Thursday, February 6, 2025
Homeमाय व्हॉईसमस्साजोगप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना...

मस्साजोगप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना सोडावेच लागेल मौन!

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महायुतीचे सरकार स्थापन झाले त्याला आता महिना होतो आहे. या अवधीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्तुतीच्या तुताऱ्या कडवे विरोधी, उबाठाचे प्रवक्ते आणि शपराँकाँच्या झुंझार नेत्या सुप्रिया सुळे दोन्ही बाजूंनी फुंकू लागेल आहेत. ही फडणवीस यांच्यासाठी कौतुकास्पदच बाब आहे. मात्र त्याचवेळी बीड जिल्ह्यातील एका सरपंचाच्या मृत्यूचे पडसाद सरकारविरोधात राज्यभरात उमटत आहेत ही त्यांच्यासाठी तितकीच चिंतेची बाब आहे. शिवाय बीडशेजारच्या परभणीत झालेल्या दंगलीनंतर एका संशयित आरोपीचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यूही सरकारसाठी तापदायक ठरतो आहे. दोन्ही प्रकरणे संसदेतही पोहोचली. पण विशेषतः म्स्साजोग सरपंच हत्त्येचे प्रकरण दिल्लीपासून गल्लीपर्यंत अजूनही गाजले आहे. अद्यापी त्या हत्त्येच्या आरोपींना अटक होण्यासाठी मोर्चे, जलसमाधी आंदोलने, मूक मोर्चे, राजकीय जुळणी व बांधणी सुरु आहे.

फडणवीसांनी महायुतीच्या प्रचंड मोठ्या विजयानंतर सरकार स्थापन केल्याबरोबर लगेचच ही दोन्ही प्रकरणे उद्भवली आहेत व तीही मराठवाड्यातच, हे विशेष! बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना काही गावगुंडांनी पळवून नेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडला. हालहाल करून ते मारले गेले होते. हत्त्येची बाब स्पष्ट होताच गाव व बीड जिल्हा चवताळून उठला. त्या हत्त्येचे तपशील जसजसे बाहेर येऊ लागले, तसे राज्यात सर्वत्र जनताही संतापली. दुःखीही झाली. एका गावातील लोकप्रिय नेत्याला (संतोष, हे सलग पंधरा वर्षे गावचे सरपंच राहिले होते) भरदिवसा पळवून नेले जाते व मारून टाकले जाते ही बाबच हादरवून टाकणारी होती.

9 डिसेंबरला ही हत्त्या झाली. त्याआधी चार दिवस, 5 डिसेंबरला मुंबईतील भव्य समारंभात, देवेन्द्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे व अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महायुतीच्या सरकारची रीतसर स्थापना झाली. नागपूरचे विधानमंडळाचे अधिवेशन 17  डिसेंबरला सुरु झाले. त्याआधी एक दिवस, 15 डिसेंबरच्या सायंकाळी, फडणवीस मंत्रिमंडळाचा पहिला (व कदाचित शेवटचा) विस्तार नागपुरात पार पडला. या सरकारच्या स्थापनेपासून जे अनेक विक्रम घडत आहेत, त्यात नागपुरात झालेला मंत्रिमंडळाचा शपथविधी याही विक्रमाची भर पडली. 1991मध्ये नागपुरात एका मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची तर डॉ. जगन्नाथ ढोणेंनी राज्यमंत्रीपदाची शपथ नागपूरच्या राजभवनात घेतली होती व त्यायोगे ठाकरेंच्या शिवसेनेतील पहिली मोठी फूट साकारली होती. त्यानंतर नागपुरात मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी गेली तीन दशके झालाच नव्हता. ती सारी कसर नागपूरकर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भरून काढली. विधानसभेचे अधिवेशन तोंडावर असताना झालेला शपथविधी, हे आणखी एक निराळे वैशिष्ट्य या कार्यक्रमाचे तर होतेच, पण संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी एकाच टप्प्यात होण्याची घटनाही अलिकडच्या या इतिहासात विरळाच होती. 39 सदस्यांनी यावेळी नागपुरात शपथ घेतली. त्यात सहा राज्यमंत्रीही समाविष्ट होते. गेली अडीच वर्षे एकनाथ शिंदेंचे मंत्रीमंडळ राज्यमंत्र्यांविनाच चालवले गेले होते. आता फडणवीस सरकारमध्ये एखादी जागा वगळता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची संधी संपलेली आहे.

