चिकणमाती किंवा शाडूची माती यापासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी! मूर्ती पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी!
श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली असल्यास पूजकाला सामान्य मूर्तींच्या तुलनेत अधिक लाभ होतो. त्यासाठी बाजारातील आकर्षक मूर्तींच्या मोहात न अडकता अथर्वशीर्षात केलेल्या वर्णनानुसारच गणेशमूर्ती घ्या! हल्लीच्या वर्षात ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’पासून गणेशमूर्ती केल्या जातात, हे धर्मशास्त्रसंमत नाही. तसेच त्याच्यातून गणेशाची पवित्रके येत नाहीत. कागदी लगद्यासह विविध वस्तूंपासून केलेली मूर्ती अशास्त्रीय आणि प्रदूषणकारी असून यातून गणेशाचे विडंबन होत आहे आणि यातून गणेशाची अवकृपाच ओढवून घेतली जात आहे. गणेश चतुर्थीला चिकणमाती किंवा शाडूची माती यापासून बनवलेली मूर्ती घरी किंवा मंडळात आणून गणेशतत्त्वाचा लाभ घेऊया!
धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्ती कशी असावी आणि आपत्काळातील पर्याय!
गणेशमूर्ती मातृकेची असावी, असे धर्मशास्त्र सांगते. चिकणमाती किंवा शाडूची माती यापासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे हे धर्मशास्त्रविरोधी, तसेच पर्यावरणाला घातक आहे. मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी. मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली, पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची अन् नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. परंपरा किंवा आवड याप्रमाणे गणेशमूर्ती आणण्यापेक्षा धर्मशास्त्रसंमत गणेशमूर्ती पुजावी. हल्लीच्या वर्षात ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’पासून गणेशमूर्ती केल्या जातात, हे धर्मशास्त्रसंमत नाही. तसेच त्याच्यातून गणेशाची पवित्रके येत नाहीत. त्यामुळे ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’ची गणेशमूर्ती घरी आणू नये. पंचगव्य, शेण आदी गोष्टींपासूनसुद्धा गणेशमूर्ती बनवू नये. पार्थिव सिद्धिविनायक व्रतानुसार शाडूमाती किंवा चिकणमातीची गणेशमूर्ती आणावी. माती स्वत:च ‘इकोफ्रेंडली’ आहे. हा भाग लक्षात घ्यायला हवा.
कोरोनाच्या काळात मूर्ती मिळण्यास अडचण आल्यास तसेच शाडूमातीच्या मूर्तीही उपलब्ध झाल्या नाही तर घराच्या अंगणातील चिकणमातीची 6 ते 7 इंचाची गणेशमूर्तीही बनवू शकतो. मातीसुद्धा उपलब्ध न झाल्यास प्राणप्रतिष्ठा विधी न करता श्रीगणेशाच्या चित्राचे षोडशोपचार पूजन करू शकतो. घरच्या घरी धातूची मूर्ती बसवून तिची पूजा करावी. मूर्ती नसेल, तर देवतेच्या प्रतिमेचे पूजन करता येते, असेही धर्मशास्त्रात सांगितलेले आहे.
कागदी लगद्यापासून बनविलेली मूर्ती अशास्त्रीय, प्रदूषणकारी असण्याची कारणे!
कागदी लगद्याच्या मूर्तींवर बंदी असून कागदामध्ये सात्त्विकता आकृष्ट होत नाही. कागद हा रजोगुणी असतो, तर त्यापेक्षा माती सात्त्विक असते. सांगली येथील पर्यावरणतज्ज्ञ सुब्बाराव यांनी सांगितल्यानुसार, कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे माशांच्या कल्ल्यात कागद अडकतो आणि ते मरतात. पाण्यातील ऑक्सिजन अल्प होऊन पाण्यातील जलचर प्राणी आणि वनस्पती मरतात. तसेच पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होते.
रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) यांच्याकडे कागदी लगद्याच्या मूर्ती देऊन शास्त्रीय प्रयोग करण्यात आला. त्यामध्ये असे दिसून आले कि, 10 किलोंची मूर्ती 1000 लिटर पाणी प्रदूषित करते. याच आधारावर पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाने कागदी लगद्याच्या मूर्तीवर बंदी आणली आहे. असे असूनही काही संघटना आणि शासन स्तरावर त्याचे उदात्तीकरण केले जात असल्याचे दिसते. या मूर्ती वापरण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कोणताच शास्त्रीय अभ्यास नसल्याचे दिसून आले. यामुळे अशा कागदी लगद्याचा मूर्ती धर्मशास्त्रीय दृष्टीने अयोग्य आहेत, तसेच वैज्ञानिक दृष्टीनेही त्या अयोग्य आहेत. कागद पाण्यात मिसळल्यावर मिथेन नावाचा विषारी वायू बनतो. तो पाण्यातील जलचरांसाठी अत्यंत घातक असतो. हा महत्त्वाचा भागही इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्यामुळे यातील खरेखोटेपणा लक्षात येईल.
