परमविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित लेफ्टनंट जनरल डब्ल्यूएजी तथा ‘वॅग’ पिंटो (निवृत्त), यांचे 25 मार्चला पुण्यात निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांचे पुत्र कमांडर केविन पिंटो (निवृत्त) आहेत.
पुणे इथे रविवारी 28 मार्च रोजी झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक प्राप्त लेफ्टनंट जनरल जे एस नैन आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. लेफ्ट. जनरल पिंटो यांच्या निधनाबद्दल या अधिकाऱ्यांनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यविधी करण्यात आले.
1971च्या युद्धामधल्या बसंतर इथल्या लढाईत GOC 54 या तुकडीच्या कौशल्यपूर्ण नेतृत्त्वासाठी लेफ्टनंट जनरल पिंटो ओळखले जात. 12 सप्टेंबर 1943मध्ये 13 फ्रँटियर तुकडीत त्यांची भर्ती झाली. स्वातंत्र्यानंतर ते ब्रिगेड ऑफ गार्डमध्ये रूजू झाले. सेन्ट्रल कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ तसेच राजपूत रंजिमेंटचे कर्नल म्हणून ते निवृत्त झाले. 1971च्या युद्धात ‘कोणतीही पर्वा न करता शत्रूवर चढाई करा’ हे ब्रीदवाक्य घेऊन जनरल यांनी आपल्या तुकडीला प्रोत्साहित केले होते.

पुण्यात स्थायिक झालेले जनरल 1971मधल्या भारत-पाकिस्तान युद्धात बसंतरची लढाई या प्रसिद्ध लढाईत 54 इन्फंट्री तुकडीच्या त्यांनी केलेल्या नेतृत्त्वामुळे बसंतरच्या लढाईचे विजेते, म्हणून ओळखले जात. 14 दिवसांच्या या धुमश्चक्रीतल्या कामगिरीमुळे पिंटो यांच्या तुकडीने, दोन परमवीरचक्र आणि नऊ महावीर चक्र यांच्यासह 196 शौर्य पदके प्राप्त केली.
नेतृत्त्वासाठी त्यांची अतिशय सोपी व्याख्या होती. सुरूवात करण्यासाठी ‘उत्तम नेतृत्त्वाकडे कणखर व्यक्तिमत्व आणि विनोद बुद्धी हवी. आपल्याला जे हवे ते आपल्या सैनिकांकडून करून घेण्यासाठी त्यांना स्फूर्ती देण्याची क्षमता त्याच्यात हवी’ असे ते म्हणत.

