मुंबईच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांच्या गाईल्स ढाल स्पर्धेत विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने प्रथमच जेतेपदाला गवसणी घालून स्पर्धेत काहीशी खळबळ माजवली. कारण स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आंबेडकर विद्यालय जेतेपदाच्या शर्यतीत नव्हते. यापूर्वी आंबेडकर विद्यालयाची या स्पर्धेतील कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. कारण याअगोदर आंबेडकर विद्यालयाची मजल या स्पर्धेत पाचव्या फेरीच्या पुढे कधी गेलीच नव्हती. परंतु यंदा मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकापाठोपाठ एक सफाईदार विजय मिळवत अखेर आंबेडकर विद्यालयाने निर्णायक लढत जिंकून लाख मोलाचे विजेतेपद मिळविण्यात यश मिळविले. आंबेडकर विद्यालयाने १६ वर्षांखालील हॅरिस ढाल स्पर्धेतदेखील “प्ले ऑफ”पर्यंत मजल मारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या गाईल्स ढाल स्पर्धेचा १२३ वर्षांचा मोठा इतिहास आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटू या स्पर्धेतूनच मुंबईला आणि पुढे भारताला मिळाले. बीकेसी येथे झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात प्रथमच स्पर्धेची निर्णायक फेरी गाठणाऱ्या आंबेडकर विद्यालयाने नवी मुंबईच्या ज्ञानदीप सेवा मंडळ प्रायमरी अॅन्ड सेकंडरी स्कूलचा ६ गडी राखून आरामात पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ज्ञानदीप स्कूलला पहिल्या डावात अवघ्या ६७ धावात गुंडाळून आंबेडकर विद्यालयाने अर्धी लढाई जिंकली. त्यांच्या ओम लोखंडेने अंतिम सामन्यावर आपल्या अष्टपैलू खेळाची सुरेख मोहर उमटवली. तोच त्यांच्या विजयाचा शिल्पकार होता. त्याने पहिल्या डावात ७ बळी घेऊन ज्ञानदीप स्कूलची दाणादाण उडवली. मग फलंदाजीतदेखील आपली छाप पाडताना त्याने ८१ धावांची शानदार खेळी केली.

सुरुवातीला आंबेडकर विद्यालयाची ८ बाद १०० धावा अशी बिकट अवस्था झाली होती. परंतु लोखंडेच्या चिवट खेळीने त्यांचा डाव सावरला. त्या खेळीने विजयाचे पारडे आंबेडकर विद्यालयाच्या बाजूने झुकवले. त्यामुळेच आंबेडकर विद्यालयाला पहिल्या डावात २०४ धावांची मजल मारता आली. तिवारी, चव्हाणच्या फिरकी माऱ्यासमोर ज्ञानदीप स्कूलचा दुसरा डाव १९२ धावात आटोपला. या दोघांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. मग विजयी लक्ष्य आंबेडकर विद्यालयाने ४ गडी गमावून सहज पार केले. अंतिम सामन्यात शानदार अष्टपैलू खेळ करणारा ओम लोखंडे सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी ठरला. तर त्यांच्याच अर्णव शेलारला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला, आंबेडकर विद्यालयाची फलंदाजी भक्कमपणे सांभाळणाऱ्या अद्वैत तिवारीला सर्वोत्तम फलंदाजाचा मान मिळाला. त्याने या स्पर्धेत ७०८ धावा फटकावल्या. त्यामध्ये २ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच आपल्या गोलंदाजीची चमक दाखवताना त्याने ३२ बळीदेखील टिपले. एकूण ९ सामने जिंकून अखेर आंबेडकर विद्यालयाने जेतेपदावर कब्जा केला. त्यामध्ये ५ “नॉक आऊट” सामन्यांचा समावेश होता.
अंतिम सामन्यापूर्वी कागदावरतरी ज्ञानदीप स्कूलचे पारडे जड होते, कारण त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी दोन-तीन वेळा स्पर्धेत ३००पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला होता. परंतु क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरला आहे. त्याची प्रचिती पुन्हा एकदा अंतिम सामन्यात आली. तीन दिवसांचा हा सामना २ दिवसांतच संपला. यंदा या स्पर्धेत प्रथमच एसजीचे चेंडू वापरण्यात आले. उपांत्य फेरीच्या सामन्यात आंबेडकर विद्यालयाने मुलुंडच्या आर आर एज्युकेशन शाळेचा पराभव केला होता. या सामन्यात डॉ. आंबेडकर विद्यालयाच्या तिवारीने नाबाद ७२, कोथमिरेने ६१ धावांची दमदार खेळी केली. चव्हाणने ४ आणि तिवारीने ३ बळी घेऊन त्यांचा पहिला डाव १३५ धावातच संपवला. आंबेडकरने पहिल्या डावात २२१ धावांची मजल मारली होती. आंबेडकर विद्यालयाने दुसऱ्या डावात ७ बाद १६९ धावांची मजल मारली. त्यांच्या अद्वैत तिवारीने ९३ धावांची सुरेख खेळी केली. मग अष्टपैलू कामगिरी करताना तिवारीने दुसऱ्या डावात ७ बळी घेऊन आर. आर. एज्युकेशनचा दुसरा डाव १४७ धावात संपवला. आंबेडकर विद्यालयाने १०८ धावांनी दणदणीत विजय मिळविला.

