरमनप्रीत सिंगच्या शानदार खेळामुळे भारताने हा सामना ४-३ गोलांनी जिंकला. हरमनप्रीत सिंगने ३ गोल केले तर जुगराजने १ गोल केला. दुसऱ्या सामन्यातदेखील जपानवर भारताने ३-२ गोलांनी निसटता विजय मिळवला. पुन्हा एकदा कप्तान हरमनप्रीत सिंग भारताच्या मदतीला धावून आला. त्याने २ गोल केले. तिसरा गोल मनदीप सिंगने केला. भारतीय गोलरक्षक कृष्णन बहादूरचा हा १५०वा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याच्या भक्कम बचावामुळे भारताने ही लढत जिंकली. तिसऱ्या सामन्यात मात्र नवख्या कझाकिस्तानचा भारताने १५-० गोलांनी धुव्वा उडवून या गटात अव्वल क्रमांक मिळवून आपला सुपर फोरमधील प्रवेश निश्चित केला. अभिषेकने ४ तर सुखजीत सिंगने ३ गोल करून भारताला मोठा विजय मिळवून‌ दिला. ओमानने शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे कझाकिस्तानला ऐनवेळी स्पर्धेत प्रवेश देण्यात आला.

‘ब’ गटात पहिल्या लढतीत मलेशियाने बांगलादेशचा सहज पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात मलेशियाने गतविजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव करून स्पर्धेत धमाल उडवली. शानदार हॅटट्रिक करणारा अनूर‌ मलेशियाच्या विजयाचा हिरो होता. तिसऱ्या सामन्यात त्यांनी नवख्या तैवानला नमवून या गटात अव्वल क्रमांक मिळवला. अ गटातून भारतापाठोपाठ चीनने दुसरा क्रमांक मिळवून सुपर फोरमधील आपला प्रवेश निश्चित केला. चीन, जपानचे समान गुण झाले होते. पण सरस ‌गोलफरकाच्या आधारे चीनचा या गटात दुसरा क्रमांक लागला. ब गटातून मलेशियापाठोपाठ दक्षिण कोरियाने दुसरा क्रमांक मिळवला. सुपर फोरमधील पहिली भारत, दक्षिण कोरिया लढत २-२ गोलांनी बरोबरीत सुटली. कोरियाच्या भक्कम बचावापुढे भारतीय आघाडी फळी ढेपाळली. त्यातच नव्या डावपेचांचा अभाव भारतीय संघात जाणवला. पाच पेनल्टी कॉर्नर मिळूनदेखील त्यावर गोल करण्यात भारताला अपयश आले. सामना संपायला थोडा वेळ बाकी असताना मनदीप सिंगने गोल करून भारताचा पराभव टाळण्यात यश मिळविले. दुसऱ्या सामन्यात मलेशियाला भारताने ४-१ गोलांनी सहज नमविले. सामन्यातील दुसऱ्या मिनिटाला शफिक हसनने गोल करून मलेशियाचे खाते उघडले. मग या धक्क्यातून भारताने सावरत पहिल्या दोन सत्रात झटपट ४ गोल करून मलेशियाच्या आक्रमणातील हवा काढून टाकली.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगचा हा २५०वा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्या सामन्यात त्याच्या सहकाऱ्यांनी कप्तानाला विजयाची आगळी भेट दिली. शेवटच्या सुपर फोरमधील लढतीत भारताने चीनचा ७-० गोलांनी दणदणीत पराभव करून आपला अंतिम फेरीतील प्रवेश पक्का केला. या संपूर्ण स्पर्धेत अपराजीत राहणारा भारत हा एकमेव संघ होता. त्यामुळे तोच विजेतेपदाचा खरा दावेदार होता, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पहिल्या गटातील लढतीत काहीशी अडखळत सुरूवात करण्याऱ्या भारताने नंतर मात्र स्वतःला सावरले. सुपर फोरमधील सामन्यात त्याची प्रचिती आली. राजगीर येथील उष्ण हवामान खेळाडूंची परीक्षा बघत होते. त्या परिक्षेत भारतीय खेळाडू पास झाले. दहा दिवसांत भारताला तब्बल सात सामने खेळावे लागले. त्यामुळे खेळाडूंच्या शारीरिक कसोटीचा आणि मानसिकतेचा खरा कस लागला. या स्पर्धेअगोदर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्याचा मोठा फायदा आशियाई‌ चषक स्पर्धेसाठी नक्कीच झाला असे म्हणावे लागेल.

