विकसित देशांमध्ये विज्ञानावर मोठा भर दिला जातो. भारतामध्ये मात्र कृतीपेक्षा चर्चाच अधिक असून विज्ञानाबाबत असणारी ही उदासीनता देशाला आणि समाजालाही घातक आहे, असे मत विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी केले.
मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३८ व्या जयंतीदिनी आयोजित ऑनलाईन पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नारळीकर बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विज्ञानाच्या महत्त्वाबाबत नेहमीच भर दिला. देशाला त्यांच्या विज्ञाननिष्ठतेची अधिक गरज आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी स्वा. सावरकर शौर्य पुरस्कार गलवान घाटीत चिनी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना हुतात्मा झालेले १६ बिहार रेजीमेंटचे कर्नल बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला होता. तो पुरस्कार त्यांच्या वीरपत्नी संतोषी संतोष बाबू यांनी स्वीकारला. एक लाख एक हजार एक रुपये रोख, स्मृतिचिन्ह, स्वा. सावरकर यांची प्रतिमा आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे.
स्वा. सावरकर समाजसेवा पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, पुणे यांना देण्यात आला. ५१ हजार रुपयांचा पुरस्कार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार आहे. या पुरस्काराबाबत जनकल्याण समितीचे कार्यवाह अश्विनीकुमार उपाध्ये यांनी स्मारकाचे आभार मानले.
स्वा. सावरकर यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची गरज किती महत्त्वाची आहे, ते लक्षात घेऊन विज्ञानवादाला साकार केले होते. ते धर्माभिमानी होते, मात्र धर्मांध नव्हते. विज्ञानाच्या चष्म्यातून पाहत त्यांनी धार्मिक रुढी-रिवाजांवर भाष्य केले, टीका केली. आजही त्यांच्या विज्ञाननिष्ठेची समाजाला गरज आहे, असेही नारळीकर यांनी सांगितले.
समारंभामध्ये सुरुवातीला सावरकरांवरील माहिती, तसेच स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांचे सावरकरांच्या विचारांवर, हिंदुत्त्वावर आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत भाषण झाले. स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी गलवान घाटी, गेल्या वर्षीचे चिनी सैनिकांनी केलेल्या आक्रमणाचे रूप, चिनी आक्रमणे याबाबत माहिती दिली. हुतात्मा संतोष बाबू यांच्या १६ बिहार रेजीमेंटबद्दल लेफ्टनंट जनरल अश्विनीकुमार बक्षी (निवृत्त) यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन स्मारकाच्या कार्याध्यक्ष मंजिरी मराठे यानी केले. स्वा. सावरकर यांच्या ने मजसी ने.. या मराठी गीताचे ले चल मुझको.. हे हिंदी रूपांतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या स्वरात आहे. या गीतावरील नृत्याविष्काराची ध्वनिचित्रफित यावेळी प्रकाशित करण्यात आली. समारंभाच्या अखेरीस स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी स्मारकाच्या कार्याची, या पुरस्कारांची माहिती दिली. वंदे मातरम गीताने समारंभाचा समारोप करण्यात आला.