येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष निश्चित जिंकेल. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
मुंबईत जिल्हानिहाय कार्यकर्ता मेळावे घेऊन येत्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या मोर्चेबांधणीला आठवले यांनी सुरुवात केली आहे. त्यानुसार कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉलमधील जस्मिन बँक्वेट हॉलमध्ये आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर सीमा आठवले उपस्थित होत्या.

काँग्रेस डिव्हाईड अँड रुलची पॉलिसी राबवून समाजात फूट पाडत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. ते कोणीही बदलू शकत नाही तरी संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून समाजात फूट पाडण्याचे पाप काँग्रेस करीत आहे. मुस्लिम समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारबद्दल विश्वास बाळगला पाहिजे. त्यांनी काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये. केंद्र सरकार सर्व दलित, ओबीसी, मुस्लिम, सर्व अल्पसंख्यांक, सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी समतेच्या दृष्टीने न्याय देण्याचे काम करीत आहे. केंद्राच्या अनेक योजना मुस्लिम समाजालाही लाभ देत आहेत. संविधानाला मजबूत करण्याचे काम पंतप्रधान मोदी करीत आहेत. संविधानाला माथा टेकवून, नमन करून मोदींनी डॉ. आंबेडकरांचे अनेक स्मारक देशात उभे केले आहेत. मुंबई इंदू मिलमध्ये उभे राहत असणारे स्मारक जागतिक दर्जाचे स्मारक होणार आहे. त्यासाठी इंदू मिलची जमीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे मोदी यांनी तातडीने दिली. त्याचा मी सक्षीदार असल्याचे आठवले म्हणाले.

रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र अस्तित्त्व असणारा पक्ष आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चा राष्ट्रीय स्तरावर घटकपक्ष आहे. राज्यात महायुतीचा घटकपक्ष आहे. दलित, बहुजनांच्या आशीर्वादामुळे रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे. नागालँडसारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत. मणिपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाला 17 टक्के मतदान मिळाले आहे. त्यामुळे नागालँड आणि मणिपूर या दोन राज्यात रिपब्लिकन पक्ष मान्यताप्राप्त पक्ष झाला आहे. आणखी दोन राज्यांत मान्यता मिळाली तर रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल. त्यामुळे भाजपा छोट्या मित्रपक्षांना संपवतो हा आरोप चुकीचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.