हे सारे नागपुरात घडत असताना तिकडे बीड जिल्हा व मराठवाडाही मस्साजोग सरपंचाच्या हत्त्येत हळहळत होता. संतापतही होता. त्या प्रकरणातील संभाव्य आरोपी असणारी मंडळी नागपुरातील शपथविधीला एका मंत्र्याचे समर्थक म्हणून हजर होते, ही धक्कादायक बाब आता त्या हत्त्येचा तपास बराच पुढे गेल्यानंतर, लक्षात येते आहे. बीडचे पालकमंत्रीपद गेली पाच वर्षे आधी उद्धव ठाकरे सरकारमध्ये तर नंतर एकनाथ शिंदे सरकारमध्ये धनंजय मुंडेंनी सांभाळले होते. मस्साजोग सरपंच हत्त्याप्रकरणातील संशयाची एक सुई ज्या व्यक्तीमुळे धनंजय मुंडेंकडे वळत होती तो या प्रकरणातील संशयित आरोपी क्रमांक एक वाल्मिक कराड नागपुरात कार्यकर्त्यांसह मुंडेंचा जयजयकार करण्यासाठी शपथविधीवेळी थेट राजभवनात हजर होता, असे विरोधी पक्षांच्या आमदारांनी नंतर सांगितले. ही बाब महाराष्ट्राला चकित करणारी तसेच धक्कादायकही ठरली.

शपथविधीनंतर लगेचच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. त्या कालावधीत हा संशयित आरोपी कराड नागपुरातच एका फार्महाऊसवर मुक्कामाला राहिला होता असेही आरोप झाले. विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांमध्येही झाले आहेत. हा कराड खरोखरीच नागपुरात राजभवनात गेला होता का? आणि तो नंतर अधिवेशन काळात नागपुरात राहिला होता का? हे पोलिसांनी अद्यापी स्पष्ट केलेले नाही. त्याचा खुलासा सरकारी निवेदनांमध्येही झालेला नाही. पण तसे जर झाले असेल तर ते खरोखरीच गंभीर आहे. फडणवीस सरकारवरील तो एक मोठा कलंकही म्हणावा लागेल.

बीडमधील घटनाक्रमात वाल्मिक कराडचे नाव गुंफले गेले तेव्हा त्याचा बॉस म्हणून धनंजय मुंडेंचेही नाव येत गेले आहे. कराडचा आका असा मुंडेंचे नाव न घेता उल्लेख महायुतीमधीलच काही आमदार उघडपणाने करत आहेत. बीडमधील प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीचे मुंडेंचे सहकारी आमदार आहेत. नमिता मुंदडा या केजच्या भाजपाच्या आमदार आहेत. तर त्याजवळच्या आष्टी मतदारसंघातील सुरेश धस हेही भाजपाचे आमदार आहेत. हे तिघेही महायुतीमधील धनंजय मुंडेंचे सहकारी आहेत. पण ते उघडपणाने धनंजय यांच्यावर ठपका ठेवू पाहत आहेत. असे का होते आहे? याचेही उत्तर महायुतीला, विशेषतः अजितदादा पवार यांना द्यावे लागेल. धनंजय हे दादांचे अत्यंत निकटचे सहकारी आहेत. त्यांच्याभोवतीच्या लोकांवर असे आरोप होत असताना अजितदादा गप्प राहू शकत नाहीत.

