कोणत्याही गोष्टीतील अनिश्चितता आपल्याला त्रासदायक वाटते. अनिश्चितता हीच भीतीकारक ठरते. लिफ्ट अडकते दोन मजल्यांच्या मध्ये तेव्हा आपण दोन-पाच मिनिटांतही कासावीस होतो. कारण अनिश्चिततेतून जन्मणारी भीती. मग अवकाशाच्या पोकळीत एका मर्यादित जागेत नऊ महिने अडकून पडणे हे काय असू शकेल? असे अडकून पडल्यावर काय होत असेल… अवकाशाच्या पोकळीत पृथ्वीच्या पृष्ठभागापासून शेकडो मैल उंचीवरच्या त्या स्पेस स्टेशनमध्ये सात दिवसांच्या मुक्कामासाठी गेलेली अंतराळवीरांची जोडी. पण परतीचे यान कधी येणार हे कुणीच सांगू शकत नव्हते. मुक्काम किती लांबणार याची काहीच कल्पना नसणे हे किती अधिक भीतीदायक ठरू शकेल याची कल्पनाही सामान्यजनांना करवणार नाही. लिफ्टचा काही चौरस फुटांचा वावर त्या पाच मिनिटांसाठी अंगावर येतो. इथे त्यापेक्षा अधिक मोठ्या जागेत सुनिता विल्यम्स अडकल्या होत्या खऱ्या, पण तरीही ती जागा मर्यादितच होती. ती सारी अनिश्चितता व ती भीती आता संपली असेल. सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अवकाशवीर बुच विल्मोर यांना घेऊन परतणारे यान भारतीय वेळेनुसार काल पहाटे पावणेचार वाजता अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांताच्या मेक्सिको समुद्रधुनीत किनाऱ्यालगत अटलांटिक महासागरात उतरले.
त्या नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातच अडकून पडल्या होत्या. केवळ एका सप्ताहासाठी त्या तिथे गेल्या, मात्र नऊ महिन्यांनी परत आल्या. अशा स्थितीचा माणसाच्या शरीरावर आणि विशेषतः मेंदूवर व मनावर कसा दुष्परिणाम होतो, याचा अभ्यास विल्यम्स व विल्मोर यांच्यामुळे करण्याची संधी शास्त्रज्ञांना मिळणार आहे. मानवी ज्ञानाच्या कक्षा त्यातून आणखी रुंदावणार आहेत. पुढील काही दशकांमध्ये चंद्रावर मानवी वसाहत उभी करण्याचे स्वप्न अवकाशशास्त्रज्ञ पाहत आहेत. त्यासाठी अशा अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे. अवकाशात माणसे राहतात तेव्हा त्यांची हाडं वेगाने ठिसूळ होऊ लागतात. घनता कमी होते आणि त्याचवेळी मेंदूतील द्रवाचे प्रमाणही बदलू शकते. त्यामुळे मेंदूत काय काय बदल होत असतात याचाही अभ्यास होत आहे. एखादा अंतराळवीर हा ठरवून दोन महिने, तीन महिन्यांच्या मुक्कामासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळतळावर पाठवला जातो तेव्हा त्याची मानसिक व शारीरिक तयारी त्यादृष्टीने आधी करून घेतलेली असते.
सुनिता यांच्या आधीच्या काही अंतराळ मोहिमा अशाच दोन-चार महिन्यांपर्यंत चालल्या होत्या. पण यावेळी तसे नव्हते. बोईंग कंपनीने अवकाश मोहिमांसाठी स्टारलाईनर नावाचे नवे यान विकसित केले होते. अमेरिकेने अंतराळ क्षेत्र खाजगी सहभागासाठी खुले केल्यानंतर काही कंपन्या नव्याने या क्षेत्रात उतरण्याची तयारी करत होत्या. बोईंगचे यान हे या प्रयत्नातील पहिले यान होते व त्याची प्रत्यक्ष वापराची चाचणी करायची होती. बोईंगप्राणे स्पेस एक्स ही टेस्लाची कंपनीही यान तयार करत होती. ते नंतर तयार झाले. आता परतताना त्यांना स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानाचा उपयोग झाला आहे. बोईंगचे स्टारलाईनर यान घेऊन जून 2024मध्ये विल्यम्स व विल्मोर हे दोघे पट्टीचे अवकाशवीर निघाले होते. विल्यम्स या अमेरिकन नौदलाच्या टेस्ट पायलट म्हणून पूर्वी काम करत होत्या. त्यांचा अवकाश सफरीचा अनुभवही दांडगा आहे. त्या कमांडर दर्जाच्या अवकाशवीर आहेत. तसाच विल्मोर यांचाही अनुभव मोठा आहे. या दोघांना घेऊन जाणाऱ्या स्टारलाईनरचे ते उड्डाण काही सुरळीत झाले नाही. ते निघण्याच्या आधीच त्यातून हेलियम वायूची गळती होत असल्याचे ध्यानी आले होते. पण ती दुरुस्ती लगेचच केली गेली व सुरक्षित सफरीसाठी यान योग्य आहे असेही ठरले. पण अंतराळात गेल्यानंतर त्यातील आणखी काही तांत्रिक त्रुटी जाणवू लागल्या. त्याच्या डॉकिंग प्रक्रियेतही त्रुटी आढळल्याने त्यातून या दोघांनी पृथ्वीकडे परत येणे सुरक्षित ठरणार नाही हे ध्यानी आले. नासाच्या वैज्ञानिकांनी निर्णय केला की दोघे अंतराळवीर त्यातून परत येणार नाहीत. त्यांना परत आणण्याची अन्य व्यवस्था केली जाईल. त्यानंतर स्टारलाईनर यान सप्टेंबर 2024मध्ये पुन्हा पृथ्वीकडे परतलेही.
