महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 26 मार्च ते 31 मार्च 2024 यादरम्यान नवी मुंबईतील जुईनगर नाट्यगृहात आयोजित केलेल्या “ढोलकी तमाशा महोत्सवा”मध्ये हलगी-ढोलकीची जुगलबंदी बघायला मिळाली. पारंपरिक गण, गवळण, बतावणी, रंगबाजी, शृंगाराच्या लावण्या, सवाल-जवाब, शिलकार, फार्सा, वगनाट्य आणि शेवटीची भैरवीसुद्धा भरगच्च गर्दीने भरलेल्या नाट्यगृहातील कलारसिकांना ऐकायला मिळाली. महाराष्ट्राची लोकसंस्कृती किती विशाल आणि समृद्ध आहे, हे यातून स्पष्ट होतेय.
सन 2006पासून सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सुरू केलेल्या तमाशा महोत्सवाची परंपरा अजूनही कायम राहिली आहे. त्यात कुठेही खंड पडला नाही. पण या वर्षाच्या ढोलकी-तमाशा महोत्सवाचे वैशिष्ट्य वेगळे होते. सहाही दिवस सादरीकरण करणाऱ्या तमाशा मंडळाने अगदी पारंपरिक पद्धतीने नवी मुंबईच्या रसिकांसमोर तमाशाचे सादरीकरण केले. हळीची गवळण. तक्रारीची गवळण, विनवणीची गवळण, सुटकेची गवळण, अगदी अध्यात्मिक रसातील गवळण अशा विविध प्रकारच्या गवळणी ऐकायला मिळाल्या. त्याला टाळ्या वाजवून लोकांनी दाद दिली.
हलगी-ढोलकीची जुगलबंदी, जणू काय पहिल्यांदाच आपण पाहतोय, या आनंदात टाळ्या आणि शिट्ट्यांचा नादही ह्या वाद्याबरोबर नाट्यगृहात घुमू लागला होता. बतावणी रंगबाजी याबरोबर शृंगाराच्या लावण्याचे जोरदार सादरीकरण झाले. काही तमाशात अगदी जुन्या काळातील लावण्या सादर केल्या. अन तेथे बसलेल्या अनेक ज्येष्ठ कलारसिकांना आपला तरुणपणाचा काळ आठवला. तमाशा हा उन्नतीरंजक, विचार आणि संस्कार या प्रेरणेतून उदयाला आलेली कला आहे. त्यामुळे सहा दिवस सुरू असलेला महोत्सवसुद्धा शासननाने त्याच उद्देशाने आयोजित केला असावा,असे वाटते.
समाजभेद, धर्मभेद, वंशभेद, वर्णनभेद यावर वगनाट्यातून समाज प्रबोधन केले. एकेकाळी अंधश्रद्धा, जुन्या रूढी, चालीरीती याचा लोकांवर फार प्रभाव होता. त्या काळात तमाशा कलावंतांनी वगनाट्यातून समाजाचे प्रबोधन केले. आता वेळेअभावी तशी वगनाट्यं सादर होत नाहीत. त्यामुळे अनेक तमाशा कलावंतांनी आपल्या रंगबाजीत काही मिनिटांचे ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक विषयावर “टायटल” दाखविण्यास सुरू केले आहे. जसे की, कै. तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या पहिल्या कार्यक्रमाने या महोत्सवाचा शुभारंभ झाला. या तमाशातील कलाकारांनी जुन्या तमाशाचा बाजाबरोबरच आपल्या रंगबाजीत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भावनिक भेट दाखविली. हे दृष्य लोकांच्या काळजाला भिडले. शूरवीर तान्हाजी मालुसरे यांचा उत्तम अभिनय दाखविला. विनोद अवसरीकर, बुढन व्यापारी, रोहिदास पाठारे यांच्यासारखे मुरलेले कलावंत रंगमंचावर आले की, प्रेक्षक जोरदार टाळ्या वाजवून कलाकारांना प्रोत्साहन दयायचे.
शांताबाई संक्रापूरकरसह शाहिर संभाजी जाधव, अहमदनगर यांनी पारंपारिक आणि जुन्या बाजाच्या लावण्या सादर केल्या. स्वतः शाहिर संभाजी जाधव गणाला उभे राहिले होते. त्यांचा पहाडी आवाज लोकांच्या पसंती पडला. सुनंदा कोचुरे धुळेकर, शुभम कुमार धुळेकर या लोकनाट्य तमाशा मंडळाने तर खान्देशी ढोलावर खान्देशी गण, खान्देशी हळीची गवळण, त्याच बोली भाषेत टाकण, फार्सा सादर केला. अहिराणी भाषेत अनेक गीतं गायली. या वेगळ्या लोककला प्रकारालासुद्धा या शहरी भागातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
ढोलकी, हलगी, तुणतुणं, टाळ आणि हार्मोनियम अर्थात पारंपरिक पाय पेटी, जी आता दुर्मिळ गोष्ट झालेली आहे. या वाद्यावर महादेव मनवकर (कराड) यांनी रसिकांची मनं जिंकली. कुठेही आधुनिक वाद्य रंगमंचावर न ठेवता, या पारंपरिक वाद्यावर त्यांनी कलारसिकांच्या टाळ्या मिळविल्या. चक्क कृष्ण आणि मावशी यांच्या संवादाला (सांधा) मनमुराद दाद देणारा प्रेक्षक पहिल्यांदा दिसला. सरदार शंकरराव भुयाजीवाडीकर यांनी आपल्या गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुरात लय होता. ताल होता. शास्त्रशुद्ध आवाजाचा कलाकारच ते जाणवत होते.
