यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल असे एकूण चित्र दिसते. आज होणारी ईद असो किंवा गणेशोत्सव, सरकारी बाबू म्हणतील त्याप्रमाणे हे सणवार साजरे होणार होणार की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
भाद्रपद महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवात सर्वसाधारणपणे गणेश चतुर्थीला गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि त्यानंतर दीड दिवसाने काही बाप्पांचे विसर्जन होते. त्यानंतर पाचव्या दिवशी, गौरीबरोबर, सातव्या दिवशी आणि नंतर थेट दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तींंचे विसर्जन केले जाते. परंतु पुणे जिल्ह्यात अजब प्रकारच समोर दिसून आला. येथे या चालीरीती, परंपरा यांना सरळसरळ फाटा देण्यात आला.
दीड दिवसाच्या गणेशमूर्तींंचे विसर्जन झाले. मात्र त्यानंतर पाचव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन होण्याऐवजी ते कधी चौथ्या दिवशी, कधी आठव्या दिवशी, नवव्या दिवशी होताना पाहायला मिळाले. पुणे शहर वगळता अनेक ठिकाणी हीच पद्धत अवलंबली गेली. याबाबत विचारणा केली असता असे समजले की, पुणे जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका जोरदार काढल्या जातात. या मिरवणुकांवर नियंत्रण ठेवण्यात उपलब्ध पोलीसबळ अपुरे पडते. त्यामुळे पोलिसांनी विभागवार विसर्जनाच्या तारखा निश्चित करून तेथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिल्या आणि त्यानुसार वेगवेगळ्या दिवशी अपारंपरिकरित्या गणेशमूर्तींचे विसर्जन होताना दिसले. याचाच अर्थ काय की, पोलीस प्रशासनाच्या सोयीनुसार यापुढे सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार. हीच पद्धत महाराष्ट्राच्या इतर काही जिल्ह्यातही अवलंबली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हाच प्रकार ईदबाबतही झाला. आज मुस्लिमधर्मीय ईद साजरी करत आहेत. मात्र यानिमित्ताने काढण्यात येणारे जुलूस बुधवारी काढण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी काँग्रेसचे नसीम खान, अमीन पटेल अशा काही मुस्लिम नेत्यांनी पुढाकार घेतला. अनंत चतुर्दशीनिमित्त निघणाऱ्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका आणि त्याच काळात काढण्यात येणारे जुलूस यामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ नये याकरीता या नेत्यांनी अशी भूमिका मांडली. सरकारनेही या भूमिकेला मान्यता दिली. त्यासाठी आजची ईदची सरकारी रजा बुधवारी केली.
मुंबई शहर, मुंबई उपनगरे तसेच काही जिल्ह्यांमध्ये ईदच्या सरकारी सुट्टीची तारीख बदलण्यात आली. इतर जिल्ह्यांमध्ये ईदची सुट्टी सोमवारी ठेवायची की बुधवारी, याचे अधिकार तेथील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे सरकारी इच्छेनुसार, आता जुलूस काढून बुधवारी ईद साजरी केली जाणार आहे. यापुढेही रूढी, परंपरा यांना काहीच किंमत न देता सरकारी अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार सण साजरे करण्याचा दिवस ठरवण्यात येईल आणि शासनकर्ते सरकार त्याला मान्यता देईल, असेच एकूण चित्र दिसते, असे सर्वसामान्यांमध्ये बोलले जात आहे.