Homeब्लॅक अँड व्हाईटफलंदाजांना झुकते माप...

फलंदाजांना झुकते माप देणारे क्रिकेट पंच डिकी बर्ड!

हॅरोल्ड डिकी बर्ड यांच्या निधनामुळे क्रिकेट जगातील एक सर्वोत्तम पंच काळाच्या पडद्याआड गेला आहे. क्रिकेटपटूंना बरीच लोकप्रियता, क्रिकेटचाहत्यांचे भरपtर प्रेम मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु याच खेळातील एखाद्या पंचाला‌ तेवढीच लोकप्रियता, क्रिकेटरसिकांचे प्रेम मिळाल्याचे‌ एकमेव उदाहरण म्हणजे इंग्लंडचे जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पंच डिकी बर्ड होय. क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम पंचामधील एक, अशीच त्यांची ओळख आजदेखील करुन दिली जाते. सर्वोत्तम पंच कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे डिकी बर्ड होते. क्रिकेट खेळातील पंचगिरीला बर्ड यांनी एका वेगळ्या उंचीवर‌ नेऊन ठेवले. आपला स्वतःचा एक वेगळा दबदबा त्यांनी निर्माण केला. निःपक्षपातीपणे मनापासून बर्ड यांनी या खेळाची सेवा केली म्हणूनच क्रिकेट खेळाडूंमध्ये त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले. बर्ड यांनी आपल्या कारकिर्दीत पायचितचे निर्णय खूप कमी दिले. फलंदाजांना त्यांनी जास्त झुकते माप दिले. तेव्हा “बेनिफिट ऑफ डाऊट” त्यांचा पंचगिरीत फलंदाजांना जास्त मिळायचा. चौकार, षटकार देण्याची त्यांची एक वेगळीच पद्धत असायची. ते स्वतः प्रथम दर्जाचे चांगले क्रिकेटपटू असल्याचा त्यांना मोठा फायदा झाला. त्यामुळे खेळाडूंवरील दडपण, दबाव‌ याची त्यांना चांगली जाण होती. षटकांच्या अधेमधे खेळाडूंशी सवांद साधून‌ ते त्यांचा ताण, तणाव कमी करण्याचा नेहमी प्रयत्न करायचे. सामन्यातील कठीण प्रसंग हाताळण्यात ते माहिर होते. सामना कसा नियंत्रणात ठेवायचा याची त्यांना उत्तम जाण होती. स्टार खेळाडूंची त्यांनी कधी हयगय केली नाही. वेळप्रसंगी त्यांना खडेबोल सुनावण्यास बर्ड यांनी कधी मागेपुढे बघितले नाही. त्यांची अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाखाणण्यासारखी होती.

१९ एप्रिल १९३३ साली बर्ड यांचा जन्म बार्न्सले येथे झाला. यॉर्कशायर, लिस्टशायरतर्फे ते प्रथम दर्जाच्या ९३ सामन्यांत खेळले. त्यांनी ३३१४ धावा केल्या. त्यात २ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश होता. १८१ धावा नाबाद ही त्यांची सर्वोत्तम खेळी. इंग्लंडचे महान फलंदाज सर जेफ बायकॉट यांच्यासोबत काही काळ खेळण्याची संधी बर्ड यांना मिळाली. दुखापतीमुळे खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द अवघ्या ३२व्या वर्षी संपली. मग काही काळ त्यांनी प्रशिक्षकपद भूषविले. शेवटी त्यांनी आपला मोर्चा पंचगिरीकडे वळवला. १९७०पासून त्यांनी पंचगिरी सुरू केली. अवघ्या तीन वर्षांत त्यांना कसोटी सामन्यात पदापर्णाची संधी मिळाली. १९७३ साली बर्ड यांनी इंग्लंडविरुद्ध न्युझीलंड कसोटी सामन्यात पदार्पण केले. त्यानंतर मग त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. बर्ड यांनी मागे ‌वळून बघितले नाही. तब्बल‌‌ २३ वर्षं त्यांनी १५०पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम पाहिले. त्यात ६६ कसोटी आणि ६९ वन डे सामन्यांचा समावेश होता. वन‌ डे वर्ल्ड कपमध्ये पहिल्या तीन स्पर्धांत तीन वेळा अंतिम सामन्यात पंचगिरी करण्याचा पहिला मान बर्ड यांना मिळाला होता.

विडिंजच्या पहिल्या दोन आणि भारताच्या पहिल्या विश्वचषक विजेत्या संघाचे ते साक्षीदार होते. १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने‌ ही स्पर्धा जिंकली तेव्हा विडिंजचा शेवटचा फलंदाज मायकल होल्डिंगला बर्ड यांनी पायचीत देऊन भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केले होते. तसेच विडिंजचा वेगवान गोलंदाज मार्शलचा एक उसळता चेंडू बलविंदर सिंग संधूच्या हेल्मेटवर लागला होता. तेव्हा बर्ड यांनी मार्शलची चांगली कानउघाडणी केली होती. १९९६ सालच्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावरील इंग्लंडविरुद्ध भारत यांच्यातील कसोटी सामना बर्ड यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात सौरव गांगुली, राहुल द्रवीडने भारतातर्फे कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात बर्ड यांना दोन्ही संघातील खेळाडूंनी “गार्ड ऑफ ऑनर” दिला होता. बर्ड जेव्हा शेवटच्या दिवशी पॅव्हेलियनमध्ये पोहोचले तेव्हादेखील स्टेडियममधील सर्व क्रिकेटप्रेमींनी उभे राहून टाळ्यांच्या गडगडाटात त्यांना निरोप दिला. अनेकांना अश्रू अनावर झाले. खेळांडूप्रमाणे अनेक चाहते त्यांची स्वाक्षरी घेण्यास धडपडायचे. काही सामन्यांत बर्ड यांच्या टोप्या चाहत्यांनी लंपास केल्याचा बातम्या होत्या. डेव्हिड शेफर्ड आणि डिकी बर्ड या दोघांची जोडी खूप गाजली होती.