हळीची गवळण, तक्राराची गवळण, विनवनीची गवळण, सुटकेची गवळण, अशा विविध कलाप्रकाराच्या गवळणी त्यांनी सादर केल्या. सवाल-जवाब, लावण्या, खांडगी (त्याला काही भागात कड्या टाकणे म्हणतात.) पोवाडा, शिलकार, झिल, वग असे सर्व कलाप्रकार मनवकर यांनी पारंपरिक पद्धतीने सादर केले. यावेळी तमाशाला उपस्थित असलेले लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी तर आपल्या भाषणात मनवकर यांचा तमाशा हा “वस्तूपाठ” आहे,अशी प्रतिक्रिया दिली.
समाजप्रबोधनाची प्रेरणा घेऊन जन्मास आलेल्या तमाशाला आधुनिक काळात नृत्य, संगीत, गायन, वादन आदी कलागुणांची जोड मिळाल्याने ही लोककला विकसित झाली. भक्ती, प्रबोधन आणि रंजन या तीन सूत्रांनी तमाशा रंगत असतो. या महोत्सवात उषा खोमणेसह अर्चना पुणेकर यांनी जोरदार तमाशा सादर केला. गण, गवळण, लावणी यांच्या सादरीकरणात वाद्याची उत्तम साथ होती. ढोलकी जोरदार कडाडत होती. आपल्या लहान वयात आपल्याच तमाशात उत्तम सोंगाड्या म्हणून काम करणारा, वडिलांसोबत रंगबाजीत जुगलबंदी करणारा, अन आज चंदेरी दुनियेत रमणारा,आघाडीचा गायक म्हणून आपले अस्तित्त्व निर्माण करणारा रविंद्र खोमणे याने आपल्या आईच्या तमाशाला वेळात वेळ काढून हजेरी लावून कलारसिकांच्या टाळ्या मिळविल्या. म्हणजेच पारंपरिक तमाशाला आधुनिकतेची जोड देणारा हा तमाशा कलारसिकांच्या पसंती पडला होता.
उषाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला. “माझी मैना गावाकडं राहिली”…! हे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचं गाणं गाऊन एका कलाकाराने लोकांमध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागृत केली. एका नृत्यांगनेने तर थेट रंगमंचवरून खाली उतरून या लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या एका गृहिणीच्या हाताला धरून लावणीचा ठेका धरायला लावला. एव्हढे सारे समरस झाले होते.
तमाशा महोत्सवाची सांगताही अगदी दणक्यात झाली. रविवार असल्यामुळे सभागृह हाऊसफुल्ल झाले होते. प्रेक्षक खाली बसले होते. काहींनी उभे राहून तमाशाचा आनंद घेतला. वडिलांपासून गेली पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या मास्टर सुनिल वाडेकर यांच्या सोनाली-गजरा लोकनाट्य तमाशा मंडळाने पारंपरिक तमाशा सादर केला. गण, गवळण, बतावणी, रंगबाजी यावर कलारसिकांनी मनमुराद दाद दिली. म्हणींमध्ये सरदार प्रभाकर सिंदेवाडीकर यांनी साळू सादर करून जुन्या बाजाची आठवण करून दिली. वाद्येही पारंपरिक वापरण्यात आली होती. एकही नवीन आधुनिक वाद्य नव्हते. हलगी, पायपेटी, ढोलकी या नादाने सभागृह डोलू लागले होते. विशेषतः हलगी वाजविणारे वसंतराव वाडेकर हे या तमाशाचे फडमालक सुनील वाडेकर यांचे वडील होते. सुनील वाडेकर यांच्या ढोलकीवादनाने प्रेक्षकांची मने जिंकली. सोनाली कुडाळकर आणि पाटणकर या नृत्यागंनांनी सुंदर अशा लावण्या सादर केल्या. त्यांचे सादरीकरण उत्तम होते.
