पेरले तसे उगवले. ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ शिंदे यांनी सुमारे ४० आमदार व १० खासदार यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाबरोबर घरोबा केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होत महाविकास आघाडीची अडीच वर्षांची राजवट संपुष्टात आली. या घटनेच्या बरोबर एक वर्षानंतर अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ची पुनरावृत्ती करीत पाच वर्षांच्या एका कार्यकाळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील, अदिती तटकरे, संजय बनसोडे या आपल्या सहकाऱ्यांनाही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी करुन घेत आणखी एकदा राजकीय भूकंप घडवून आणला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आपल्याला दुहीचा शाप भोवला असल्याचे इतिहासातील पानांवर नजर टाकल्यास दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन मोहिमा फत्ते करीत असताना महाराजांनाही काही मराठ्यांच्या गद्दारीचा सामना करावा लागला होता. १९५६ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून आंदोलन झाले. मुंबई प्रांत, बॉम्बे प्रोविन्सचे परिवर्तन केंद्र सरकारकडून मुंबई द्वैभाषिक राज्यात करण्यात आले आणि मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा डाव खेळण्यात आला. म्हणून आचार्य अत्रे, एसेम जोशी, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अमर शेख आदींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र समितीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळून सत्ता समितीच्या हातात येणार त्याचवेळी यशवंतराव चव्हाण यांनी एका बाजूला शेतकरी कामगार पक्षातून यशवंतराव मोहिते आणि शंकरराव मोहिते पाटील यांना काँग्रेसमध्ये आणले आणि महाराष्ट्रात पक्ष फोडण्याची सुरुवात झाली.
यशवंतराव चव्हाण यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नजरेतून उतरू नये आणि काँग्रेसच्या हाती सत्ता यावी म्हणून काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या विदर्भाला महाराष्ट्रात आणण्यासाठी डाव टाकला, त्यात ते यशस्वीसुद्धा झाले. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या हातून सत्ता यशवंतरावांनी जवळपास हिसकावून घेतली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश १ मे १९६० रोजी आणला. परंतु शंकरराव चव्हाण यांनी सचिवालयाचे मंत्रालय करण्याचा निर्णय घेण्याआधी या मंगल कलशाऐवजी सहाव्या मजल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अस्थिकलष ठेवला. यशवंतराव चव्हाण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या केंद्र सरकारमध्ये नोव्हेंबर १९६२मध्ये संरक्षण मंत्री म्हणून रुजू झाले तेव्हा विधानपरिषदेच्या सभागृहात ग. दि. माडगूळकर यांनी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असे वर्णन चव्हाण यांच्या अभिनंदनपर ठरावाच्या भाषणात केले.
ग.दि.मां.चे हे वर्णन अजरामर झाले. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ताश्कंद दौऱ्यावर असताना यशवंतराव चव्हाण त्यांच्यासमवेत होते. दुर्दैवाने लालबहादूर शास्त्री यांचे देहावसान झाले. त्यानंतर कामराज, निजलिंगप्पा आदी काँग्रेस नेत्यांनी पुढचे पंतप्रधान यशवंतराव चव्हाण हेच असतील असा ठराव करुनही अपेक्षेपेक्षाही विनम्रता दर्शविणाऱ्या यशवंतरावांनी त्यांच्या हातातोंडाशी आलेले पंतप्रधानपद दिल्लीच्या चरणी म्हणजेच इंदिरा गांधी यांच्या हाती सुपूर्द केले. मराठी माणूस तिथेच मागे पडला. १९६९ साली बेंगळुरुच्या काचघरात काँग्रेस फुटला आणि इंदिराजींची इंडिकेट तर मुरारजींची सिंडिकेट अशी काँग्रेसची दोन शकले झाली. पण १९७१ सालच्या बांगलादेश निर्मितीनंतर इंदिरा गांधी अनभिषिक्त सम्राज्ञी बनल्या आणि सत्ताभिलाषी इंदिराजींनी आणीबाणी लादली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण क्रांती आंदोलन सुरू झाले.
