Homeटॉप स्टोरीसज्ज राहा थंडीच्या...

सज्ज राहा थंडीच्या तीव्र लाटेसाठी!

देशात सध्या तीव्र हवामानाचा अनुभव येत आहे. उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट असून, दक्षिण भारतात, विशेषत: केरळ आणि तामिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रीय झाल्याने हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, झारखंड आणि ओडिशातही थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागात तीव्र थंडीचा अंदाज आहे. नागरिकांना उबदार राहण्यास आणि खबरदारी घेण्यास सांगितले गेले आहे. उत्तर भारत गारठण्यास सुरुवात झाल्याने महाराष्ट्रातही थंडीचे आगमन झाले आहे.

राज्यातील रात्रीच्या तापमानात 4 ते 6 अंश घट

महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निवळल्याने किमान आणि कमाल तापमानात घट झाली असून गारठा वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. उत्तरेकडील वाऱ्याची उपस्थिती राज्यात हिवाळ्याची भावना निर्माण करत आहे. गेल्या 4-5 दिवसांतच राज्यातील रात्रीच्या तापमानात सुमारे 4 ते 6 अंश सेल्सिअसची घट झाली आहे. आता उर्वरित नोव्हेंबरमध्ये राज्यात पावसाची शक्यता नाही, असे पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे. राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान 15 ते 18 अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मुंबईतही तापमानाचा पारा 20 अंशांखाली घसरला आहे.

उत्तर-मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार

यापुढे राज्यात आकाश स्वच्छ आणि कमी आर्द्रता राहील. उत्तर-मध्य महाराष्ट्रात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा सुमारे 2 ते 4 अंश सेल्सिअसने कमी राहील. जळगावमध्ये कमाल तापमानात 2.7 अंशांची घट होऊन ते 30.8 अंश सेल्सिअस राहिले, तर किमान तापमान पाच अंशांनी खालावून 10° अशा थंडीच्या हवामानाची नोंद झाली. धुळ्यात राज्यातील सर्वात कमी 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आठवडाभर तापमानाचा पारा आणखी 2 ते 4 अंशाने खालावलेला राहणार आहे. विदर्भातही दिवसासह रात्रीचे तापमान कमी राहील. बदलत्या हवामानात सर्दी, खोकल्यापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात नवी हवामान प्रणाली

21-22 नोव्हेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरावर एक तीव्र तीव्र कमी दाब क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ पुढे चेन्नई आणि पुडुचेरीसह उत्तर तमिळनाडू किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. अनेक भागात 70 ते 120 मिमी पावसाची शक्यता आहे. याशिवाय जोरदार वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

ला-नीना यंदा परत आला आहे

ला-नीना यंदा परत आला आहे! नोव्हेंबर ते जानेवारी या काळात उत्तर भारतात अधिक कडाक्याची थंडी राहू शकेल. त्याचा परिणाम उर्वरित भारतातील मैदानी प्रदेशावरही जाणवेल. यंदाचा हिवाळा पावसाळ्यासारखाच प्रदीर्घ आणि विक्रमी असेल. एल-निनो वर्षांत ते भारतापासून दूर उलट्या दिशेने वाहतात. त्यामुळे ला-निना वर्षांत चांगला पाऊस आणि थंडी असते, तर एल-निनो वर्षात उष्ण हवामान व दुष्काळी स्थिती असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

नंदुरबारमधल्या रानफुलांचा चहा प्या मुंबईत!

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरांत रहाणाऱ्या नागरिकांना आदिवासी लोक, त्यांची संस्कृती, त्यांची खाद्यसंस्कृती यांविषयी कायमच एक कुतूहल असते. जेव्हा ही संस्कृती अनुभवायला मिळते, तेव्हा तो शहरी नागरिकांसाठी एक विलक्षण अनुभव असतो. हाच विलक्षण अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे उद्या, २२ आणि रविवारी, २३ नोव्हेंबरला!...

भारताच्या सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी व्हायचंय…

भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारीपदाकरीता होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण होणार असून प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास...

‘हॅपी बर्थडे’, ‘कडाल कण्णी’ही ठरणार ‘इफ्फी’चे एक आकर्षण!

गोव्यात आजपासून सुरू होत असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील बाल्यावस्थेतील धैर्य, सर्जनशीलता आणि स्वप्नांचा शोध घेणाऱ्या पाच चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. यावेळी इफ्फी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र बालक निधी (युनिसेफ)बरोबर भागीदारी करणार असून चालत्या-बोलत्या, आव्हान देणाऱ्या...
Skip to content