Sunday, June 23, 2024
Homeकल्चर +'डॉन' फक्त एकच!...

‘डॉन’ फक्त एकच! अमिताभ बच्चन!!

लहानपणच्या आम्हा मित्रमंडळींचं आणि अमिताभ युगाचं नातं वेगळं करता येणार नाही. अमिताभ बच्चन हा महानायक त्याकाळी प्रत्येक श्वासात होता. त्यावेळचं संपूर्ण जनजीवन हेच अमिताभमय होतं. अमिताभ बच्चन आणि सुपरहिट सिनेमा हे समीकरण सर्वार्थाने रूढ झालं होतं. १९७८ सालचा त्याचा डॉन हा सिनेमा त्याच्या सुपरहिट सिनेमांपैकीच एक होता.

१२ मे १९७८. ४८ वर्षांपूर्वी अमिताभ बच्चनचा “डॉन” सिनेमा रिलीज झाला होता. अमिताभ युगातील ती ऐन बहराची वर्षं होती. एकाच वेळेस अमिताभ बच्चनचे ३-३ सिनेमे समोरासमोरच्या थिएटरमध्ये लागायचे आणि सगळे सिल्व्हर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली, डायमंड जुबिली व्हायचे. लोक रांगा लावून तिकिटे काढत असत. ॲडव्हान्स बुकिंग फुल होऊन तिकिटे मिळत नसत. ब्लॅकवाल्यांनी त्या काळात लाखो रुपये सुपरस्टार अमिताभ बच्चनच्या तिकिटांचा काळाबाजार करून मिळवले होते!

तिकीटबारीवर ॲडव्हान्स बुकिंगसह डॉन रिलीज झाला. पोस्टरवर धावत असलेला आणि काळं जाकीट घातलेला अमिताभ बच्चन, प्राण आणि बॉयकट केलेली उफाड्याची झिनिबेबी असायची! त्या बालवयात उफाडा वगैरे कळत नव्हतं. ते योग्य वयात लक्षात आल्यावर अमिताभ बच्चनच्या सिनेमांची परत पारायणे करताना झीनत काय चीज होती हे कळलं. तर झीनतच्या उफाड्यासाठी नाही पण अमिताभचा सिनेमा म्हणून डॉन बघायचा(च) हे नक्की होतं. आमचं/सर्वांचं अमिताभ प्रेम इतकं जुनं होतं.

डॉन  सिनेमाचा प्लॉट जबरदस्त होता. अमिताभ बच्चन स्मगलर टोळीचा बॉस असतो. उलट्या काळजाचा आणि कोणाचीही हत्त्या करणारा डॉन असतो. तो इफ्तकारच्या हातून मारला जातो आणि मग टोळीची पाळेमुळे खणून काढायला तसाच दिसणाऱ्या विजय नावाच्या एका सामान्य माणसाला पोलीस कमिशनर इफ्तकार, डॉन बनवून टोळीत सामील करवतो. त्यात झीनत अमान आणि प्राणची उपकथानके आहेत जी मूळ कथानकात सहज मिसळून जातात.

माझ्या मते डॉन हा सिनेमा अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण, कल्याणजी आनंदजी ह्या सर्वांच्या कारकिर्दीतील टॉप ५ सिनेमांपैकी एक ठरू शकेल. प्रचंड वेगाने धावणारी, प्रेक्षकांना जराही उसंत न देणारी पटकथा हा सिनेमाचा आत्मा आहे. उत्कृष्ट पटकथा ज्याला पाहायची आहे त्या प्रत्येकाने आवर्जून ह्यातील एक एक सीन पाहावा. डायलॉग नेहमीप्रमाणे सुपर होते. “डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्को की पुलीस कर रही है, लेकीन..” हा डायलॉग आजही रिलेव्हन्ट आहे. ह्यातच त्याच्या यशाचं गमक आहे.

अमिताभ बच्चनने साकारलेला स्टायलिश, थंड डोक्याचा डॉन आणि त्याच्या कॉन्ट्रास्टमधील गावंढळ, अशिक्षित विजय झकास आहेतच. पण अमिताभ बच्चनची खरी कामगिरी म्हणजे विजयचा डॉन झाल्यावर करावी लागणारी कसरत! आणि ती अमिताभ बच्चनच दाखवू शकतो. निव्वळ अप्रतिम. गँगमधील एकाला गोळी मारून त्याचं कारण इतरांनी विचारल्यावर थंडपणे “मुझे इसके जुते अच्छे नहीं लगे” म्हणणारा अमिताभ क्रूरपणातही भावतो!

झीनत अमान ह्या सिनेमात पहिल्यांदाच बॉयकटमध्ये पडद्यावर आली असावी. भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायला, कराटे वगैरे शिकून, डॉनचा खात्मा करायला गँगमध्ये आलेली रोमा उभी करताना झीनत अमान तिच्या त्या ॲटीट्यूडमुळे आणि अर्थात जगप्रसिद्ध उफाडयामुळे भाव खाऊन जाते. डॉन नसलेला पण तिला डॉन वाटणारा विजय आणि तिच्यातील संघर्ष, पुढे सत्य माहीत झाल्यावर फुलणारा रोमान्स वगैरे एकदम लाजवाब आहे.

