महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अलीकडे वरचेवर गुलाबी जॅकेटमध्ये दिसतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण शेकडो प्रकाराचे रंग बघत असतो. हे रंग आपल्या जीवनात एक नवीन भूमिका बजावत असतात. आपल्या मूडवर या रंगाचा बहुतांशी परिणाम होतो. इतकेच नव्हे, तर रंगाचा आपल्या बघण्यावर, बोलण्यावर आणि भावनांवरही प्रभाव होत असतो. लाल रंग हा रागाचं किंवा द्वेषाचं प्रतिक आहे. काळा रंग निषेधाचं प्रतिक, तर पांढरा रंग शांततेचे प्रतिक आहे. तसंच गुलाबी रंगाचंही स्वतःचं एक प्रतिक आहे. असा प्रत्येक रंगाचा काही ना काही गुणधर्म आहे. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. आनंदाचे प्रतिक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. गुलाबी रंग आवडणाऱ्या व्यक्तिमत्वात एनर्जी आणि सर्जनशीलता निर्माण होते.
आता हाच गुलाबी रंग राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या मनाला भावला आहे. दादांच्या सार्वजनिक जीवनाकडे कटाक्षाने पाहिले तर सतत कामात गुंतून राहणे, अनावश्यक वेळ वाया घालवायचा नाही. सकाळी सात वाजल्यापासून कामाला लागणे आणि कामात शिस्त पाळणे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत. लोकांच्या प्रश्नांची जाण, ते सोडविण्याची जिद्द, नियोजनाची क्षमता आणि अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा हलविण्याची धमक असे विशेष गुणही त्यांच्याकडे आहेत. एखादी गोष्ट होत असेल तर ‘हो’ आणि होणार नसेल तर ‘नाही’ असे सांगण्याची धमक फार कमी राजकारण्यांमध्ये असते. ती अजित पवार यांच्यामध्ये आहे. त्यांच्या प्रांजळपणाची चर्चा सर्वाधिक होत असते. स्पष्टोक्तपणा आणि प्रांजळपणा त्यांच्या भोवतालची मंडळी गोड मानून घेतात. मात्र कधीकधी हा त्यांचा स्वभाव त्यांना अडचणीत आणतो.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदापासून सुरुवात करून खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशा अनेक विविध राजकीय पदांना त्यांनी गवसणी घातली. विधिमंडळातील कामकाजातील प्रभावी नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सहकार, अर्थ, शेती, उद्योग अशा विविध खात्यांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. मात्र आज ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या स्वभावापेक्षा आता त्यांनाच आपल्या स्वभावात बदल करून घेण्याची इच्छा जाणवत आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंडाळी करून त्यांनी आपल्या नेतृत्त्वाखालील मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतला. सध्या शिंदे-फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आणि अर्थ खात्याची धुरा सांभाळत आहेत.
खरं तर श्रद्धा आणि भावनेच्या आधारावर चालणाऱ्या महाराष्ट्रातील अनेकांना अजितदादांचा हा निर्णय धक्कादायक वाटला. आपले सख्खे काका शरद पवार यांच्याविरोधात बंड करून आपल्या राजकीय शत्रूच्या तंबूत दाखल होणे, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे या आपल्या बहीणीच्या विरोधात आपल्या पत्नीला उमेदवारी देणे, असे अनेक निर्णय त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरलेले आहे. परंतु दादांच्या काही राजकीय मजबुरीमुळे त्यांना सरकारसोबत राहावं लागत असल्याचे कारण महाराष्ट्राच्या जनतेला सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीत खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे हे जनतेने दाखवून दिले आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार जागा लढविल्या. मात्र त्यांना रायगड लोकसभा मतदारसंघाची एक जागा सोडली तर कुठेही यश मिळाले नाही. त्यानंतर विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर आणि साप्ताहिक विवेक यातूनसुद्धा अजितदादांना सोबत घेतल्याने लोकसभेत भाजपाला मोठा फटका बसल्याचे नमूद केले आहे. खरंतर ही सर्व परिस्थिती पाहता, त्यांची राजकीय प्रतिमा डागळण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सध्याची राजकीय परिस्थिती अनुकूल नसल्याचे राजकीय जाणकारांचे स्पष्ट मत आहे. उद्या त्यांना विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. लोकसभेला