गेल्या महिन्याचा शेवटचा आठवडा आणि या महिन्याचे आजपर्यंतचे तब्बल 15 दिवस मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटीन कांड्या, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि मृत झालेला, गाड्या सुशोभित करणारा मनसुख हिरेन यांच्याभोवतीच बातम्यांचे विश्व फिरत आहे. प्रथमच स्पष्ट करतो की, मनसुख यांचा मृत्यू वा हत्त्या ही अत्यन्त निंदनीय गोष्ट आहे. या हत्येची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. खऱ्या दोषींना गजाआड करून त्यांना शिक्षा होणेही आवश्यक आहे. परंतु खऱ्या दोषींना पकडण्याऐवजी आपल्या सर्वच राजकीय पक्षांनी होळीआधीच राजकीय शिमगा करायचा चंगच बांधल्याचे पाहून खेद होत आहे. मनसुख इतको गुणाचो असतो तर..
सचिन वाझे यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच काही अधिकाऱ्यांची चौकशीही सुरू असून त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. प्रख्यात उद्योगपती अंबानी यांच्या घराभोवती चहूबाजूंनी कडेकोट सुरक्षा असताना ती संशयित गाडी इमारतीजवळ जातेच कशी? असा प्रश्न आम्ही प्रथमपासूनच विचारत होतो. अजूनपर्यंततरी त्या सुरक्षारक्षकांना ताब्यात घेऊन चौकशी केल्याचे कोणीही अधिकृतरित्या सांगितलेले नाही.
अंबानी यांच्याकडे केंद्रीय सुरक्षा दल व स्वतः अंबानी यांची खासगी सुरक्षाव्यवस्था आहे. शिवाय जागोजागी हायटेक कॅमेरे लावलेले असून क्षणाक्षणाची चित्रे टिपली जात असताना ती गाडी घुसखोरी करतेच कशी? हा सर्वानाच पडलेला प्रश्न आहे. सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींवर चर्चा होण्यापेक्षा वाझे आणि राजकारणावरच चर्चा होत आहे.
या चर्चेत आता वाझे यांच्यावरील ख्वाजा युनूस प्रकरण पुन्हा उकरून काढले जात आहे. हे होणारच असे मानले तरी वाझे यांना सेवेत घेतल्यापासून ते किमान वर्षभर तरी ही मंडळी गप्प का होती? सन्माननीय विरोधी पक्षनेते तर केव्हाही हा प्रश्न उपस्थित करू शकत होते. त्यांना अंबानी यांच्या इमारतीजवळ गाडी घुसखोरी करेपर्यंत वाट पाहायची गरज होती का? सरकार जर ऐकत नव्हते तर न्यायालयात दाद का मागण्यात आली नाही? एखादा निष्णात वकील देऊन हे प्रकरण धसास लावता येणे शक्य होते.
या अनेक प्रश्नांप्रमाणे मला एक प्रश्न पडलेला आहे. तो असा की, मनसुख हिरेन हा गाडी शोभेचा व्यापारी, जर इतका गुणवान असेल तर गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांशी त्याची इतकी घनिष्ट मैत्री कशी काय बाबा? त्याच्या मृत्यूनंतर जे जे काही त्याच्याबद्दल सांगण्यात आले वा वाचण्यात आले, त्यातून तो गुणवान होता हेच कथन केले गेले आहे. त्याचे कुटूंब व त्याचे मित्रमंडळ असेच सांगणार हे जरी गृहीत धरले तरी राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यादृष्टीने काही पावले उचलली आहेत की नाहीत हे कळायला मार्ग नाही. कारण, सध्या फोकस फक्त सचिन वाझे आणि महाविकास आघाडीचे सरकार इतकाच दिसत आहे.
ठाणे शहरातील तीन पेट्रोल पंप परिसरात मनसुख यांचे मोटारगाड्या ठाकठीक व त्यांना आतून बाहेरून आकर्षक करून देण्याचे दुकान आहे. मोटारीत लागणाऱ्या लहानमोठ्या आकर्षक गोष्टी या दुकानात मिळतात. या दुकानासमोर असलेल्या पदपथावर नेहमीच काही गाड्या उभ्या असत. रस्त्यावरच तो गाड्या आकर्षक बनवून देत असे.
सध्या त्या परिसरात फेरफटका मारला असता कोणी कुजबुज करायलाही तयार नाही. काका पाहिजे तर कटिंग प्या, पण उगाचच नसते प्रश्न विचारून आम्हाला अडचणीत आणू नका. पोलिस सीसीटीव्हीच्या क्लीपिंग घेऊन गेले आहेत. त्यात त्यांना काहीतरी सापडेलच अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पण, कधीकधी रात्रीच्या अंधारात तेथे एखादी गाडी येऊन उभी केली जात असे. मात्र, सकाळी दुकान उघडले की, मनसुख त्या गाडीच्या चाव्या कामगारांना देत असे व गाडीचे आतून-बाहेरून नूतनीकरण केले जात असे, असे अनेकांनी दबक्या आवाजात सांगितले.
सचिन वाझेच असे नाही तर इतर पोलीस अधिकाऱ्यांनाही मनसुख डोळे झाकून गाड्या देत असे. सरळमार्गी व्यापारी असता तर इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकाऱ्यांशी मैत्री असणे जरा खटकणारीच बाब आहे. त्यातूनही वाझे यांच्यासारख्या गुन्हे शाखेतील तडफदार अधिकाऱ्यांशी मैत्री ही डोळ्यात खुपणारी तरी आहे वा आम व्यापारी बंधुंबरोबर चमकोगिरी करण्यासाठी तरी केली असावी. असे दोनच पर्याय समोर येतात.
शिवाय जी स्कॉर्पियो मनसुखची म्हणून सांगितली जाते ती त्याची नसून कोणी न्यूटन नामक व्यक्तीची आहे, असे याआधीच जाहीर केले गेले आहे. या न्यूटनची चौकशी झाली का? त्याने काय सांगितले हे जाहीर होणे आवश्यक आहे. जसे काही शिवसेना नेत्यांची नावे सूचित केली आहेत, राष्ट्रीय तपासयंत्रणेचा हवाला देऊन बिनदिक्कतपणे सांगितले जात आहे. खरोखर कोणी तगडा नेता असता तर बरेच होते. परंतु जे नाव पुढे आले आहे तो नेताही नव्हे, उपनेता, वर्ष-सव्वा वर्षांपूर्वी मनसे पक्षात होता.
त्याहीपेक्षा विनोद म्हणजे वाझे यांच्या काही कंपन्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मग अशा कंपन्यांवर विरोधी पक्षनेते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी या कंपन्या रीतसर नोटीस व चौकशी करून बंद का केल्या नाहीत? आम्हाला राजकारणात जराही इंटरेस्ट नाही. एकाच गोष्टीला झोडपून दुसरी गोष्ट मात्र लपवली जात आहे. म्हणून हा प्रपंच. गृहमंत्री कोण राहतो वा पोलीस आयुक्त राहतात की नाही, याची चिंता नाही. फक्त भीती याची वाटते की, यांच्यावर समजा कारवाई झाली तर हे प्रकरण संपणार आहे का? मग उगाच उर फुटेस्तो आरडाओरड कशाला? वर्षभर वर्षांचा आरडाओरडा ऐकून वैतागलोय. सूत्र नावाचं पिल्लू कुठून येतं, कुठं गायब होतं कळत नाही..