धनंजय यांच्या भगिनी व भाजपाच्या ज्येष्ठ मंत्री पंकजा मुंडे याही बीडच्याच. परळी हे त्यांचेही गाव. याच मतदारसंघाचे धनंजय आमदार आहेत. सध्या पंकजा या भाजपाच्या विधान परिषद सदस्य आहेत. त्या बीडच्या पालकमंत्रीपदी सलग पाच वर्षे (2014 ते 2019) राहिल्या. त्यांचे पिताजी भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा एकीकडे पंकजा तर दुसरीकडे धनंजय सांभाळत आहेत. हा जो वाल्मिक कराड आहे, तो मूळचा गोपीनाथ मुंडेंच्या जवळचा कार्यकर्ता होता. तो मुंडेंच्या घरातच लाहनमोठी कामे करत वावरत असायचा, असे बीडचे लोक सांगतात. धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या हयातीतच राष्ट्रवादीत गेले. तेव्हा त्यांच्यासमवेत परळीतील जे नेते गेले, त्यात वाल्मिक प्रमुख होता. धनंजय यांच्या पालकमंत्रीपदाच्या कालावधीत कराडचा दबदबा मोठ्या प्रमाणात वाढत गेला. जिल्ह्यातील कलेक्टर, पोलीसप्रमुखांपासून सारे अधिकारी खास कामासाठी पालकमंत्र्यांच्या या खास माणसाकडे, म्हणजेच कराड अण्णाकडे धावत असत. कराड याची वेळ घेऊन त्याच्या भेटीसाठी परळीत अधिकारी तिष्ठत असत, असेही बीडचे लोक सांगतात. कराडची ताकद पालकमंत्र्यांमुळेच वाढत होती आणि आताही मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडेंच्या आश्रयाने कराडचा दबदबा कायम राहिलेला आहे, असे बीडकरांचे म्हणणे आहे.

फडणवीस

मस्साजोगला नेमके काय झाले, हेही पाहणे गरजेचे आहे. तिथे आवादा या कंपनीतर्फे पवनचक्की उभी करण्याचे काम सुरु होते. पवनऊर्जेचे मोठे काम बीडमध्ये अनेक तलुक्यांत सुरु आहे. एकेका पवनचक्कीच्या उभारणीचा दोन ते चार कोटींच्या घरात खर्च येतो. त्यासाठी शेतकऱ्यांची पाच-साडेपाच एकर जमीन भाड्याने घेतली जाते. केज तलुक्यात अशा डझनावारी पवनचक्क्या गावागावात उभ्या करण्याचे काम सुरु आहे. मोठ्या भांडवली गुंतवणुकीच्या या प्रकल्पातून काही मलिदा काढण्याचे उद्योग राजकीय कार्यकर्ते करत आहेत. या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी मागण्यासाठी परळीला धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय कराड समोर उभे करण्यात आले. अधिकाऱ्याकडे दादागिरी करून धक्काबुक्कीही करण्यात आली. दोन कोटींपैकी पन्नास लाख रुपये दिले-घेतलेही गेले. कंपनीच्या लोकांनी नंतर या खंडणीची रीतसर फिर्याद कराड व अन्य काही लोकांविरोधात दिली आहे.

ज्या मस्साजोगमध्ये एक पवनचक्की उभी राहत होती, त्या साईटवर कराडचे नाव सांगत काही लोक काम बंद पाडायला गेले. तेव्हा मारामारी झाली. गावातील काम बंद का करता, म्हणून सरपंच देशमुख व त्यांच्या लोकांनी कराडच्या टोळक्याला झोडून, हाकलून लावले. ही हकिकत 7 वा 8 डिसेंबरला घडली. दुसऱ्या दिवशी सरपंच देशमुख आपल्या मामेभावासोबत मोटारीने गावाबाहेर निघाले तेव्हा पेट्रोलपंपावर गाडी अडवली गेली. भावाला खाली उतरवले गेले व सरपंचांबरोबर चर्चा करायची आहे, ते दोन तासांत परत येतील, असे सांगून गाडी घेऊन ते लोक निघून गेले, अशी तक्रार देशमुखांच्या नातलग भावाने पोलिसांत दिली आहे. दुसऱ्या दिवसापर्यंत देशमुख परत आले नाहीत. त्यांचा मृतदेह 9 डिसेंबरला आढळून आला. आदल्या दिवशी जी मारामारी मस्साजोग साईटवर झाली त्याचा बदला म्हणून कराडच्या गुंडांनी सरपंचांचे अपहरण केले. मारहाण केली व तो प्रकार सुरू असतानाच व्हिडिओ कॉलवरून कराडला दृष्ये दाखवली गेली, असा आरोप आहे.

