महाराष्ट्रात मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. आता माघारीचे पर्व सुरू झाले आहे. यामध्ये कोणाची, कुठे आणि कोणाबरोबर, कोणत्या पातळीवर, युती किंवा आघाडी झाली हे हळूहळू स्पष्ट होईलच, पण या सर्व प्रक्रियेमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झालेली रडारड. या कार्यकर्त्यांमध्ये सत्ताधारी शिवसेना, भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यकर्ते आघाडीवर होते. त्याखालोखाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि एमआयएम, या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रडारड केली. रडारड करणाऱ्या पक्षकार्यकर्त्यांमध्ये अलीकडेच ज्येष्ठ नेते म्हणून वावरणारे शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल.
नेता कसा असावा तर तो कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवत त्यांना बरोबर घेत, योग्य दिशेला नेणारा असावा. कार्यकर्त्यांचे सुखदुःख समजून घेणारा असावा. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारा असावा. सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय कामांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारा, त्यांच्या भावना संबंधितांपर्यंत पोहोचवणारा असावा. अशी व्यक्तीच खऱ्या अर्थाने एखाद्या समाजाचे नेतृत्त्व करू शकते. म्हणूनच नेता कसा असावा तर तो धीरगंभीर, न डगमगणारा, कणखर मनाचा आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहणारा असावा, असे मानले जाते. छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश करणाऱ्या कार्यकर्त्यांना सामोरे जाण्याऐवजी पळ काढणारे भाजपाचे मंत्री अतुल सावे किंवा माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासारखे नसावेत तर याच कार्यकर्त्यांना सामोरे जाणारे भाजपाचे आमदार संजय केणेकर व अनुराधा चव्हाण यांच्यासारखे असावेत. आज जगातली काही उदाहरणे पाहिली तर आपल्या आपल्याला हे सहज लक्षात येईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की, इतकेच काय तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, या सर्वांकडे पाहिले तर आपल्याला नेतृत्त्वगुण कसे असावेत याची प्रचिती येऊ शकते. अमेरिकेत बोंबाबोंब झाली पण अमेरिका फर्स्ट, या धोरणापासून ट्रम्प मागे हटले नाहीत. जागतिक दबावाला झुगारून पुतीन आणि झेलेन्स्की एकमेकांवर हल्ले करतच आहेत. मोदींना पाहा. आपल्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच ते आपल्या बंगालमधल्या पूर्वनियोजित सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. मग, नुसती उमेदवारी मिळाली नाही म्हणून रडारड करणारे कार्यकर्ते नेतृत्त्व करण्यासाठी योग्य आहेत का, फिट आहेत का, याचा विचार सर्वसामान्यांनी करायला हवा. जे कार्यकर्ते आपल्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून स्वतःच्या अंगावर घासलेट ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करतात, जीवाचा आकांत करतात, ते एखाद्या प्रभागाचे, एखाद्या परिसराचे, एखाद्या समाजाचे, सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व कसे काय करू शकतील?

आपल्याला नेते बनायची संधी मिळाली पाहिजे, सतरंजी उचलण्यात आयुष्य जाता कामा नये, अशी सुप्त इच्छा आणि आकांक्षा प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याची असते. आणि ती असणे स्वाभाविकही आहे. त्यातच ज्या राजकीय पक्षाचे सत्तेत येण्याचे चान्सेस जास्त असतात, अशा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जास्त चढाओढ असते. त्यातच गेल्या दोन-चार वर्षांपासून भाजपा तसेच शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाले आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षात वावरणाऱ्या नेत्यांना आपले राजकीय भवितव्य जोखण्याकरीता, पर्यायाने सत्तेचे फळ चाखण्याची संधी शोधताना या दोन पक्षांचा सहारा घेण्याची गरज भासली. भाजपा तसेच शिवसेनेच्या नेतृत्त्वानेही या नेत्यांची होत असलेली कुचंबणा आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा ओळखून आपल्या पंखाखाली घेतले. हे करत असताना या नेतृत्त्वांच्या मनात हे होते की, महाराष्ट्राच्या ज्या भागात आपला पक्ष कमकुवत आहे तेथे पक्षाची ताकद वाढवणे. पण झाले असे की, या वृत्तीचा अतिरेक झाला आणि निष्ठावान कार्यकर्ते तसेच उपरे, अशी पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली. त्यामुळेच मग कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे माध्यम म्हणून निवडणुकीत बंडखोरी आणि रडारड सुरू झाली. हीच बंडखोरी शमविताना आता नेत्यांना नाकीनव येताहेत. या ना त्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात बंडखोरी शमविता येऊ शकते, पण कार्यकर्त्यांकडून होत असलेली रडारड कशी थांबवणार? चार जणांसमोर झालेली शोभा हे कार्यकर्ते विसरणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून पक्षाचे निवडणुकीतले काम होणार नाही आणि याचा परिणाम उमेदवारांच्या जय-पराजयावर दिसून येऊ शकतो.