प्राणबद्दल काय लिहावं? प्राणला कोणतीही भूमिका द्या. तो ती अक्षरशः जगत असे. ह्या सिनेमातही त्याने चुकीच्या मार्गाला लागून तुरुंगात गेलेला आणि बाहेर आल्यावर मुलांना शोधताना कासावीस झालेला बाप छानच रंगवला होता. इफ्तकारचा पोलीस कमिशनर नेहमीप्रमाणे झकास. बाकी ओम शिवपुरी, कमल कपूर, सत्येन कप्पू, शेट्टी ह्या नेहमीच्या यशस्वी मंडळीनी आपापल्या भूमिका चोख निभावून नेल्या.

गंमत म्हणजे त्या काळातील अमिताभ बच्चनच्या बहुतांश सिनेमांमध्ये मुख्य व्हिलनचे पात्र निभावणारे अमजद खान, रणजित, प्रेम चोप्रा ह्यांच्यापैकी कोणीही डॉनमध्ये नव्हतं. असं म्हणतात की हिरोला मोठा करायचा असेल तर व्हिलनदेखील तितकाच ताकदवान दाखवावा लागतो. पण डॉनचं वैशिष्ठय हे की इथे व्हिलन अजिबात स्ट्रॉंग नव्हता. कारण हिरो स्वतःच सुरुवातीला व्हिलन होता. मग सिनेमाभर व्हिलन होती ती सिच्युएशन, ज्यात हिरो फसत जातो आणि सिनेमाची उत्कंठा वाढवत राहतो.

डॉनची सगळी गाणी सुपरहिट होती. “अरे दिवानो! मुझे पहचानो!, कहां से आया? मै हुं कौन?”, “इ है बंबई नगरिया तू देख बबुवा”, “जिस का मुझे, था इंतजार, वो घडी आ गई आ गई..” .. सगळी गाणी बिनाका गीतमालामध्ये धुमधडाक्यात येऊन गेली. गीतमाला गाजवून गेली.

हेलनवर चित्रित झालेलं “ये मेरा दिल प्यार का दिवाना” आणि आयकॉनिक “खई के पान बनारसवाला, खुली जाय बंद अकल का ताला!” ही गाणी लोक आजही ऐकतात आणि त्यांचे पाय थिरकतात. विशेष म्हणजे डॉनमध्ये अमिताभ बच्चन आणि झीनत अमान ह्यांचं एकही रोमॅंटिक साँग नाहीये. पटकथेत जागा नसूनही गाणं घुसवण्याचा करंटेपणा केला गेला नाही जो आजकालच्या चित्रपटांमध्ये केला जातो. आणि तसं असूनही प्रेक्षकांना रोमँटिक गाण्याचा अभाव जाणवला नाही. गाण्यातील रोमांन्स फक्त “खई के पान बनारस वाला” ह्या गाण्यात “एक कन्या कुवांरी, हमरे दिलं में उतर गयी हाय” ह्या कन्फेशनमध्ये आणि त्यावर झीनतने लावलेल्या ठुमक्यात आहे!

डोंगरउतारावर कोसळत जाणाऱ्या शिळेसारखा डॉन हा सिनेमा प्रचंड वेगाने क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतो. आणि मग स्मशानातील “डायरी पासिंग फाईट”बरोबर संपतो. प्रत्येक प्रेक्षक एका भारावलेल्या अवस्थेत, सॉल्लिड सिनेमॅटिक अनुभव घेऊन, तृप्त होत थिएटरमधून बाहेर येतो.

डॉन, ह्या नावाने आणि त्याच कथेवर आधारित सिनेमा शाहरुख खानला घेऊन बनवला गेला. तुलना करायचा प्रश्नच नाही. कारण ती होऊच शकत नाही. उद्या आणखी एखादया “खाना”ला घेऊन कोणीतरी परत डॉन बनवेल. हे होतच राहील कदाचित. पण १२ मे १९७८ साली अमिताभ बच्चनच्या “डॉन” नामक सिनेमाची जी जादू निर्माण झाली ती आता परत होणे नाही.

डॉनने त्या काळी तिकीटबारीवर ७ कोटींचा गल्ला जमवला होता. तेव्हा तिकिटांचे दर १० रुपये वगैरे होते. म्हणजे साधारण ७० लाख लोकांनी तिकीट काढून सिनेमा पाहिला होता. आज जर सरासरी ५०० रुपयांचं १ तिकीट काढून ७० लाख लोकांनी एखादा सिनेमा पाहिला तर त्याचं कलेक्शन ३५० कोटी असेल. प्लस सॅटेलाईट, ओव्हरसीज राइट्स, ओटीटी राईट आणि म्युझिक राईट्समधून मिळतील ते वेगळे. थोडक्यात अमिताभ बच्चनचा डॉन आजच्या काळातील ४५० ते ५०० कोटी रुपयांचा धंदा करणाऱ्या सिनेमाशी बरोबरी करणारा सिनेमा होता आणि मनोरंजन, सिनेमॅटिक अनुभवाच्या बाबतीत आजच्या बहुसंख्य सिनेमांच्या कित्येक वर्षे पुढे होता. ४८ वर्षांपूर्वी बनलेला असूनही!

Continue reading

.. आणि देमार ॲक्शन चित्रपटांचा जमाना सुरू झाला!

सुपरस्टार अमिताभ बच्चनचा जंजीर, हा प्रतिष्ठित चित्रपट रिलीज होऊन याच महिन्यात ५१ वर्षं झाली. जंजीर १९७३च्या मे महिन्यात रिलीज झाला होता. प्रकाश मेहरा दिग्दर्शित, निर्मित आणि सलीम-जावेद लिखित या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया भादुरी, प्राण, अजित आणि बिंदू यांनी...
error: Content is protected !!