Friday, September 20, 2024
Homeहेल्थ इज वेल्थआनंदात वचन तर...

आनंदात वचन तर रागात निर्णय नेहमीच घातक!

आनंदात वचन तर रागात निर्णय घेऊ नये, असे म्हणतात. ते नेहमी घातक ठरते. यासाठीच लागते मनावर नियंत्रण. १० ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्‍य दिन म्‍हणून साजरा केला जातो. आरोग्‍य हा आपल्‍या प्रत्‍येकाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत जिव्‍हाळयाचा व संवेदनशील विषय आहे. निरोगी आयुष्‍यासाठी आपण नाना प्रकारचे उपाय व प्रयोग आपल्‍या शरीरावर करत असतो. त्‍यात व्‍यायाम, योगा, आहार, विविध सप्‍लीमेंट, नियमित वैदयकीय चाचण्‍या इत्‍यादी क्रिया सर्वसामान्‍यपणे वापरल्‍या जातात.

फिटनेस राखण्‍यासाठी सर्व स्‍तरांतील लोक आग्रही असतात. फिटनेस म्हणजेच आरोग्य. फिटनेस हे शरीरासाठी महत्त्वाचे आहेच, पण मनासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. आज अनेकजण आपल्या व्‍यस्‍त जीवनशैलीतून वेळ काढून जिममध्ये जातात, डाएट करतात, विविध पथ्‍ये पाळतात. जे जे जमेल ते करून आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न करतात. पण आपण एका महत्त्वाच्या गोष्टीकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही आणि ते म्हणजे आपले मन. त्याचेही आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे.

मन हे आपल्‍या शरीराचा अविभाज्‍य भाग आहे. त्‍यामुळेच मनाचे आरोग्‍य शारीरिक आरोग्‍याशी निगडित आहे. मनाचे महत्त्‍व ओळखूनच रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले, जे आजही लोक आपल्‍या आचरणासाठी आदर्श मानतात. आपल्या धर्मामध्ये ध्यानधारणेला खूपच महत्त्व आहे. आजकाल ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो, त्‍याच्‍या आधारे मानसिक संतुलन व आरोग्‍य राखण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. शरीराला फिट ठेवण्यासाठी जसे योग्य आहार-विहार आवश्यक आहे त्याचप्रमाणे मनाला फिट ठेवण्यासाठीही आपण प्रयत्‍न करायला हवेत.

सर्वात महत्त्‍वाचे म्हणजे आपल्या वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण आपली कामे वेळेत पूर्ण करू शकतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या मनावर कामाचा ताण येत नाही. आजकालचे जीवन खूपच वेगवान झाले आहे. कामधंदयाच्‍या धावपळीत आपण आपल्‍या शारीरिक स्‍वास्‍थ्‍याकडे दुर्लक्ष करतोच, मात्र, मनाच्या आरोग्‍याकडेही आपले फार लक्ष नसते. जगण्‍याच्‍या धावपळीत रोज अनेक कामे आपल्याला करायची असतात. त्यामुळे वेळेचे नियोजन हे खूपच आवश्यक आहे. नुसतीच कामे महत्त्वाची नसून आपला आहार आणि आरामही तितकाच महत्त्वाचा आहे.

आजच्या या धावपळीच्या आयुष्यात स्वतःला टिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवणे महत्त्वाचे आहे आणि ते आपल्याच हातात आहे. मनाचा खंबीरपणा आपल्याला खूप आत्‍मविश्‍वास व बळ देतो. यामुळे आपण कोणत्‍याही प्रतिकूल परिस्थितीवर सहज मात करू शकतो. अशी माणसे आपल्या आजूबाजूला दिसतातच पण कितीतरी वेळेला आपणही असे काही केलेले असते आणि करतही असतो. ते शक्य होते ते मनाच्या उत्तम आरोग्यामुळे.

आनंदाच्या भरात काहीही वचन देऊ नये आणि रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. कारण, दोन्ही वेळेला आपले मन थाऱ्यावर नसते. त्यामुळे आपण चुकीचा निर्णय घेण्‍याची शक्‍यता अधिक असते. म्हणजेच भावनेच्या भरात मनावर संयम ठेवता आला पाहिजे. कुठल्याही वेळी मनावर संयम ठेवता येणे हेपण मनाचे आरोग्य उत्तम असण्याचे लक्षण आहे. म्हणूनच आपण शरीर आणि मन दोन्हीचे आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मन स्थिरस्‍थावर असेल तर कामधंदयाध्‍येही मन लागते व अडचणींचा सामना करावा लागत नाही.

दिवसातून १० ते १५ मिनिटे शांत बसण्‍याचा प्रयत्‍न करावा. दररोज चांगले वाचन, व्‍यायाम, कुटुंबासोबत हसतखेळत थोडातरी वेळ रोज घालवणे, याने एकाग्रता वाढते. एखादा छंद जोपासणे किंवा आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवणे, हयासारख्या गोष्टींमुळे आपण मनाचे आरोग्य उत्तम राखू शकतो. जिभेवर संयम ठेवण्‍याची भूमिका जर आपल्याला जमत असेल तर आपण शरीराचे आरोग्यही उत्तम राखू शकतो. मनावर व वाणीवर संयम असणे अत्‍यंत महत्त्‍वाचे आहे.

एखादी गोष्‍ट करताना अत्‍यंत विचारपूर्वक करायला हवी. सदर कृतीनंतर उदभवणाऱ्या शक्‍याशक्‍यतांचा विचार करुन पावले टाकायला हवीत. अनुचित परिणाम देणाऱ्या गोष्‍टी जर आपल्‍याला टाळता आल्‍या तर समजावे की आपल्‍या मनावर आपला ताबा आहे. एकंदरीत आपले मनाचे व शरीराचे आरोग्य उत्तम राखणे आपल्याच हातात आहे. आपले आरोग्‍य ठणठणीत असेल तर आपण आपल्या कुटुंबाचेही आरोग्य उत्तम राखू शकतो. आपले काम उत्तमरित्या करू शकतो. म्‍हणूनच आपल्‍या शरीराबरोबरच मनाचे आरोग्‍य उत्‍तम राखण्‍यासाठी आपण सर्वांनी प्रयत्‍नशील राहयला हवे.

Continue reading

सहकारी बॅंकामधील ठेवी किती सुरक्षित?

शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आता पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्‍याचा निर्णय नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून सहकारी बँकांमधून मोठे घोटाळे उघड झाले आहेत. त्‍यामध्‍ये लाखो ठेवीदारांच्‍या ठेवी अडकलेल्‍या असून त्‍याचा...

करूया संकल्प लोकसंख्या नियंत्रणाचा!

आज ११ जुलै, जागतिक लोकसंख्‍या दिन. सन 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटींच्या घरात होती. सन 1987 साली ही लोकसंख्या दुप्पट म्हणजे 500 कोटी झाल्याने वाढत चाललेल्या जागतिक लोकसंख्येच्या आकडेवारीला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने 11 जुलै 1987पासून जागतिक लोकसंख्या दिन...

निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण संतूलन महत्त्वाचे!

कोविड व म्युकरमायकोसिस आजारांबरोबरच राज्यभरात सर्वत्र उष्णतेची लाट पसरलेली आहे. निसर्गाची अपरिमित व न भरून येणारी हानी, वृक्षतोड, शहरे व ग्रामीण भागांचे आसुरी काँक्रिटीकरण, नष्ट होत चाललेले जलसाठे व ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम ही कारणे वाढलेल्या उष्णतेला देता येतील. अनियमित...
error: Content is protected !!
Skip to content