राजकारण हे न बोलता करायचे असते. बोलून फक्त कार्यकर्त्यांना गोळा करता येते, धीर देता येतो, बरोबर नेता येते. पण राजकारण करत स्वहित साधण्याची कला काही और आहे. आता भाजपातच बघा ना.. पक्षाचे जे आमदार, खासदार आहेत त्यांनी आपल्या नातेवाईकांना उमेदवारी देऊ नये, अशी कोणीतरी आवई उठवली. यात तसे आदेश झाले आहेत किंवा नाही हे कोणालाच ठाऊक नाही. कोणी आदेश काढले, कधी काढले, हे कोणी पाहिले नाही. पण या कारणाखाली खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज, आमदार देवयानी फरांदे यांचे पुत्र अजिंक्य, आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी, यांना उमेदवारी नाकारण्यात आली. हाच कित्ता गिरवत शिवसेनेचा नेतृत्त्वाने आपले आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग, खासदार नरेश मस्के यांचे चिरंजीव, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी आदींना उमेदवारी नाकारली. या सर्वांनी पक्षश्रेष्ठींनी घातलेल्या नातेवाईकांच्या उमेदवारीच्या दंडकाकडे बोट दाखवून आपला आब राखला इतकेच.. मात्र, याच भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी जागावाटपात आपल्या भावासाठी, प्रकाश दरेकरांसाठी सुरक्षित असा मतदारसंघ पदरात पाडून घेतला आणि त्यांच्यासाठी पक्षाकडून उमेदवारीही मिळवली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर सर्वांवर कडी केली. आपले बंधू, माजी अपक्ष नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनाच नाही तर आपली पत्नी आणि वहिनी यांनाही भाजपाकडून उमेदवारी मिळवून दिली. या दोन्ही नेत्यांपर्यंत भाजपाचा हा अलिखित संदेश पोहोचलाच नाही. त्यामुळे आमदार किंवा खासदारांनी आपल्या नातेवाईकांना उमेदवारी देऊ नये या पक्षाच्या अलिखित आदेशापासून ते अपवाद ठरले. हे न बोलता केलेले राजकारण.

शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे मूळचे शिवसैनिक. पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि पत्रकारही.. आपली पत्रकारिता करत असताना त्यांनी पक्षकार्यही तितकेच जोमाने केले. परिणामी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशोक पडबिद्री यांच्यानंतर सामना, या कथित मुखपत्राच्या कार्यकारी संपादकपदी राऊत यांची नेमणूक केली. दैनंदिन चालणारे मुखपत्र हाती आल्यावर संजय राऊत यांच्यातले नेतृत्त्वगुण त्यांना नुसते कार्यकर्ते म्हणून राहू देत नव्हते. परिणामी न बोलता त्यांनी बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरे यांची मर्जी राखण्यात यश मिळवले व राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतली. ते निवडून आले तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत बंडखोरी झालेली नव्हती. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या 40 आमदारांच्या मतांमुळेच ते राज्यसभेचे सदस्य झाले आणि आता उद्धव ठाकरे यांच्याकडे निष्ठा दाखवताना ते याच शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर वाट्टेल तसे तोंडसुख घेत आहेत. राऊत आता या पक्षाचे नेते झाले असले तरी कार्यकर्ते म्हणूनही ते अजूनही कार्यरतच आहेत. याच कार्यकर्त्याच्या भूमिकेत वावरताना दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर रोज सुरू केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून रडारड सुरू केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 जानेवारीला मुंबईत एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने येत आहेत. यानिमित्ताने ते मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचा प्रचार करणार आहेत. याबद्दल राऊत यांनी नापसंती व्यक्त केली. पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीने महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी येऊ नये, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांना मला विचारायचे आहे की, पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले कोणामुळे? भाजपा सत्तेत आला म्हणून ते पंतप्रधान होऊ शकले. जो पक्ष त्यांना त्या पदापर्यंत पोहोचवतो त्या पक्षाचा आणि त्या पक्षाच्या उमेदवारांचा ते प्रचार करणार नाहीत तर कोण करणार? आणि त्यांनी का करू नये? आज त्यांनी आपल्या रडगाण्यात थोडी भर टाकली. ते म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर खांद्यावर भाजपाचा गमचा टाकून प्रचार करत आहेत. विधानसभेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी खरं म्हणजे तटस्थ भूमिका घेऊन त्याप्रमाणे वावरले पाहिजे. मनोहर जोशी लोकसभेचे सभापती असताना कधी पक्षाचा गमचा खांद्यावर घेऊन वावरले नाहीत. विधानसभेचे तेव्हाचे अध्यक्ष दत्ताजी नलावडे शिवसेनेच्या कार्यक्रमाला कधी हजर असायचे नाहीत. येथेही राऊत यांचे चुकतेच आहे. राहुल नार्वेकर भाजपामुळेच विधानसभेचे अध्यक्ष झाले. भाजपानेच त्यांना अध्यक्ष म्हणून निवडले आणि ते त्या खुर्चीवर बसले. विधानसभा अध्यक्षांनी तटस्थपणे काम करायला हवे याबद्दल कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. पण ते विधानसभेचे अधिवेशन चालू असताना… सभागृहात. तेथे त्यांचा तटस्थपणा दिसून यायला हवा. बाहेर ते भाजपाचे नेते आहेत, आमदार आहेत आणि पक्षाचे कार्यकर्ते.. त्यामुळे त्यांनी पक्षासाठी प्रचार करणे यात गैर काय? जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे राऊतांचे रडगाणे वाढत राहील. रडगाणे गाता गाता त्यांनी टाहो वा हंबरडा फोडू नये… इतकेच.

