पैठण एमआयडीसीच्या औद्योगिक परिसरात महालक्ष्मी इंडस्ट्रीज या नावाचा मेफेड्रोन आणि केटामाइनचे उत्पादन करणारा कारखाना आढळून आला. या ठिकाणाहून एकूण 4.5 किलो मेफेड्रोन, 4.3 किलो केटामाइन आणि सुमारे 9.3 किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण जप्त करण्यात आले. या अंमली आणि मनोविकृतीकारक पदार्थांची बेकायदेशीर बाजारातील किमत 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची नोंद केली गेली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली आहे.

अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ संबंधी कायदा 1985 (NDPS 1985) च्या संबंधित तरतुदींनुसार हे सर्व पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यातील एका आरोपीच्या निवासी परिसराची झडती घेतल्यावर सुमारे 23 किलो कोकेन, सुमारे 2.9 किलो मेफेड्रोन आणि 30 लाख रुपये मूल्याच्या भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणी एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार मुख्य सूत्रधारासह दोन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाचा अहमदाबाद विभाग आणि गुजरात पोलीसांची अहमदाबाद गुन्हे शाखा यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाने शुक्रवार, 20.10.2023 रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात विविध ठिकाणी अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ संबंधी कायदा 1985 अंतर्गत शोधमोहीम राबवली. नंतर औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही या कारवाईत सहकार्य केले.

सिंथेटिक औषधांचा वाढता वापर आणि या औषधांच्या निर्मितीमध्ये औद्योगिककारखान्यांचा गैरवापर ही गोष्ट महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) या कारवाईमुळे उघडकीस आली आहे. त्याचबरोबर देशात अंमली पदार्थांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आंतर-एजन्सी सहकार्याचे महत्त्व देखील या कारवाईने अधोरेखित झाले आहे.