इंदिरा गांधी यांनी जयप्रकाश नारायण, मुरारजी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते आदींबरोबर काँग्रेसचे तरुणतुर्क मोहन धारिया, चंद्रशेखर, कृष्णकांत यांनाही तुरुंगात डांबले. जानेवारी १९७७ला आणीबाणी उठवून इंदिरा गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुका घोषित केल्या. भारतीय जनसंघ, समाजवादी, भारतीय लोकदल, संघटना काँग्रेस या चार पक्षांचा जनता पक्ष केंद्रात सत्तेत आला तशी पक्षांच्या फाटाफुटीला वेग आला. महाराष्ट्रात वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडे यांचे दोन पक्षांचे सरकार १७ एप्रिल १९७७ रोजी आले. दादा मुख्यमंत्री तर तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. याच मंत्रिमंडळात शरद पवार (वय ३७) हे तरुण राज्यमंत्री होते. त्यांनी दादांच्या सरकारमधून बाहेर पडून १९ जुलै १९७८ रोजी पुरोगामी लोकशाही दल बनवून सरकार स्थापन केले.
जनता पक्ष (यात संघाचे लोकही होते), शेतकरी कामगार पक्ष या सर्वात तरुण मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये सामील झाले होते. शरद पवार यांनी तेव्हा समांतर काँग्रेस/समाजवादी काँग्रेस स्थापन केली होती. १९७५ साली विदर्भाच्या विरोधात दंड थोपटून मराठवाड्यात मुख्यमंत्रीपद खेचून आणणारे शंकरराव चव्हाण महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस स्थापन करुन आधी मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा मान मिळविलेले पवारांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपद स्वीकारते झाले. १९८६ साली शरद पवार यांनी काँग्रेसच्या निष्ठावंतांचा विरोध असतानाही राजीव गांधी यांना औरंगाबाद येथे आणून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.
१९९० साली शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या आधारे केली आणि पहिल्यांदा शिवसेनेचे ५२ आणि भारतीय जनता पक्षाचे ४२ असे ९४ आमदार निवडून आले. बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेते केल्यामुळे संतप्त झालेल्या छगन भुजबळ यांनी १९९१च्या डिसेंबरमध्ये १८ आमदारांना घेऊन काँग्रेस प्रवेश केला. सहाजण पुन्हा शिवसेनेत आले. त्यातूनही तीन भुजबळांकडे गेले. मग छगन भुजबळ यांना मंडल आयोग, महात्मा फुले यांची प्रकर्षाने याद आली. त्यापूर्वी छगन भुजबळ यांनी रिडल्सच्या मोर्चानंतर हुतात्मा चौक गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले होते. नथुराम गोडसे यांचे पुतळे उभारण्याची त्यांची भाषणेही प्रसिद्ध झाली होती. १९९९ साली शरद पवार यांनी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या विदेशी मूळ असल्याचा मुद्दा पुढे करत पूर्णो संगमा, तारीक अन्वर यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. नंतर संगमा आणि अन्वर यांनी पवारांची साथ सोडली.
१९९९ सालीच विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती पुन्हा सत्तेवर येऊ शकली नाही आणि मुख्यमंत्रीपद मिळू शकत नाही म्हणून अस्वस्थ झालेल्या नारायण राणे यांनी जुलै २००५मध्ये शिवसेनेबरोबर काडीमोड घेत काँग्रेस प्रवेश केला. २००६मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी काकांची साथ सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाने सवतासुभा उभा केला. दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे यांनीही आपले काका गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून भाजपच्या कमळाऐवजी पवार काकांचे घड्याळ हाती बांधले. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका-पुतण्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यांमध्ये बंडाळी पाहिल्यावर आता २३ नोव्हेंबर २०१९ या दिवशी शरद पवार यांच्या अजितदादा पवार या पुतण्याचेही बंड पाहायला मिळाले.
खरंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या आपापसातील भिन्न भूमिका महाराष्ट्रात नजीकच्या काळात पाहायला मिळाल्या आहेत. शरद पवार यांनी इवीएमला विरोध केला तर त्यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे निवडून आल्या. अजित पवार यांनी इवीएमला विरोध केला नाही पण त्यांचे सुपूत्र पार्थ पवार यांना पराभव पत्करावा लागला. शरद पवार यांनी पार्थच्या उमेदवारीला आधी विरोधही केला होता. ईडीच्या प्रकरणात शरद पवार यांच्या समर्थनार्थ राजीनामा देऊन डोळ्यात आसवं न थांबणारे अजितदादा आपण पाहिले. पण अखेर सहनशीलता संपली, चर्चेचे गुऱ्हाळ संपत नसल्याने कंटाळा आला म्हणून भाजपच्या पाठिंब्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगत अजितदादा या पवारकाकांच्या पुतण्याने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी बंड केले. २०१४ आणि २०१९ या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षांतराचे फुटलेले पेव राज्याच्या जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर एकच म्हणावे लागेल की, जसे पेरले तसे उगवले!