तमाशा महोत्सवाची सांगता, यांच्या सादरीकरणामुळे ठसक्यात आणि दणक्यात झाली. टाळ्या-शिट्ट्यांचा नेहमीप्रमाणे वर्षाव झाला. सहाही दिवस या महोत्सवाला महिलांचा प्रतिसाद मोठा होता. यावर्षीच्या तमाशा महोत्सवात दाद देण्यास शहरी कलारसिकांनी कुठेही हात आखडता घेतला नाही. त्यामुळे तमाशा हेच रंजनासोबत उद्बोधनाचे प्रभावी माध्यम आहे. खऱ्या अर्थाने ही कला जनसामान्यावर अधिराज्य गाजविणारी कला आहे, असे लोककला अभ्यासकांचे योग्य मत आहे. तमाशाला लिखित संहिता नसते. त्यातील संवाद व कृती बव्हंशी उत्स्फूर्त असते. संवाद मौखिक पंरपरेतून आलेले असतात. संवाद कल्पनेने आठवून म्हटले जातात. ही कला आता काळाच्या ओघात लोप पावत चाललेली आहे. याला खऱ्या अर्थाने जतन आणि जोपासण्याची गरज आहे.
आतापर्यंत राज्य सरकारने अभिजात कला आणि ग्रामीण कला यामध्ये सतत भिन्नता निर्माण केली हे वारंवार निर्दशनास आले आहे. गावकुसाबाहेरच्या कलेला सन्मान मिळत नव्हता. परंतु यावर्षीच्या तमाशा आणि लावणी महोत्सवाचे आयोजन करताना सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. दोन्ही महोत्सवाचे नियोजन उत्कृष्ट होते. नवी मुंबई येथील जुईनगरमध्ये घेतलेल्या तमाशा महोत्सवात नाट्यगृहाला आकर्षण रंगीबेरंगी साजवट करण्यात आली होती. सुंदर असा रंगमंच सजवला होता. नाट्यगृहाच्या गेटवर तमाशा कलावंतांचे चित्र असलेले सेल्फी पॉईंट उभा करण्यात आला होता. विशेष म्हणजे सहाही दिवस लोककलावंतांना जेवण आणि अल्पपोहार, चहापानाची उत्तम व्यवस्था संचालनालयाकडून करण्यात आली होती. या सर्व नियोजनासाठी कार्यक्रम अधिकारी संदीप बलखंडे आणि निलेश धुमाळ यांनी प्रचंड मेहनत घेतली. या दोघांचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे.
पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महिंद्र कोंडे यांनी आपल्या विनयशील वाणीतून केले. मच्छिंद्र पाटील यांनीसुद्धा या काळात लोककलावंतांना स्थानिकदृष्ट्या प्रामाणिकपणे भरपूर सहकार्य केले. या महोत्सवाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून या महोत्सवाची रंगत वाढविली. सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव बाळासाहेब सावंत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे, लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, सह प्रा. डॉ. शिवाजी वाघमारे यांची उपस्थिती होतीच. त्यामुळे या महोत्सवाला एक नवीन ऊर्जा मिळाली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्या देखरेखीखाली तमाशा आणि लावणी महोत्सवाचे नियोजन उत्तमच झाले. मात्र या दोन्ही महोत्सवाला आपल्या कार्यबाहुल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांची उणीव भासत होती.
खरंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाने यावर्षीचा तमाशा आणि लावणी महोत्सव खूप घाईघाईत उरकून घेतला. जणू काय एखादी “लगीन घाई”च सुरू होती. त्यामुळे कलाकारांना तालीम करायला अपूर्ण वेळ मिळाला. कलाकारांना वगनाट्याची पूर्ण तालीम करता आली नाही. सहाही दिवस अनेक रंगबाजीतील सांधे सारखेच वाटत होते. त्यामुळे रोज येणारा रसिकवर्ग एकच सांधा ऐकून कंटाळत होता. यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने यापुढे दोन्ही महोत्सवात तोचतोचपणा येणार नाही यासाठी प्रत्येक कलापथकाकडून कार्यक्रमाचे नियोजन करून घेतले पाहिजे. ही कला जुन्याकडून नव्याकडे देण्यासाठी शासनाचे योग्य पद्धतीने प्रोत्साहन दिले पाहिजे तर ही कला टिकून राहील.
निश्चितच या तमाशा महोत्सवामुळे जुन्या तमाशाचा बाज कलारसिकांना बघायला मिळाला. या कलेची परंपरा कळली. ही कला अशीच यापुढे जतन ठेवायची असेल तर शासनाचे सहकार्य असलेच पाहिजे याबद्दल शंका नाही. गावकुसाबाहेरच्या तमाशा कलेला शासनाने एका परिसंवादाच्या माध्यमातून विद्वताही प्राप्त करून दिली. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत आधुनिक तमाशाची जडणघडण या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये हे निश्चित झाले की, तमाशाने आपले मूळ स्वरूप बदलले नाही.