या जगातले विज्ञान आजचे कोणतेही आश्चर्य प्रत्यक्षात घडवून आणते, हे जरी खरे असले तरी ‘दोन बापांचा’ ही मराठीत चक्क शिवी समजली जात असताना माणसाच्या दीर्घायुषी जीवनासाठी जे काही संशोधन होत आहे त्यासाठी उंदीर हाच प्राणी वापरला जातो. याचेही कारण विज्ञानच आहे. माणूस आणि उंदीर यांच्या जडणघडणीत खूप साम्य असल्याने त्याच्यावरचे प्रयोग यशस्वी झाले की माणसावर प्रयोग सुरु होतात. आता येथे सुरुवातीला विज्ञानाने दोन बापांचे आणि आई नसलेले उंदीर बनवले. आणि आता या विना-आई आणि दोन बाप असलेल्या उंदरांना जर पिल्ले होत असतील तर.. आणि हाच प्रयोग विज्ञानाने माणसावर सफल करायचा ठरवला तर जगात काय गोंधळाचे वातावरण असेल याची कल्पना करून बघा. एकूण काय तर असा कुटूंबवृक्ष प्रचंड गुंतागुतीचा असेल.
हा नवा शोध अँड्रोजेनेसिस या विज्ञान शाखेतला आहे. थोडक्यात याचा अर्थ असा की, नर प्राण्यांकडून केवळ जनुक सामान घेऊन हे प्रजोत्पादन केले गेले आहे. याचवर्षी सुरुवातीला आपण या क्षेत्रातील थक्क करणाऱ्या काही प्रयोगशाळा घडामोडी पाहिल्या होत्या. पण आईविना असा हा प्रयोग यशस्वी झाला नव्हता. म्हणजे जी पिल्ले निर्माण झाली ती ‘वांझ’ निघाली होती. चीनच्या शांघाय येथील जियाव तोंग विद्यापीठात अनेक तंत्रे उपयोगात आणून हा प्रयोग यशस्वी केला गेला. सामान्यत: नर आणि मादी अशा दोघांच्या जनुकांचे योग्य मिश्रण असेल तर निरोगी

पिल्ले जन्माला येऊ शकतात. परंतु जनुकांचे संशोधन आणि संपादन केल्यामुळे आता निरोगी आणि पूर्ण वाढीचे प्रजननक्षम उंदीर तयार झाले आहेत. अशा २५९ उंदरांच्या गर्भात अशी प्रक्रिया केली गेली तेव्हा त्यातून केवळ तीन उंदीर जन्माला आले. त्यातील दोन प्रौढ होईपर्यंत जगले आणि त्यांच्यापासून प्रजनन होऊन उंदरांची एक नवी पिढी तयार होऊ शकली.
या संशोधकांच्या मते, दोन बापांऐवजी दोन माताच असत्या तर कदाचित हे सोपे झाले असते. मात्र हा सध्या केवळ विचार आहे. कारण, असे जनुक संशोधन आणि संपादन नेहमीच यशस्वी होण्याची खात्री देता येत नाही. येथे आता संशोधकांनी थोडा सबुरीचा आग्रह केला आहे. ते म्हणतात की, यामागे लगेच धावून काही साध्य होणार नाही. ही एक गोष्ट आणि अशी प्रक्रिया माणसावर होऊ शकते की नाही हे बघायला आणखी खूप वेळ लागणार आहे. कधीकाळी हे शक्य झालेच तर त्यात कितीतरी तात्विक आणि नैतिक प्रश्न उभे राहतील. संशोधकांच्या मते यातून प्रजनन उपचारपद्धतीत सुधारणा होऊ शकेल. स्वत:च्या अपत्यासाठी डोळे लावून बसलेल्या कित्येकांना ही आशाही काही कमी असणार नाही. माणूस अखेर आशेवरच जगत असतो…