आशियाई‌ स्पर्धा जिंकून प्रो लीग हॉकी स्पर्धेतील अपयश पुसून काढण्यात भारताला यश मिळाले. गेल्या स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या विजेतेपदाला एक वेगळी किनार आहे. या स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतली. नाही तर स्पर्धेची रंगत आणखी वाढली असती. भारताने आशियाई‌ चषक स्पर्धा जिंकली असली तरी या विजयाने भारताने हुरळून जाऊ नये. कारण या स्पर्धेत द.कोरियाचा अपवाद वगळता इतर संघ फारसे बलवान नव्हते. अजूनदेखील भारतीय हॉकी संघाला आपल्या खेळात अधिक सुधारणा करणे गरजेचे आहे. भक्कम बचावावर भर देणे आवश्यक आहे. गोल करण्याच्या मिळालेल्या प्रत्येक संधीचा लाभ घेण्यास खेळाडूंची शंभर टक्के तयारी हवी. सामन्यात शेवटच्या काही मिनिटांत भारतीय संघ का ढेपाळतो, यावर मात करण्यासाठी खेळाडूंचे मनोर्धर्य उंचावयला हवे. पेनल्टी कॉर्नरवर हमखास गोल करणाऱ्या खेळाडूंची भारतीय संघात वानवा आहे. याकडे प्रशिक्षकांनी लक्ष द्यायला हवे तरच आगामी विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य संघांशी मुकाबला करणे भारताला सोपे जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

टी-२० क्रिकेटच्या जमान्यात दुसरा पुजारा तूर्ततरी कठिण!

राहुल द्रवीड याच्या कसोटी क्रिकेटमधल्या निवृत्तीनंतर त्याच्या तिसऱ्या क्रमांकाच्या जागेचा प्रश्न चेतेश्वर पुजाराने आपल्या चिवट, संयमी फलंदाजीने सोडवला. त्यामुळे तेव्हाच्या बीसीसीआयच्या निवड समिती सदस्यांनी सुस्कारा टाकला असेल. जणूकाही मग राहुल द्रवीडचाच भक्कम वसा पुजाराने १३ वर्षे पुढे नेला. सौराष्ट्राच्या...

युरोपमध्ये व्यवसायिक स्पर्धा खेळणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू अदिती

भारतीय महिला फुटबॉल संघाची गोलरक्षक ३२ वर्षीय अदिती चौहानने आपल्या तब्बल १७ वर्षांच्या कारकिर्दीला काही दिवसांपूर्वी पूर्णविराम‌ देण्याचा निर्णय घेतला. अदिती भारतीय महिला फुटबॉलची खरी शान होती. उत्तम गोलरक्षक असलेल्या अदितीने आपल्या शानदार खेळाच्या जोरावर भारतीय महिला फुटबॉलला‌‌ एका...

नवे फुटबाॅल प्रशिक्षक खलीद जमील यांची कसोटी!

अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाने नुकतीच भारतीय फुटबाॅल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी बुजूर्ग खेळाडू खलीद जमील यांची निवड केली आहे. गेली अनेक वर्षं हे प्रशिक्षकपद विदेशी खेळाडूंकडेच सोपवले जात होते. पण त्याचे फारसे चांगले निकाल मात्र मिळाले नाहीत. आंतरराष्ट्रीय...
Skip to content