Homeब्लॅक अँड व्हाईटऐतिहासिक पुस्तक 'तंजावरचे...

ऐतिहासिक पुस्तक ‘तंजावरचे मराठे’!

डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर यांनी लिहिलेल्या ‘तंजावरचे मराठे’, या पुस्तकातून दुर्लक्षित इतिहासाची ओळख करून देण्यात आली आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ संशोधक अरुणचंद्र पाठक यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. रवींद्र गोळे यांनी या पुस्तकाची जी भूमिका लिहिली आहे, त्यातील हा भाग.

शहाजीराजे भोसले यांनी पुण्यास जिजाबाई व बाल शिवबांना पाठवले. सोबत विश्वासू कारभारी दिले. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची, हिंदूंच्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे दक्षिणेस तंजावरमध्ये शहाजीराजांचे तिसरे पुत्र व्यंकोजीराजांच्या आधिपत्याखाली स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना झाली. तंजावरच्या स्वतंत्र राज्याने सांस्कृतिक स्वातंत्र्याचा, उन्नतीचा वसा पुढे नेला. व्यंकोजीराजांचे पुत्र शहाजीराजे दुसरे यांनी राजकारण आणि ज्ञान, संस्कृती अशा दोन्ही प्रांतांत आपला अमिट ठसा उमटवला. त्यांनी निर्माण केलेले शहाजीराजपुरम् हे देशभरातील विद्वानांना एकत्र आणून वसवलेले नगर होते. विविध विद्याक्षेत्रांतील मान्यवर विद्वान या नगरीत वास करीत होते.

मुळात विजयनगर नायक राज्यकर्त्यांनी बांधलेले सरस्वती महाल हे धार्मिक हस्तलिखितांचे भांडार होते. महाराज सर्कोजीराजे दुसरे यांच्या काळात या ज्ञान-संस्कृतीची भरभराट झाली. शहाजीराजे दुसरे जसे धर्म आणि ज्ञान या क्षेत्रांत योगदान देत होते, त्याचप्रमाणे तत्कालीन दक्षिणेतील राजकारणातही, हिंदूंच्या स्वराज्यलढ्यातही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत होते. पूर्ण दहा वर्षे जिंजी स्वराज्याची राजधानी हीच होती. शहाजीराजे दुसरे यांनी स्वतः कुमक घेऊन चढाई करून मोगली कह्यातून हा जिंजीचा अभेद्य दुर्ग सोडवला. दक्षिणेच्या राजकारणात हिंदू नायक सत्ताधीशांना अभय देऊन त्यांची सत्ता सुस्थिर करण्याचे मोठे कार्य तंजावरच्या पुढील राजांनी केले. हा सर्व इतिहास या पुस्तकात विशद केला आहे.

ज्ञानक्षेत्रात सर्कोजीराजे दुसरे यांचे कार्य अतुलनीय आहे. भारतीय ज्ञानपरंपरांची आधुनिक विज्ञानसापेक्ष प्रगती व्हावी, यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. आयुर्वेदातील तज्ज्ञांना आधुनिक औषधविज्ञानाची ओळख व्हावी, म्हणून त्यांनी धन्वंतरी महालाची स्थापना केली. शल्यचिकित्सा, रोगचिकित्सा, शरीररचना शास्त्र अशा अनेक विद्याशाखा त्यांनी त्याकाळी तंजावरमध्ये रुजवल्या, वाढवल्या. स्वतः इंग्लिश, फारसी, अरबी, जर्मन, फ्रेंच, संस्कृत अशा अनेक भाषांमध्ये निष्णात होऊन, त्या त्या भाषांतील विद्याभांडार त्यांनी तंजावरला आणले, रुजवले.

हा इतिहास इथेच थांबत नाही, तर अगदी विसाव्या शतकातही तंजावर येथील मराठी राजांचे समाजप्रबोधनातील आणि सुधारणा चळवळीतील योगदान अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. याबाबत १९३९ साली महात्मा गांधींनी लिहिलेले पत्र अतिशय बोलके आहे. या पत्रात ते तंजावरच्या तत्कालीन महाराजांचे राजारामराजे यांचे अभिनंदन करतात. या तंजावर नरेशाने आपल्या अखत्यारीतील संपूर्ण ९० मंदिरे हरिजन प्रवेशासाठी स्वयंस्फूर्तीने खुली केली. राजांचे हे एक पाऊल दक्षिणेतील प्रबोधन पर्वाची आणि नेतृत्त्वाची प्रगल्भता स्पष्ट करते.

तंजावरने जोपासलेल्या या राष्ट्रीय सांस्कृतिक वारशाची ओळख सर्व मराठी भाषकांना व्हावी, या भूमिकेतून या ग्रंथाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने तंजावर आणि महाराष्ट्र यातील राष्ट्रीय व सांस्कृतिक अनुबंध प्रस्थापित व्हावा, घट्ट व्हावा असा आमचा मानस आहे. एका अर्थाने महाराष्ट्र व तंजावर यांचे सांस्कृतिक नाते अधिक समृद्ध होत जाईल, या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

संदर्भमूल्य असलेले हे पुस्तक आर्ट पेपरवर छापलेले आहे. यामध्ये अनेक रंगीत चित्रे आहेत. आकर्षक छपाई असलेले हे पुस्तक वाचनीय आहे. भेट देण्यासारखे आहे.

तंजावरचे मराठे

दक्षिणेच्या इतिहासातील योगदान

लेखक: डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर

प्रकाशक: विवेक प्रकाशन

पृष्ठे- १८४ / मूल्य-२५० ₹.

टपालखर्च: ५० ₹.

मराठे

संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

Continue reading

खिचडीचा आणखी एक प्रकार.. ‘सिनेमा खिचडी’!

'सिनेमा खिचडी', या पुस्तकाचे लेखक नामवंत सिनेपत्रकार आहेत. आतापर्यंत त्यांची सेहेचाळीस पुस्तके बाजारात आली असून हे सत्तेचाळीसावे पुस्तक आहे. नुकताच त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा 'शिरीष कणेकर पुरस्कार' घोषित झाला आहे. आपल्या पुस्तकात प्रस्तावना लिहिताना लेखक दिलीप ठाकूर लिहितात- खिचडीची...

कौटुंबिक अंदाजपत्रकाचा आराखडा आखण्यापूर्वी हवे ‘फॅमिली बजेट’!

जन्मापासून प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कितीतरी खर्चांना तोंड द्यावे लागते. शिक्षण, नोकरी, स्वतःचे घर, विवाह, मुले, त्यांचे शिक्षण... एक ना अनेक! विविध स्वरूपात खर्चाचे रहाटगाडगे आपले सुरूच असते! आपली मिळकत आणि खर्चाचा मेळ घालण्यासाठी काटेकोर नियोजनाची गरज असते. म्हणूनच प्रत्येक...

आर्थिकदृष्ट्या तरबेज करणारे ‘महिलांचे अर्थभान’!

अनेक घरांमध्ये गृहलक्ष्मीला कौतुकाने 'गृहमंत्री' असे म्हटले जाते. संपूर्ण घराचे व्यवस्थापन निगुतीने करण्याचे कौशल्य स्त्रीमध्ये असते, याचीच ही पावती असते. पण या गृहमंत्र्याच्या हातात कुटुंबाच्या अर्थकारणाच्या नाड्या असतात का, या प्रश्नाचे उत्तर मात्र बऱ्याचदा 'नाही' असे असते. नोकरी व्यवसाय...
Skip to content