अंतराळ मोहिमांची आखणी व नियोजन महिनोन् महिने आधी केले जाते. प्रत्येक मोहिमेसाठी नव्याने रॉकेटची बांधणी होत असते. एका यानाची मोहीम फसली म्हटल्यावर तातडीने दुसरी मोहीम आखणे शक्य होत नसते. तेच याही बाबतीत झाले. नवे यान तयार करून ते अंतराळात पठवण्यासाठी पाऊण वर्षाचा काळ जावा लागला. सुनिता विल्यम यांचा व भारताचा निकटचा संबंध आहे. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात शिकलेल्या आणि 1960च्या सुमारास अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेल्या डॉ. दीपक पंड्या यांची ही लेक. डॉ. पंड्या 1957ला एमडी झाले व अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेले. तिथे प्रतिष्ठित विद्यापीठांतून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आणि ते प्रथितयश वैद्यकीय तज्ज्ञ बनले. स्लोव्हेनियन अमेरिकन वंशाच्या उर्सुला बोनी यांच्याशी डॉ. पंड्या विवाहबद्ध झाले. त्यांची सर्वात धाकटी लेक सुनिता म्हणजेच जगप्रसिद्ध अंतराळवीर. अमेरिकन नौदलात काम केल्यानंतर त्या 2000च्या सुमारास नासाच्या अवकाश मोहिमेसाठी निवडल्या गेल्या. तिथे प्रशिक्षणात त्यांनी नैपुण्य मिळवल्यानंतर 2007पासून त्या विविध अंतराळ मोहिमांत सहभागी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाशतळाची ही त्यांची तिसरी व प्रदीर्घ भेट होती. या तळाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी अनेकवेळा काम केले आहे.

विल्यम्स आणि विल्मोर यांचा या वेळेचा मुक्काम 286 दिवसांचा होता. एखाद्या अंतराळवीराचा हा सर्वाधिक मुक्काम नव्हे. याआधी रशिया व अमेरिकेच्या अनेक अवकाशवीरांनी याहीपेक्षा अधिक काळ अंतराळात सलग मुक्काम केला आहे. 1986मध्ये रशियाने मीर हे अंतराळस्थानक बांधले होते. ते 2001पर्यंत कार्यरत होते. त्याचाही वापर जगातील अंतराळ संशोधन करणारे देश करत असत. मीरवर सोव्हिएतचे अंतराळवीर वालेरी पोलीयाकोव्ह सलग 438 दिवस रहिले होते. अलिकडेच आंतरराष्ट्रीय अवकाशतळावर अमेरिकेचे फ्रँक रुबीओ हे अंतराळवीर सप्टेबर 2022 ते सप्टेंबर 2023 असे सलग 371 दिवस राहिले होते. अनेक अंतराळ मोहिमांमधून मिळून एकत्रित अंतराळात सर्वाधिक कालावधी घालवण्याचा रेकॉर्ड, सध्या रशियाचे ओलेग कॉनेन्को यांच्या नावे असून ते एकूण 1111 दिवस म्हणजे तीन वर्षांहून अधिक काळ अंतराळात राहिले आहेत. सर्वाधिक काळ अंतराळात घालवणाऱ्या महिला हा विक्रम अमेरिकेच्या पेगी विन्स्टन यांच्या नावावर आहे. त्या एकंदर तीन मोहिमांमध्ये मिळून 675 दिवस अंतराळात राहिल्या.
