आर्थिक सुधारणांना प्रारंभ होऊन पाव शतकापेक्षा अधिक काळ उलटला. या काळातील सर्व सरकारांकडून भरघोस सवलती, सोईसुविधा घेऊन प्रचंड नफा कमाविणाऱ्या खाजगी क्षेत्रातील उद्योगांनी देशउभारणीच्या कार्यात दिलेले अत्यल्प योगदान निराशाजनकच नव्हे तर चिंताजनकही असल्याचे मत रमा प्रकाशनाच्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषणाच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.
मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व येथील साठ्ये कॉलेजच्या सभागृहात आयोजिण्यात आलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर, डॉ. निशीता राजे तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यांनी केंद्र सरकारच्या कर उत्पन्नात कार्पोरेट क्षेत्रापेक्षा व्यक्तिगत करदात्यांंचा हिस्सा मोठा आहे, इकडे लक्ष वेधले.
तारदाळकर म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत सरकारचा भांडवली खर्च दोन लाख कोटींवरून यंदा ११.११ लाख कोटींवर पोहोचला म्हणजे पाच पटीने वाढला. त्या तुलनेत खाजगी क्षेत्राकडून पायाभूत सुविधां उभारण्यासाठी म्हणावी तशी तरतूद केली गेली नाही ही चिंताजनक बाब आहे. डॉ. निशीता राजे यांनी सांगितले की, सरकारच्या भांडवली खर्चाचा मल्टीप्रायर इफेक्ट होतो. सरकार जेव्हा एक रुपया भांडवली खर्च करते तेव्हा अर्थव्यवस्थेला तीनपट गती मिळते. त्यादृष्टीनेही मूलभूत सुविधा उभारण्यासाठी खाजगी क्षेत्राकडून गुंतवणूक वाढली पाहिजे. अर्थात अर्थसंकल्पातील काही चांगल्या तरतूदींमुळे खाजगी क्षेत्राकडून गुंतवणूक वाढावी यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.
नगरविकासाच्या नव्या योजना आखताना जुन्या “स्मार्ट सिटी” योजनांची फलश्रुती काय आहे हे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट करायला हवे होते, असे प्रकाश कुलकर्णी म्हणाले. मोठमोठे हमरस्ते, उड्डाणपूल, बोगदे यांची उभारणी सुरू असताना मुंबईसारख्या महानगरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा दूर करण्यासाठी लक्ष द्यावे लागेल याची जाणीव कुलकर्णी यांनी करून दिली.
जोरदार पाऊस पडत असतानाही या अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमाला पार्लेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. रमा प्रकाशनाच्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष होते. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, बीएसई – इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड आणि एनकेजीएसबी को-ऑप. बँक यांचे या कार्यक्रमास सहप्रायोजकत्व लाभले होते. या कार्यक्रमात पार्ल्यातील काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तीत आयोन एक्सचेंज लिमिटेडचे समूह सीएफओ नंदकुमार रणदिवे, ब्ल्यू क्रॉस लि.चे एमडी भालचंद्र बर्वे, सीए सुनील मोने, बँकर नागेश पिंगे, माजी नगरसेवक अभिजित सामंत, माजी उपमहापौर अरुण देव, उद्योजक राजू रावल, विद्यानिधी शिक्षण संस्थेच्या प्रा. संगीता तिवारी यांचा समावेश होता. या कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.