डॉ. विजयकुमार देशमुख यांच्या गोपाळकाला, या काव्यसंग्रहाला तसंच जोहार मायबाप या नाटकाला “साहित्य सेवा पुरस्कार २०२५” घोषित करण्यात आला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात २७ फेब्रुवारी रोजी हे पुरस्कार फलटण संस्थानचे अधिपती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते वितरीत केले जाणार आहेत. फलटण इथं होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात पुरस्कार वितरण होईल.
श्रेष्ठ कवी, नाटककार ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी काव्य व नाटक या दोन्ही साहित्य प्रकारांना हे पुरस्कार प्राप्त होणं म्हणजे दुग्धशर्करा योग आहे, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी व्यक्त केली. डॉ. विजयकुमार देशमुख यांच्या आजपर्यंत प्रकाशित झालेल्या पाचही पुस्तकांना आतापर्यंत मानाचे एकूण बारा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.