Skip to content
Tuesday, May 20, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसराज्य मंत्रिमंडळात छगन...

राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळांना ‘नो एन्ट्री’च!

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना काल डच्चू दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता नसल्याचे माहितगारांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या कोट्यातले हे मंत्रीपद तूर्तास रिक्तच ठेवले जाणार असून अगदी गरज भासल्यास राज्य मंत्रिमंडळात जेव्हा कधी खांदेपालट होईल त्यावेळी विचार केला जाईल. पण त्याहीवेळेस छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातल्या समावेशाबाबत विचार केला जाणार नाही.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हाच महायुतीतल्या तीनही प्रमुख पक्षांच्या शीर्ष नेत्यांनी म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसंमतीने मंत्रिमंडळात काही जुनेजाणते व अनेक वर्षे मंत्रिमंडळात राहिलेल्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, शिवसेनेचे तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आदींचा समावेश होता. यानंतर यातल्या काहींनी थयथयाट केला तर काहींनी मौन पाळले. सुधीरभाऊंनी आपल्याला मंत्रिमंडळात स्थान नाकारणाऱ्या लोकांना पश्चाताप होईल, असे काम आपण करू असे सांगितले. तानाजी सावंत यांनी समाजमाध्यमावरील आपल्या लोगोमधून नेत्याचा फोटो वगळला. दीपक केसरकरांनी ती साईंची इच्छा म्हणत विषय संपवला तर छगन भुजबळ यांनी प्रमाणापेक्षा जास्त आटापिटा केला. त्यांनी माध्यमांपुढे अजितदादांचा नामोल्लेख न करता शेरोशायरीच्या माध्यमातून टीका केली. पक्षाच्या मोळाव्याला दांडी मारली. अधिवेशनात भाग घेतला नाही. असे अनेक प्रकार त्यांनी अवलंबिले. पण दादा बधले नाहीत. त्यामुळे माध्यमांतल्या त्यांच्या चाहत्यांनी नंतर मुंडेंच्या जागी भुजबळांची वर्णी लागणार असल्याची बातमी चालवली. परंतु त्यात काही तथ्य नसल्याचे आता स्पष्ट होत आहे.

भुजबळ

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येप्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मीक कराड धनंजय मुंडे यांची सावली होती म्हणून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत होते. या प्रकरणाचे आरोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर ज्या क्रूरतेने आरोपींनी देशमुखांना मारले त्याचे व्हिडिओ बाहेर आले. यानंतर जनभावना ओळखून मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले व काल मुंडे यांनी राजीनामा दिला.

दरम्यान, काल विरोधी पक्षांच्या सदस्यांनी राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कोकाटे यांनी खोटी कागदपत्रे देऊन मुख्यमंत्री कोट्यातल्या दोन सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. मात्र, आज सत्र न्यायालयात या शिक्षेला स्थगिती दिली. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला दिल्या जाणाऱ्या आव्हान याचिकेवर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ही स्थगिती असेल. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी, पर्यायाने त्यांचे मंत्रीपद सध्यातरी कायम राहणार आहे.

Continue reading

उत्तरा केळकर यांना अरुण पौडवाल पुरस्कार प्रदान!

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीतसंयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २८ वर्षे साजरा होणारा 'स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार" नुकताच लोकप्रिय ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका...

विश्व केटलबेल स्पर्धेत निरव कोळीला रौप्यपदक

नुकत्याच स्पेनमधील पाल्मा डे मॉलओरका शहरात झालेल्या विश्व केटलबेल स्पर्धेत मुंबईचा युवा खेळाडू निरव कोळीने पदार्पणातच रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. २२ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात भारताच्या आठ खेळाडूंचा सहभाग होता. भारतीय संघात निरव हा एकमेव...

शाहरूख खान लंडनमधल्या ‘कम फॉल इन लव्ह..’च्या मंचावर

प्रसिद्ध सिनेअभिनेते शाहरुख खान याने लंडनमधील ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’ या नाटकाच्या सरावाच्या ठिकाणी अचानक भेट दिली. १९९५मध्ये आलेल्या आणि आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेल्या हिंदी चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’वर (डीडीएलजे) आधारित या...