महाराष्ट्रातील नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकींच्या प्रचाराचा धुरळा आज थंडावतोय. मात्र त्याचवेळी काही नगर पालिकांच्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका न्यायप्रविष्ट असल्याने, निवडणूक आयोगाने त्या पुढे ढकलल्या. ह्यावरून राजकीय पक्ष, तिथले उमेदवार आणि अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आता त्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत.
ह्या निवडणुका जेव्हापासून जाहीर झाल्या तेव्हापासून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जात आहे. मतचोरीचा आरोप, मतदारयाद्यांमध्ये विसंगती, दुबार-तिबार नावांच्या तक्रारी, असे मतदारयादीबाबत विरोधी पक्षांनी खूपच गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते. त्यातील काही तक्रारी खर्या असतीलही. काँग्रेस नेते राहुल गांधी ह्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे ह्यांनीही एक व्हिडीओ दाखवून सादरीकरण केले आणि यादीत किती गोंधळ आहे ते दाखवले. मात्र निवडणूक आयोगाने ह्याची फारशी दखल घेतली नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि महाविकास आघाडी ह्यांनी ह्या प्रकरणात सत्याचा मोर्चाही काढला. मात्र जोपर्यंत न्यायालयात ह्याप्रकरणी पुराव्यानिशी अधिकृत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत दखल न घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. आता मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुकीसाठी मात्र मुंबई महापालिकेने यंत्रणा उभारून मतदारयादी पडताळणीचे काम हाती घेतले आहे.

ह्या निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असे आरोपप्रत्यारोपांचे चित्र दिसणे अपेक्षित होते. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्यांनी फक्त महापालिकांवरच त्यातही मुंबई महापालिकेवरच आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरवलेले दिसते. कारण मुंबई महापालिका म्हणजे उद्धव ठाकरेंचा प्राण आहे. त्यामुळे त्यांनी इतर नगर पालिकांच्या प्रचारात फारसा भाग घेतलेला दिसला नाही. तर मविआचे इतर नेते म्हणजे शरद पवार, बाळासाहेब थोरात ह्यासारख्या नेत्यांनीही ह्या प्रचाराकडे पाठ फिरवलेली दिसते. ह्याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्यांनी मात्र महाराष्ट्र पिंजून काढलेला दिसतोय. त्यातही महायुतीच्या नेत्यांमध्येच मतभेदाचे वादळ निर्माण झालेले दिसतंय. एकतर अनेक ठिकाणी युती राहू शकली नाही, कारण इछुक उमेदवारांची संख्या प्रचंड. त्यामुळे युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरच घ्यावा, असे नेत्यांनी ठरवले. अनेक ठिकाणी महायुतीतील पक्षच एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत असे दृश्य दिसत आहे. त्यामुळे ह्या तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतात.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ह्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेकजणांना भाजपत प्रवेश दिला, म्हणून चिडलेल्या शिंद्यांनी थेट अमित शाहांकडेच धाव घेतली. ते कमी की काय म्हणून चव्हाणांनी आता मनसे कार्यकर्त्यांना भाजपत प्रवेश दिला आहे. त्यातच त्यांनी २ डिसेंबरपर्यत महायुती टिकवायची आहे, असेही म्हणून ह्या गोंधळात आणखीच भर टाकली. सिंधुदूर्गमध्ये शिवसेनेचे आमदार नीलेश राणे ह्यांनी तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरात स्टिंग ऑपरेशन करून पैश्यांनी भरलेली बॅग दाखवली आणि चव्हाणांनाच लक्ष्य केले तर दुसरीकडे भाजपचे मंत्री नीतेश राणे ह्यांनी चव्हाणांची पाठराखण केली. हा गोंधळ कमी होता म्हणून की काय अजितदादांची मतदारांना केलेली दमदाटी चव्हाट्यावर आली. माझ्याकडे निधी आहे. मत दिले तरच निधी देणार असे सांगून आणखी वेगळाच वाद पेटवला. ह्यावरून भाजप आणि शिवसेना दोन्हीही महायुतीतल्याच पक्षांनी अजित पवारांवर टीका केली. हे कमी होते म्हणून की काय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे ह्यांनी जाहीर सभेत भाजपवर टीका केली. भाजपा हा पक्ष फोडणारा पक्ष असा आरोप केला. मात्र कोकाटे हे सोयीस्कररीत्या विसरले की, विधानसभेच्या सभागृहात बसून मोबाइलवर रमी खेळताना पकडल्यानंतरही त्यांना फडणवीसांकडून अभय मिळाले आणि मंत्रीपद टिकले.

नाशिकमधील येवला मतदारसंघात छगन भुजबळ आजारी असल्याने प्रचाराला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमधूनच व्हिडिओद्वारे मतदारांना भावनिक साद घातली. अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत, तर कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढताना दिसत आहेत. ह्या एकुण प्रचारात सगळेच पक्ष एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. मात्र ह्यात उणीव भासली ती सेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत ह्यांची. आजारपणामुळे ते ह्या प्रचारात उतरले नव्हते. मात्र हा राजकीय आजार तर नव्हता ना अशी शंका आहे. ती येण्याचे कारण म्हणजे ह्या निवडणुकांचा प्रचार संपतानाच संजय राऊत पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची राळ कुठपर्यंत उठणार ह्याचा काहीही नेम नाही.
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत.)