कराडला पोलीस शोधू लागले तेव्हा तो व त्याचे सहकारी गायब झाले. एकूण सात लोकांवर देशमुख यांना पळवून नेऊन मारहाण करून, हत्त्या केल्याचा आरोप आहे. त्यातील तिघे सापडले. कराडसह चार लोक फरार होते. विधानसभेत मोठी चर्चा झाल्यानंतर पोलीस अधिक्षकाची बदली झाली. तेथे आयपीएस अधिकारी आले. तपास सीआयडीकडे गेला. दोन इन्स्पेक्टर निलंबितही झाले. अकरा दिवसांनंतर कराड पुणे सीआयडीपुढे शरण आला. या प्रकरणात बऱ्याच गफलती दिसत आहेत. कराडने हजर होण्याआधी आपला खुनाशी काही संबध नाही असे सांगणारा व्हिडिओ प्रसृत केला. हे कसे काय होऊ शकते? धनंजय मुंडे आठ दिवस गुपचूप बसले होते. नंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दीर्घ चर्चा केली. त्यानंतर लगेच कराड हजर झाला. हेही कसे काय झाले? सीआयडी व स्थानिक पोलिसांच्या नऊ टीम वाल्मिक कराडचा शोध घेत होत्या. कराडची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया झाली. त्याच्या प्रॉपर्टी जप्त करण्याच्या सूचना सरकारने दिल्या. न्यायालयीन चौकशीही होणार आहे. कराडच्या जवळच्या लोकांना, पत्नीला तसेच मैत्रिणींनाही पोलिसांनी चौकशांसाठी बोलावले. तेव्हा कुठे तो शरण आला. पण मुळात तो होता तिथून पोलिसांनी त्याला शोधून पकडले का नाही? तो खरोखरीच मुंडेंच्या आश्रयाने लपला होता का? अजित पवार धनंजय मुंडेंचे मंत्रीपद काढून घेणार का? असे प्रश्न आता लोक विचारत आहेत. त्याची उत्तरे मुख्यमंत्र्यांना तसेच उपमुख्यमंत्र्यांना द्यावीच लागतील.

Continue reading

24×7 इलेक्शन मोडवर आहोत हे पुन्हा दाखवून दिले भाजपाने!

दिवसाचे चोवीस तास निवडणुकांचा विचार करणाऱ्या नेत्यांच्या हातात देश आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजपाप्रणित रालोआचे तिसरे सरकार सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्याच संपूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाला प्रचंड सुखावणारी घोषणा केली. ती...

केवळ बाळासाहेबांच्या नामस्मरणाने नाही मिळणार मते!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर मेळावे झाले. दोन्ही सभांना साधारण तितकीच गर्दी जमली होती आणि दोघेही एकमेकांना दूषणे देत होते, हे मुंबईकरांनी पाहिले, अनुभवले. दिवंगत बाळासाहेब...

फडणवीसांच्या धक्कातंत्राच्या राजकारणात शिंदेंची भूमिका कोणती?

महाराष्ट्राच्या राजकारणत सध्या धक्कातंत्राचा वापर नव्याने सुरु झाला आहे. कोणती गोष्ट कधी जाहीर करायची याचे धक्कातंत्र इंदिरा गांधींनी सर्वाधिक कौशल्याने राबवले. त्यांचे सारे महत्त्वाचे निर्णय त्या दैनिक, वृत्तपत्रे छपाईला गेल्यानंतर रात्री उशिरा घेत असत आणि मग सकाळी रेडिओवरील बातम्यांतूनच...
Skip to content