दुसऱ्या सामन्यात ज्ञानदीपने जनरल एज्युकेशन अकादमीचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पराभव केला. विजयी संघाच्या श्रीयुश चव्हाणने ८०, अनुज चौधरीने ६१ धावा ठोकल्या. अनुप यादव आणि उमर नदिमने प्रत्येकी ३ बळी घेऊन जनरल एज्युकेशन अकादमीला २२४ धावात रोखण्यात यश मिळविले. ज्ञानदीपचा पहिला डाव २९१ घावात आटोपला होता. या स्पर्धेत आंबेडकर विद्यालयाने रोहित शर्माच्या स्वामी विवेकानंद शाळेला, पृथ्वी शॉच्या रिझवी शाळेला पराभवाचा दणका दिला होता. सुरुवातीला स्वामी विवेकानंद शाळेचा पराभव केल्यामुळे आंबेडकर विद्यालयाच्या खेळाडूंचे मनोधैर्य चांगलेच उंचावले. त्यांचा आत्मविश्वास वाढला. आपण ही स्पर्धा जिंकू शकतो अशी खात्री खेळाडूंना वाटू लागली. अद्वैत तिवारी, आयुष चव्हाण, सन्मित कोथमिरे, ओम लोखंडे हे आंबेडकर विद्यालयाच्या विजयाचे शिल्पकार होते. अद्वैतने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतदेखील चमक दाखवली. त्याला आयुषची चांगली साथ मिळाली. या दोघांनी अनुक्रमे ३२ व ३३ बळी मिळविले. सन्मित कोथमिरेनेदेखील सुरेख फलंदाजी करताना ५५४ धावा केल्या. त्यात दोन शतकांचा समावेश होता. जनरल एज्युकेशन सोसायटीविरुद्धच्या सामन्यात सन्मितने ६९ धावांची चिवट खेळी करून आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. ३०७ धावांचे विजयी लक्ष्य आंबेडकर विद्यालयाने यशस्वीपणे पार केले. तसेच विवेकानंदविरुद्धच्या लढतीतदेखील एका बाजूने आंबेडकरच्या विकेट भराभर जात असताना सन्मितने ४७ धावांची केलेली चिवट खेळी त्यांच्या संघासाठी फारदेशीर ठरली. अर्थातच त्यांना संघातील इतर सहकाऱ्यांची चांगली साथ मिळाल्यामुळेच हे ऐतिहासिक विजेतेपद अखेर आंबेडकर विद्यालयाने पटकावले.

गेली ६ वर्षे आंबेडकर विद्यालयाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जयेश उत्तेकर ही जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना गणेश पालकर, राकेश कुमार, राजू अडागळे या सहाय्यक प्रशिक्षकांचे मोलाचे सहकार्य मिळाले. गणेश पालकर यांनी काही चांगले खेळाडू हेरून शाळेला दिले, ज्याचा मोठा फायदा झाला. जूनपासूनच शाळेच्या क्रिकेट संघाने जोरदार सरावाला प्रारंभ केला. प्रशिक्षक उत्तेकर सरांनी सर्वात प्रथम खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर स्पॉट बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण यावर भर दिला. त्याचाच मोठा फायदा आंबेडकर विद्यालयाला सामने खेळताना निश्चितपणे झाला. ह्या तीनही महत्त्वाच्या बाबी आहेत. त्या जर चांगल्या असतील तर तुम्हाला विजयाची संधी जास्त मिळू शकते, असे उतेकर सरांचे मत आहे. खेळाडूंनी रोजचा ७-८ तास केलेला सराव निर्णायक ठरला. शाळेने सर्व सुविधा, सवलती खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या. खेळाडूंना अभ्यासाचे काही मोजकेच महत्त्वाचे तास वर्गात बसण्याची मुभा दिली. त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी जास्तीतजास्त वेळ मिळाला. त्याचा पुरेपूर लाभ खेळाडूंनी घेतला. विद्यालयाच्या व्यवस्थापनाचेदेखील खेळाडूंना नेहमीच मोलाचे सहकार्य राहिले आहे. त्यामुळे खेळाडूंवर कुठल्याच दडपण नव्हते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता घोडके, सचिव डॉ. विनय राऊत, सल्लागार डॉ. अनघा राऊत यांनीदेखील वेळोवेळी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. प्रशिक्षक जयेश उत्तेकर दादरच्या राजा शिवाजी विद्यालयाचे क्रिकेटपटू. परंतु तेव्हा त्यांच्या शाळेला ही स्पर्धा जिंकता आली नव्हती. अखेर प्रशिक्षक म्हणून का होईना ही स्पर्धा जिंकण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. आता जेतेपदाची सुरू झालेली ही वाटचाल भविष्यात त्यांना कायम ठेवायची आहे.

खुप छान लेख आहे