विल्यम्स यांची पहिली मोहिम 2006-07मध्ये झाली तेव्हा त्या 196 दिवस अंतराळतळात होत्या. 2012मधील मोहिमेत त्यांनी आणखी 127 दिवस काम केले. विल्मोर यांनी 2014 व 2015मधील दोन मोहिमांमध्ये 62 व 178 दिवस अंतराळतळावर काम केले आहे. दोघांचीही ही तिसरी अंतराळ मोहीम होती. या वेळेचा फरक इतकाच होता की केवळ सात दिवसांची मोहीमेची तयारी होती, मात्र त्यांना तिथे तब्बल 286 दिवस वाट पाहवी लागली. या काळात अर्थातच तिथे विविध वैज्ञानिक प्रयोग हे दोघे करत होते. अंतराळस्थानकातील कामाचा भाग म्हणून त्यांना स्थानकाच्या बाहेर जाऊन स्थानकाच्या बाह्य भागाच्या दुरुस्तीची कामे करावी लागतात. त्यासाठी स्पेस वॉक ही संज्ञा वापरली जाते. अशाप्रकारे अंतराळात चालण्याचे (खरेतर उडण्याचे) काम विल्यम्स यांनी एकूण 62 तास 6 मिनिटे केले आहे हाही एक रेकॉर्ड आहे. महिला अवकाशवीराचा सर्वाधिक तास स्पेसवॉकचा विक्रम तर त्यांच्या नावे आहेच, पण आजवरच्या सर्व अंतराळवीरांमध्ये स्पेसवॉकच्या बाबतीत त्यांचा क्रमांक चौथा लागतो. एकाचवेळी सर्वाधिक काळ स्पेसवॉक करण्याचा, सहा तासांचा, विक्रमही सुनिता विल्यम्स यांच्याच नावे जमा आहे.
स्पेस वॉक हा किती धोकादायक प्रकार आहे, हे समजण्यासाठी आंतराळतळाची रचना व गती लक्षात घ्यावी लागेल. साधारणतः 31 हजार घनफुटांच्या आकाराचा हा अंतराळतळ पृथ्वीपासून चारशे किलोमीटर उंचावरून 28 हजार किलोमीटर प्रती तास अशा भयानक वेगाने पृथ्वीभोवती फिरत असतो. त्या फिरत्या यानातून बाहेर पडणारा अंतराळवीर त्याच वेगाने पुढे खेचला जात असतो आणि तशातही त्याला काम करायचे असते. या काळात अवकाशाच्या पोकळीतील अतिनील किरणांचा मारा त्याच्या प्रेशरसूटवर सतत होत असतो. छोटीशीही चूक ही अवकाशयात्रीचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा भयानक अंत घडवू शकते. अशा स्थितीत सलग सहा तास काम करणे हे विल्यम्स यांनी करून दाखवले आहे. विल्यम्स यांचे म्हणूनच जगभरात कौतुक होते आहे.
डॉ. पंड्याची ही धाडसी मुलगी वीस वर्षांवूर्वी मायकेल विल्यम्स यांची पत्नी झाली. त्यांचे पती टेक्सासमध्ये फेडरल मार्शल विभागात अधिकारी आहेत. त्यांचे वास्तव्य टेक्सासमध्येच असते. विल्यम्स यांनी लग्नानंतर आपला हिंदू धर्म जपला आहे. जोपासला आहे. भारतीय तशाच, आईच्या स्लोव्हेनिया या मातृदेशाच्या परंपरा त्या जपतात. त्या देशाची खासियत असणारे सॉसेजेस आणि भारतीय गुजराती सामोसे असे दोन पदार्थ त्या अंतराळात सोबत घेऊन गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत गणपतीबाप्पाची मूर्ती व भारतीय झेंडा तसेच एकदा स्लोव्हेनियन झेंडाही अंतराळस्थानकात गेला आहे. भगवतगीता व उपनिषदांचे ग्रंथही विल्यम यांनी अंतराळात सोबत नेले. कुंभ मेळाव्याचे अवकाशातून चित्रण त्यांनी केले हेही विशेष. त्या अत्यंत उत्साही आहेत. अंतराळ हे त्यांना दुसरे घर वाटते असे त्यांची आई सांगते. अंतराळस्थानकातून त्यांनी बोस्टनच्या मॅराथॉन स्पर्धेत भाग घेतला. त्या स्थानकातील व्यायामाच्या पट्ट्यावरून पळत होत्या. तिथे भरपूर व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचे आव्हानही विल्यम व विल्मोर दोघांनीही पार पाडले आहे. त्या परतल्यानंतर जवळपास दीड महिना त्यांना शास्त्रज्ञ व डॉक्टरांच्या नजरेखाली ठेवले जाईल. त्यांच्या शरीरातील बदलांचा अभ्यास होईल. तसेच त्यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची सवय होण्यसासठी विशिष्ट वातावरणात ठेवले जाईल. एखाद्या नवजात बालकाप्रमाणे सध्या त्यांची शरीरे नाजूक बनली आहेत. त्यांना तज्ज्ञांच्या मदतीनेच अवकाशयानातून बाहेर काढून सरकत्या खुर्चीवरून योग्य जागी नेण्यात आले आहे. सुनिता यांची जिद्द अर्थातच लवकरात लवकर पुढच्या अंतराळ मोहिमेत सहभागी होण्याचीच राहणार आहे!
खूपच सविस्तर… अभ्यासपूर्ण … माहितीपूर्ण लेख आहे…
अनिकेत!
सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्याला करावे तेवढे सलाम कमीच आहेत