Homeएनसर्कलभरत गिते ‘बिझनेस...

भरत गिते ‘बिझनेस आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित

तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गिते फ्रँकफर्ट येथील महाराष्ट्र-युरोप बिझनेस फोरममध्ये ‘बिझनेस आयकॉन ऑफ द इयर २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच सन्मानित झाले. फ्रँकफर्ट (जर्मनी) येथे झालेल्या महाराष्ट्र-युरोप बिजनेस फोरमच्या विशेष कार्यक्रमात गिते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू तसेच इंडियन कौन्सिल जनरल फ्रँकफर्टचे बी. एस. मुबारक, एबरहार्ड स्टाइनरुके (माजी महासंचालक, इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स) यावेळी उपस्थित होते.

हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. उद्योगमंत्री सामंत यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्र शासकीय प्रतिनिधीमंडळ फ्रँकफर्ट येथे गेले होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र – युरोप बिझनेस फोरम आणि इंडियन कौन्सिल जनरल फ्रँकफर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. महाराष्ट्र आणि जर्मनी येथील नामवंत कंपन्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. सुमारे ५०० उद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते.

भरत गिते बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे आलेले तरुण उद्योजक असून त्यांनी जर्मन कंपनीसोबत भागीदारी करत तौरल इंडिया या कंपनीची स्थापना केली. अ‍ॅल्युमिनियम ऑटो पार्ट्स, रेल्वे, ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या कंपनीद्वारे त्यांनी हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळेच त्यांना ‘अ‍ॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणूनदेखील ओळखले जाते. गिते यांनी अलीकडेच दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारसोबत ५०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला होता. याअंतर्गत आहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारला जाणार असून यामुळे मराठवाड्यासह राज्यातील हजारो तरुणांसाठी रोजगारनिर्मिती होणार आहे.

या कार्यक्रमात बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, भरत गिते महाराष्ट्राच्या तरुणाईचे खरे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. या कार्यक्रमात उद्योगमंत्र्यांनी यांनी जर्मनीतील उद्योजकांसाठी महाराष्ट्रातील एमआयडीसीमध्ये ५०० एकर जमीन राखीव ठेवण्याची अधिकृत घोषणा केली. यासोबतच अनिवासी महाराष्ट्रीय नागरिकांसाठी १०० एकर औद्योगिक भूखंड राखीव ठेवला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

गिते त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की, अंतरराष्ट्रीय व्यासपीठावर असा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गौरवाची बाब आहे.  हा पुरस्कार केवळ जागतिक दर्जाच्या क्षमतांचा विकास आणि नवोन्मेषाला चालना देण्याच्या आमच्या प्रतिबद्धतेला बळकट करतो, असे नाही तर; भारतीय उत्पादनक्षेत्राच्या जागतिक पातळीवरील संभाव्यतेचेही ते प्रतीक आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content