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या लाभ करून देणारी मूर्ती बनवा!
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या सिद्धांतानुसार मूर्तीविज्ञानाप्रमाणे योग्य मूर्ती बनवल्यासच त्या-त्या मूर्तीमध्ये त्या-त्या देवतेचे तत्त्व आकृष्ट होते. या सिद्धांताचे पालन न करता मूर्ती बनवल्यास ते तत्त्व त्या मूर्तीमध्ये येऊ शकत नाही. परिणामी अध्यात्मशास्त्रदृष्ट्या त्या मूर्तीचा भाविकाला लाभ होत नाही.
सध्या काही ठिकाणी अयोग्य रूपातील वेगवेगळ्या वस्तूंपासून बनविलेल्या मूर्ती आणल्या जातात. गणेशभक्तांकडून त्याचे कौतुकही केले जाते. पण हे धर्माविषयी असलेल्या अज्ञानातून घडते. खरेतर अशा मूर्ती म्हणजे देवतेचे विडंबन असते. प्लास्टिकच्या वस्तूंपासून, लोखंडी सांगाड्यात दगड घालून, भाज्यांपासून, शीतपेयांच्या बाटल्यांपासून बनवलेले गणपती, लांब सोंड असलेला अयोग्य रूपातील गणपती, राजकारण्यांसमवेत चहा पित असलेले गणपती अशा विविध प्रकारे गणपती बनवण्यात येतात. अशा मूर्तींमुळे श्री गणेशाचे विडंबन होते. श्री गणेशाची अयोग्य रूपातील मूर्ती आणल्याने आध्यात्मिक स्तरावर काही लाभ तर होतच नाही, उलट हानीच होते. संतांना, साधना करणार्यांना, देवतेप्रती भाव असणार्यांना याची जाणीव आतूनच होते.
मूर्ती सॅनिटाईज करू नका, अयोग्य पद्धतींचा वापर टाळा!
मूर्तीला ‘सॅनिटाईज’ करणे वा ‘सॅनिटाईज’ केलेली मूर्ती वापरणे अयोग्य आहे. कारण ‘सॅनिटाईजर’मध्ये अल्कोहोल असते. अल्कोहोल हे देवतेच्या मूर्तीवर टाकणे योग्य नाही. त्यामुळेच आपण जसे किराणा किंवा काही वस्तू आणल्यास २४ तास आधी आणून वेगळे ठेऊन मग वापरतो. तसेच मूर्ती आणून मग प्राणप्रतिष्ठा करू शकतो. त्यासाठी मूर्ती ‘सॅनिटाईज’ करण्याची आवश्यकता नाही.
तथाकथित पर्यावरणप्रेमी, पुरोगामी, नास्तिकतावादी यांनी अशास्त्रीय मूर्ती, सॅनिटाईज करणे आदी विचार प्रचारित केले आहेत. या विचारांना समाजाने बळी पडू नये. योग्य कृतीच करावी. याहीपुढे आता घरीच मूर्ती बनवा आणि विसर्जित करा या गोंडस नावाने काही संघटना अत्यंत अशास्त्रीय प्रकार राबवित आहेत. त्यासाठी मूर्ती बनविण्याचे साहित्य आणि साचा ऑनलाईन दिले जाईल, असा प्रचार ते करत आहेत. याप्रकारे बनविलेल्या मूर्तींमध्ये झाडाची ‘बी’ ठेवली जाते. मूर्ती विसर्जन करताना कुंडीत ती मूर्ती ठेवून त्यावर पाणी घातले असता मूर्ती विरघळते आणि झाडही लावले जाते. अशा गोंडस प्रचाराला बळी न पडता शास्त्रसुसंगत अशी कृती करायला हवी.
झाडे लावा आणि झाडे जगवा ही संकल्पना राबविण्यासाठी वर्षाचे 365 दिवस आहेतच ना.. त्यासाठी गणपतीच का? धर्मशास्त्रात असे करा, असे कुठेच सांगितलेले नाही. तथाकथित पर्यावरणप्रेमींचे हे आंधळे प्रेमच म्हणावे लागेल. कारण वर्षभर होणार्या प्रदूषणाविषयी ही मंडळी कधीच तोंड उघडत नाहीत. फक्त गणेशोत्सव आला की यांचे दिखाऊ पर्यावरणप्रेम जागृत होते. खरे तर हिंदूंचे प्रत्येक सण पर्यावरणपूरक आहेत. त्याच्या प्रत्येक कृतीत पर्यावरणाची काळजी घेतली जाते. गणेशमूर्ती ही पृथ्वीतत्त्वाशी संबंधित आहे. ते पृथ्वीतत्त्व नंतर आपतत्त्वात विसर्जन होणे आवश्यक आहे.
तेव्हा तथाकथित पुरोगामी आणि पर्यावरणप्रेमी यांच्या अपप्रचाराला बळी न पडता चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून बनवलेलीच मूर्ती घरी किंवा आपल्या मंडळात आणून गणेशाची कृपा संपादन करूया.