Homeमाय व्हॉईसफडणवीसांची धावाधाव तर...

फडणवीसांची धावाधाव तर शरद पवारांची पावले महायुतीकडे!

महाराष्ट्रातल्या २९ महापालिकांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा प्रचाराचा धुरळा उडत आहे. आरोप, प्रत्यारोप, टोमणे आणि टीका ह्यांना ऊत आला आहे. सगळ्याच पक्षातल्या वाचाळवीरांचे तर आता फावलेच आहे. त्यातही शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत ह्यांनी तर ताळतंत्रच सोडले आहे. फडणवीस आणि शिंदे ह्यांच्यावर ते व्यक्तीगत टीका करत आहेत. त्यातच भर पडते आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ह्यांची. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्यावर मात करण्यासाठी, त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते, नगरसेवक आधी फोडले. मग शिंदेंनी तक्रार केल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी युती धर्म पाळण्याच्या सूचना दिल्यानंतर ते थांबले. नंतर लातूरला जाऊन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावर फडणवीसांना डॅमेज कंट्रोल करावे लागले. ते होत नाही तर अंबरनाथमध्ये भाजपाने काँग्रेसशी युती केली. खरेतर नगराध्यक्ष भाजपाचाच झाल्यामुळे शिंदे गटाला आधीच धक्का बसला होता. त्यातच भर म्हणजे ही काँग्रेसशी युती. ह्यावर पुन्हा फडणवीसांना डोळे वटारावे लागले आणि ही अभद्र युती रद्द करण्याचा आदेश त्यांना काढावा लागला. ते होत नाही तर चव्हाणांनी कहरच केला. युती तुटल्यानंतर काँग्रेसने त्या १२ नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले तर लगेच चव्हाणांनी काँग्रेसच्या त्याच १२ नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिला आणि शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवले. आता काँग्रेस वरिष्ठांनी ह्या सगळ्या प्रकरणाची दाखल घेऊन त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी न्यायालयात जाण्याचे ठरवले आहे. मात्र आता भाजपाला धडा शिकवण्यासाठी श्रीकांत शिंदे ह्यांनी वेगळीच खेळी केली आहे. अंबरनाथमध्ये शिंदेंची सेना आणि राष्ट्रवादीशी युती करून त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

फडणवीस

महाराष्ट्रातल्या ह्या महानगरपालिकांच्या निवडणुका कधी नव्हे त्या इतक्या गाजत आहेत. एकीकडे उद्धव आणि राज ठाकरे ह्यांनी मराठीचा झेंडा हाती घेत मुंबई आणि महानगर क्षेत्रातल्या महानगरपालिका लक्ष्य केल्या आहेत. दुसरीकडे भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेने हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवायचे ठरवले आहे. मात्र महायुतीतील तीन पक्ष तीन दिशांना असल्याचे चित्र दिसत आहे. एकतर अनेक ठिकाणी ७-८ वर्षांनी निवडणूक होते आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या खूप झाली आहे. ज्यांना उमेदवारी नाही मिळाली त्यापैकी अनेकांनी बंडखोरी केली. भाजपाने 113 बंडखोरांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. जेथे महायुती होणार नाही तिथे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आधीच ठरले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांनी तर थेट आपले काका शरद पवार ह्यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी म्हणे अमित शाह ह्यांच्याकडून परवानगी मिळवली आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीत कोण, कोणाशी युती करतो आहे आणि कोण कोणाविरूद्ध निवडणूक लढवतो आहे हेच कळेनसे झाले आहे.

फडणवीस

जे महायुतीचे तेच महाविकास आघाडीचे झाले आहे. काँग्रेसने मनसेला बरोबर घेण्यास नकार दिल्यानंतर महाविकास आघाडीचीही मोट सुटली आहे. एकीकडे दोन्ही ठाकरे बंधु, दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तर राष्ट्रवादी शप कुठे अजितदादांबरोबर, कुठे शिवसेनेबरोबर तर कुठे काँग्रेसबरोबर निवडणूक लढवत आहे. म्हणजे महायुतीतील एक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार, ह्यांची युती राष्ट्रवादी शपशी. राष्ट्रवादी शपची युती शिवसेना उबाठा-मनसे ह्यांच्याशी आणि काँग्रेसशी, मग विरोधात राहिले कोण? बरं निवडणुका झाल्यावर सत्तास्थापनेसाठी पुन्हा कोण कुणबरोबर जाणार हे ठरेलच. एकमात्र नक्की आहे जरी २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होत असल्या तरी सगळ्यांचे लक्ष मुंबई महापालिकेकडे आहे. त्यासाठी ठाकरे बंधुंनी एकीकडे कंबर कसली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मुंबईच्या विकासाचा मुद्दा लावून धरला आहे. फडणवीस एकीकडे महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढत आहेत. प्रत्येक महानगरपालिकेच्या मतदारसंघात जाहीर सभांचा धडाका त्यांनी लावला आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधु केवळ शाखांना भेटी आणि मोजक्याच जाहीर सभांवर भर देत आहेत. मुलाखती प्रसारित करत आहेत. तिसरीकडे अजित पवार पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथेच लक्ष केन्द्रित करत आहेत. त्यांच्याही जाहीर सभांमधून भाजपावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. दोन्ही महापालिकांमध्ये पूर्वी भाजपाची सत्ता होती. त्यांच्या कारभारावर ते ताशेरे ओढत आहेत. आता जनसामान्यांना प्रश्न पडला आहे की, ह्या निवडणुकीनंतर जसे ठाकरे बंधुंचे 20 वर्षांनी मनोमीलन झाले तसेच पवार काका-पुतण्याचे होणार का? निवडणुकीनंतर अजितदादा युतीमध्ये राहणार का? की काकांनाही महायुतीमध्ये आणणार? कारण, राष्ट्रवादी, मग तो शरद पवार ह्यांचा असो की अजितदादांचा, सत्तेशिवाय फार काळ राहू शकत नाही हेच खरे.

(लेखिका ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आवई उठवायची आणि पोळी भाजायची ही शिवसेना (उबाठा)ची कार्यपद्धती!

होणार–होणार म्हणून गेले अनेक दिवस गाजत असलेली उद्धव ठाकरे ह्यांची शिवसेना आणि राज ठाकरे ह्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती जाहीर झाली. अर्थातच ही युती जाहीर झाल्यापासून त्याच्यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया, राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी आणि प्रसारमाध्यमांची धावपळ. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद...

तपोवन आंदोलन मुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी!

नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी साधूग्राम वसवण्यासाठी तपोवन भागातील वृक्ष तोडणार असल्याच्या चर्चेने आता प्रत्येकजण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. मुख्य म्हणजे सत्ताधारी महायुतीतच आता ह्यावरून मतभेद निर्माण झाले आहेत. एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्यातील वाद...

कुठवर उडणार महापालिका निवडणूक प्रचाराची राळ?

महाराष्ट्रातील नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकींच्या प्रचाराचा धुरळा आज थंडावतोय. मात्र त्याचवेळी काही नगर पालिकांच्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका न्यायप्रविष्ट असल्याने, निवडणूक आयोगाने त्या पुढे ढकलल्या. ह्यावरून राजकीय पक्ष, तिथले उमेदवार आणि अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे....
Skip to content