जनमताचा जो कौल त्यांना मिळाला त्यांची पुनरवृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार तर नाही ना.. याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. बैठका, मेळावे, प्रचारसभा यासाठी त्यांना रणनीती आखावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) मोठे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. कुठेतरी दादांचे राजकीय गणित स्वतः शरद पवार जातीने लक्ष घालून बिघडवू शकतात, ही काळ्या दगडावरची रेष आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार आपली प्रतिमासंवर्धन अर्थात “इमेज बिल्डिंग”साठी आणि पुढील हानी टाळण्यासाठी “डॅमेज कंट्रोल”च्या उपाययोजना करण्याकरिता जोरदार कामाला लागले आहेत. त्यातूनच रणनीतीचा भाग म्हणून त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात बॅनर्स, पोस्टर्स आणि जाहिरीतींवर अधिकाधिक गुलाबी रंगाचा वापर करायला आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. पक्षाच्या व्यासपीठावर बँकग्राऊंडवरील बॅनर आणि सोशल मीडिया जाहिरात अकाऊंटवर गुलाबी रंगाचा पुरेपूर वापर करायला सांगण्यात आले आहे. कदाचित गुलाबी रंग त्यांच्यासाठी लक्की असावा. कोणीतरी हळव्या मनाच्या सल्लागाराने कदाचित त्यांना सांगितले असावे. पूर्वी दादांच्या बैठकीला हसायचं की नाही याबद्दल कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी यांना भलतेच टेन्शन असायचं. आता मात्र दादांना प्रेमाचं प्रतिक असणारा गुलाबी रंग फार आवडू लागल्याने त्यांची प्रत्येक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडते, अशी मंत्रालयात चर्चा आहे.
हेच काय तर हा रंग लोकांच्या मनावर आणि कार्यकर्त्यांवर बिंबवण्यासाठी स्वतः दादांनीदेखील गुलाबी रंगाचे जॅकेट घालायला सुरुवात केली आहे. दैनंदिन वापरासाठी त्यांनी अठरा गुलाबी रंगाची जॅकेट शिवून घेतली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दादांचे “पिंक पॉलिटिक्स” पाहयला मिळणार आहे. अजितदादांनी आपली आणि आपल्या पक्षाची “प्रतिमा आणि प्रतिभा” सुधारण्यासाठी डिझाईन बॉक्स इनोव्हेशन प्रा लि. नावाच्या कंपनीला काही दिवसांपूर्वी काम दिले आहे. आता ही कंपनी आगामी विधानसभा निवडणुकीत दादांच्या पक्षाचे कॅम्पेन “मॅनेज” करणार आहे. नरेश अरोरा हे या कंपनीचे डायरेक्टर आहेत. त्यांनी राजस्थान आणि कर्नाटकमधील काँग्रेसचे इलेक्शन कॅम्पेन केले. तेथे काँग्रेसला भरघोस यश मिळाले होते. आता हीच कंपनी अजितदादांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीच्या प्रचाराचे काम पाहणार आहे. राजकीय रणनीती आखणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी योजना राबविणार आहे. थोडक्यात अजित पवारांच्या ब्रॅण्डिंग मेकओव्हरचं काम या कंपनीला करायचे आहे. दादांच्या सकारात्मक बाजू प्रखरतेने जनतेसमोर आणल्या जाणार आहेत.
तसं पाहिले तर अजितदादा कधीच बुवाबाबांच्या नादी लागणारे व्यक्तिमत्व नाही. कधी त्यांच्या हातात तुम्हाला आपलं भाग्य उजळणारे कोणत्याही हिऱ्याच्या, राशींच्या किंवा सोन्याच्या अंगठ्या दिसणार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनबाबतचे विधेयक विधिमंडळात मांडले तेव्हा हे विधेयक लवकरात लवकर संमत व्हावे म्हणून अजित पवार प्रमाणिक प्रयत्न करीत होते. त्यांचा कोणत्याही दैवीशक्तीवर अजिबात विश्वास नाही. मात्र सध्या ते सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकलेले दिसतात. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीपूर्वी आपल्या सर्व आमदारांना घेऊन दादांनी श्री सिद्धिविनायकांचे दर्शन घेतले. आता त्यांना आपली एक वेगळी प्रतिमा यातून दाखवायची आहे. तरच आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिक स्तरावर भाजपाचे मतदार राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विचार करतील असा भाबडा समज अजितदादांना झाला असावा. यापूर्वी तथाकथित सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी अजितदादांना आरोपीच्या पिंजऱ्यात बसविले होते. आता अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे यापूर्वी त्यांच्यावर झालेले आरोप “फेक नरेटिव्ह” तर नव्हते ना!