Homeपब्लिक फिगरलोककला, गडकिल्ले राखणारे...

लोककला, गडकिल्ले राखणारे सांस्कृतिक धोरण लवकरच!

महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन, कारागिरी, गडकिल्ले यांचे संवर्धन आणि विविध लोककला, नृत्य, संगीत यांना प्रोत्साहन देणारे राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार होत असून लवकरच या धोरणास राज्य मंत्रिमंडळात मंजुरी मिळेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सांस्कृतिक धोरण २०१० पुनर्विलोकन समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आज मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक सुजीतकुमार उगले आदी यावेळी उपस्थित होते.

शासनाचे सांस्कृतिक धोरण खऱ्या अर्थाने बहुआयामी असे असणार आहे. आपल्या संस्कृतीची ओळख त्यातून प्रतिबिंबीत व्हावी, यासाठी हे धोरण तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. धोरण समितीने दिलेला अहवाल आणि त्यातील शिफारशी लक्षात घेऊन शासन व्यापक असे सांस्कृतिक धोरण जाहीर करेल. राज्यातील गड किल्ले, कारागिरी, पुरातत्व, भाषा साहित्य ग्रंथव्यवहार आणि वाचनसंस्कृती, लोककला, भक्ती संस्कृती, संगीत, नृत्य, रंगभूमी, चित्रपट, दृश्यकला अशा विविध बाबींचा विचार या धोरणात असेल. याशिवाय, राज्याच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण बाबींचाही यात समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात विविध संस्कृती, पेहराव, खाद्य, आभूषण, मौखिक संस्कृती आहे. ती जपली जावी, यादृष्टीने काय करता येईल याचाही विचार केला जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी सांस्कृतिक धोरण 2010 पुनर्वलोकन समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनीही  या धोरणातील शिफारशींच्या अनुषंगाने माहिती दिली. या धोरणात सर्वसमावेशकतेचा आग्रह धरण्यात आला आहे. या समितीच्या एकूण 18 बैठका झाल्या. तसेच, विविध विषयांच्या अनुषंगाने नेमलेल्या उपसमितीच्या 108 बैठका झाल्या. समितीकडे एकूण 137 व्यक्ती आणि 43 संस्था-संघटनांनी त्यांची निवेदने सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव खारगे यांनी, या धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. त्यापूर्वी या धोरणातील शिफारशींच्या अनुषंगाने इतर शासकीय विभागांशी निगडीत बाबींसंदर्भात त्यांची मते जाणून घेण्यात येतील, असे सांगितले.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content