दिवाळी अंक सार्वकालिक असून दिवाळी अंकांमुळेच अनेक नामवंत लेखकांना मानाचे पान मिळाले, सन्मान मिळाला, नाव मिळाले. ते नावारुपाला आले. दिवाळी अंकांना साहित्यक्षेत्रात वेगळेच महत्त्व आहे. दिवाळी अंकांशिवाय मराठी साहित्याचा आपण विचारच करू शकत नाही, असे प्रतिपादन ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.
मुंबई मराठी पत्रकार संघ व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या २३व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई मराठी पत्रकार संघ येथे नुकताच पार पडला. त्यावेळी डॉ. शोभणे बोलत होते. राजकारणात राहून साहित्यावर प्रेम करणारे रामशेठ ठाकूर यांनी दिवाळी अंक स्पर्धेच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकास एक लाखाचा प्रथम पुरस्कार देऊन मोठे कार्य केले आहेच. सोबत दिवाळी अंकांच्या अर्थकारणात या पुरस्कारांच्या माध्यमातून आर्थिक हातभारही लावला आहे. असे साहित्यप्रेमी राजकारणी विरळाच आढळतात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना रामशेठ ठाकूर म्हणाले की, काळ बदलत जात असताना दिवाळी अंक बदलत आहेत. चांगले चांगले दिवाळी अंक निघत आहेत. मी मराठीचा पदवीधर आहे. माझ्या मराठीवर माझे नितांत प्रेम आहे. आता जास्तीतजास्त वेळ मी साहित्यक्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी देत आहे. ताजमहाल जसा प्रसिद्ध आहे तसा मुंबईत मुंबई मराठी पत्रकार संघ प्रसिद्ध आहे. संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी मांडलेली डिजिटल दिवाळी अंकाना पुरस्कार देण्याची कल्पना स्तुत्य आहे. त्यास जे काही सहकार्य लागेल ते आपण देऊ.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले की, वाढत्या महागाईत दिवाळी अंक काढण्याची कसरत खूप खर्चिक होत आहे. त्यासाठी सरकारदरबारी आमदार प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर यांनी प्रयत्न करावेत. सरकारी ग्रंथालये, शाळांना पुस्तके, दिवाळी अंक जातील यासाठी पुढाकार घ्यावा.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात दिवाळी अंक स्पर्धा अजून मोठ्या स्वरूपात कशी करता येईल यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू असे सांगितले. सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री नीरजा म्हणाल्या की, भावनिक, पोटाची, बुद्धीची अशी भूक असते. मात्र बुद्धीची भूक मागे पडत आहे. साहित्य, नाटक, पुस्तके यासाठी उत्पन्नाच्या दोन टक्केही खर्च होत नसावा. असेच चित्र राहिले तर भविष्यात वाचक आयात करावे लागतील.
पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी प्रास्ताविक तर उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ सदस्य दीपक म्हात्रे यांनी आभार मानले.
या स्पर्धेतले विजेते पुढीलप्रमाणे:
सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक– दीपावली (प्रथम पारितोषिक, एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह)
ऋतुरंग (द्वितीय पारितोषिक, पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
पद्मगंधा (तृतीय पारितोषिक, तीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
सर्वोत्कृष्ट विशेषांक– अक्षरदान, पुणे (१५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
मुलांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक- वयम (७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह), उत्तेजनार्थ- धमाल मस्ती
उत्कृष्ट दिवाळी अंक– हंस (१५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
उत्कृष्ट कथा– इनसायडर, लेखक– पंकज कुरुलकर, युगांतर दिवाळी अंक (३ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
उत्कृष्ट कविता– कवयित्री– संगीता बर्वे, मौज दिवाळी अंक (३ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
उत्कृष्ट मुखपृष्ठ– किरण हणमशेट (चंद्रकांत दिवाळी अंक) (३ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
उत्कृष्ट व्यंगचित्रे– घन:शाम देशमुख (धमाल धमाका दिवाळी अंक) (३ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
याशिवाय, सर्वोत्कृष्ट लेख (अनिल पाटील, चंद्रकांत दिवाळी अंक), लक्षवेधी परिसंवाद (AIचे जग, अक्षर दिवाळी अंक), लक्षवेधी मुलाखत (डॉ. राजुरकर, संवादक – डॉ. विजय पांढरीपांडे, लय भारी दिवाळी अंक)
रायगड जिल्हास्तरीय विजेते पुढीलप्रमाणे:
सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक– सृजन
शब्द संवाद, द्वितीय
साहित्य आभा, तृतीय
उत्तेजनार्थ– आगरी दर्पण, किल्ले रायगड (प्रत्येकी पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
उत्कृष्ट कथा– आसक्या, प्रा. राजेंद्र सोनवणे (साहित्यविश्व) (३ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
उत्कृष्ट कविता– कोण असे तू, विजय इंद्रकेशव (इंद्रधनू) (३ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
उत्कृष्ट व्यंगचित्रकार– विवेक मेहेत्रे (साहित्य आभा) (३ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)