Sunday, September 8, 2024
Homeटॉप स्टोरीकाँग्रेस सत्तेत आल्यास...

काँग्रेस सत्तेत आल्यास करणार महिलांचे ३३ टक्के आरक्षण लागू!

पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी नेतृत्त्वाने पंचायत राजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन राजकारणातील महिलांचा सहभाग वाढवला आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्याचा काँग्रेसचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन काँग्रेसने एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते. महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारला १० वर्षे लागली तरीही अद्याप त्याची अंमलबाजवणी मात्र केलेली नाही. काँग्रेसची सत्ता आली तर महिला आरक्षण लागू केले जाईल, अशी घोषणा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी आज केली.

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता तसेच महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अलका लांबा यांनी यावेळी टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, महिला काँग्रेस संघटन मजबूत करणे, भारत जोडो न्याय यात्रा व आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात या तीन दिवसात सविस्तर चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी जास्तीतजास्त जागा निवडून आणण्यावर महिला काँग्रेसचा भर आहे. महिला सशक्तीकरणावर काँग्रेसने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पंचायत राजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन महिलांचे प्रतिनिधित्व वाढले आहे. आता विधानसभा व लोकसभेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढले पाहिजे यावर महिला काँग्रेसचा भर आहे. महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी भाजपाला १० वर्षे लागली पण तेही अर्धवटच आहे.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देणाऱ्या भाजपाच्या राज्यातच महिला अत्याचारी मोकाट आहेत. महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचार करणारा भाजपाचा खासदार ब्रजभूषण शरण सिंह अजूनही मोकाटच आहे. गुन्हा दाखल होऊन ६ महिने झाले तरी कारवाई मात्र झालेली नाही. पंतप्रधानांचा मतदारसंघ वाराणसीमध्ये एका विद्यार्थ्यीनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यातील गुन्हेगार भाजपाशी संबंधित आहेत. या गुन्हेगारांनी मध्य प्रदेशात भाजपाच्या प्रचारातही सहभाग घेतला. जनतेचा तीव्र आक्रोश बघून नंतर कारवाई करण्यात आली, असे त्या म्हणाल्या.

गुजरातमध्ये बिल्कीस बानोवर सामुहिक बलात्कार करुन हत्याकांड करणाऱ्या ११ दोषींना शिक्षेतून मुक्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या ११ जणांना मुक्त करण्याचा निर्णय रद्द करत त्यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी केली. महिला अत्याचार करणाऱ्या राम रहिम बाबाला हरियाणा सरकारने ९ वेळा पॅरोलवर मुक्त केले आहे. संदीप सैनी या भाजपाशी संबंधित व्यक्तीवरही महिला अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पण कारवाई होत नाही. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर सामुहिक अत्याचार करण्यात आले. मणिपूर ८ महिन्यांपासून जळत आहे. पण पंतप्रधान मणिपूरवर बोलत नाहीत व मणिपूरला जातही नाहीत. भाजपाच्या राज्यात मागील दोन वर्षांत देशभरातून तब्बल १० लाख महिला बेपत्ता झाल्या आहेत आणि त्यात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून सर्वात जास्त महिला बेपत्ता आहेत. या महिला गेल्या कुठे? हा गंभीर प्रश्न आहे. भाजपा सरकारमध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे, असेही लांबा यांनी सांगितले.

खासदार राहुल गांधी यांनी मणिपूर येथून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली असून या यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे. या न्याय यात्रेत नारीशक्तीला न्याय देण्याचाही अंतर्भाव आहे. ज्या महिलांवर अन्याय, अत्याचार झाला त्यांना या यात्रेत सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही ऐतिहासिक आहे. या यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे म्हणूनच आसामचे भाजपा सरकार बिथरले आहे. यातूनच यात्रेवर हल्ले करण्याचे प्रकार झाले. पण यात्रा मात्र सुरुच आहे व सुरुच राहिल असेही अलका लांबा म्हणाल्या. 

पत्रकार परिषदेला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिशा बागुल, प्रदेश उपाध्यक्ष, संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, भावना जैन आदी उपस्थित होते.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content