वेळेच्याबाबतीत बर्ड कमालीचे वक्तशीर असायचे. आपल्या पहिल्या सामन्याच्या वेळी ते सकाळी सहा वाजता मैदानात हजर झाले होते. त्यावेळी मैदानाचे प्रवेशव्दार बंद होते. त्यावेळी भिंतीवर चढून मैदानात प्रवेश करणाऱ्या बर्ड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. इंग्लंडच्या राणीने त्यांना बंकिंगहॅम पॅलेसमध्ये जेवणासाठी खास‌‌ निमंत्रित केले होते. तेव्हा बर्ड यांची स्वारी पाच तास ‌अगोदर जाऊन पॅलेसच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी उभी होती. तेव्हा बर्ड यांना पॅलेसमध्ये एवढे लवकर सोडण्यास मज्जाव केला गेला. मग जवळच्याच एका हॉटेलमध्ये त्यांनी थोडा वेळ काढला आणि मग बर्ड यांची स्वारी बंकिंगहॅम पॅलेसला रवाना झाली. पंचगिरी केवळ व्यवसाय अथवा जबाबदारी म्हणून नव्हे तर धर्म म्हणून ते जगले. आधुनिक तंत्रज्ञान, डी.आर.एस., थर्ड अंपायर, या सुविधा नसताना त्यांनी दिलेले निर्णय आजदेखील जागतिक स्तरावर उदाहरण म्हणून दिले जातात. क्रिकेटमध्ये शिस्त आणि मूल्यांचा वसा त्यांनी शेवटपर्यंत जपला. ते नि‌‌र्णय घेताना कमालीचे सावध असायचे. त्यांच्याकडून खूप कमी चुका झाल्या असे अनेक खेळाडूंचे मत होते. बर्ड यांच्या आत्मचरित्राचा आणि व्हार्ईट, कॅप अॅन्ड  बेल्स‌, या दोन पुस्तकांच्या दहा लाखांपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या. ते अविवाहित होते. जणूकाही त्यांनी क्रिकेटशीच लग्न केले होते. २०१४ साली ते यॉर्कशायरचे‌ अध्यक्ष होते. २०१२ साली त्यांना “ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर” या सर्वोच किताबाने गौरविण्यात आले. बार्न्सली गावाने त्यांना मानद नागरिक म्हणून उपाधी दिली. याच गावच्या मध्यभागी बर्ड यांचा सहा फूट ऊंचीचा कांस्य पुतळा उभारण्यात आला आहे. जगप्रसिद्ध विस्डेन मासिकाने, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आणि आयसीसीने बर्ड यांचा सर्वोत्तम पंचाचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. डिकी बर्ड फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवा खेळाडूंना आर्थिक मदतीचा हात दिला. डिकी बर्ड यांच्या जाण्याने पंचगिरीतील सुवर्णयुगाची सांगता झाली आहे, असे खेदाने म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आशियाई चषकाने शुभमन गिलवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!

विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ आता युएई‌ येथे झालेल्या‌ आशियाई‌ चषक टी-२०‌ क्रिकेट स्पर्धेत‌ भारताने जेतेपदावर सहज कब्जा करुन क्रिकेटजगतावर आशियातदेखील आम्हीच राज्य करीत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून‌ दिले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ यंदादेखील जिंकणार हे भाकित करायला कोणा...

अमेरिकन टेनिसमध्ये अरिना, कार्लोसची बाजी!

यंदाच्या शेवटच्या अमेरिकन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला गटात बेलारुसच्या २७ वर्षीय अरिना सबालेंकाने आपले जेतेपद राखण्यात यश मिळवले तर पुरुष विभागात स्पेनचा युवा टेनिसपटू २३ वर्षीय कार्लोस अल्कराझने पुन्हा एकदा एका वर्षाच्या अवधीनंतर विजेतेपदाचा चषक उंचावला. या दोघांनी जेतेपदाला गवसणी घालून यंदाच्या...

पेनल्टी कॉर्नरवर हमखास गोल करणाऱ्या खेळाडूंची भारताकडे वानवा

बिहारमधील राजगीर शहरात झालेल्या दहाव्या आशियाई‌ चषक हॉकी स्पर्धेत हरमनप्रीत सिंगच्या यजमान भारतीय हॉकी संघाने जेतेपदाचा शानदार विजयी चौकार लगावला. आशिया खंडातील या प्रतिष्ठेच्या हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावून भारताने पुढील वर्षी हॉलंड, बेल्जियम येथे होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम...
Skip to content