समोरच्या बाजूने दादाभाई नवरोजी रस्त्यावरून येणाऱ्या गाडया, एका बाजूला मंत्रालयाच्या बाजूने येणाऱ्या गाड्या, मागील बाजूने पी. डिमेलो मार्गांवरून येणाऱ्याजाणाऱ्या गाड्या, गेट वेकडे जाणाऱ्या गाड्या, रीगल सिनेमापाशी येणाऱ्या व वर्तुळकार चौकाभोवती नेहमीचीच वाहनांची प्रचंड वर्दळ, त्यातच राजभाषा मराठी दिनाची गजबज! आणि या वर्दळीला लागूनच असलेल्या शिवाजी महाराज वस्तू संग्रहलयात केशवसुतांच्या ‘सतारीच्या बोला’प्रमाणे मधुर असे ‘दीड दा, दीड दा..’ असे स्वर कानावर पडल्याप्रमाणे ‘गायतोंडे : बिट्वीन टू मिरर्स’ या ग्रंथाचे प्रकाशन होत होते. संध्याकाळच्या कोलाहालीचा केंद्रबिंदू असलेल्या शिवाजी वास्तू संग्रहालयात अगदी मनोहारी पद्धतीने पण एका विशिष्ट लयित हा कार्यक्रम पार पडत होता हे विशेष! मोटारींच्या भोंग्यांचा वा धकाधकीचा या श्रोतृवर्गांवर काहीच परिणाम होत नव्हता. सर्वच जणू ‘गायतोंडे रंगीं रंगले होते. ब्रह्मज्ञान मिळत असल्याप्रणे ते शांतपणे प्राशन करत होते!
आम्ही सर्वजण काहीसे साशंक होतो. कारण मराठी भाषा दिन सरकारी पातळीवर जोरदारपणे साजरा केला जाणार याची खात्री होतीच. एक कार्यक्रम तर आमच्यापासून जवळच म्हणजे गेट वेजवळच होता. (एक गमंत आठवली. आमच्या संयोजकापैकी एकाची हेवीवेट राजकीय नेत्याशी घट्ट मैत्री आहे. त्याला या समारंभाबद्दल समजल्यावर ‘मी ही थोडावेळ येऊन जाईन’, असे म्हणताच आमचा मित्र चटकन म्हणाला आम्हाला आजतरी ‘राजकारण’ नकोय.) राजकीय नेते मंडळी आली तर नाही म्हटले तरी सांस्कृतिक समारंभाची एक विशिष्ट लय बिघडतेच!
“जड ते खोटे हे मात्र कसे
ते न कळे, मज जडलेच पिसे काय करावे कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनी ते… दीड दा.. दीड दा..” (केशवसूत)

माफ करा वाचकहो, नमनाला नको इतके तेल घातले. मुद्दामहून नाही केले हे, या कार्यक्रमातील एक वक्ते ज्येष्ठ पत्रकार प्रयाग शुक्ल यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीसच या माहोलचा उल्लेख करून इतक्या कोलाहालातही शांतपणे आपल्याच लयीत हा कार्यक्रम सुरु असल्याचा आवर्जून उल्लेख केला होता. गायतोंडेही असेच शांतपणे आपल्या चिन्हाच्या सहाय्याने आपली चित्रे साकारत असत. त्यांच्या सहवासात असणे म्हणजे विलक्षण अनुभव असायचा. ते कमी बोलत असत. काहीशी धीरगंभीर वृत्ती होती त्यांची!
“दुभंगून जाता जाता मी अभंग झालो!
चिरा चिरा जुळला माझा, आत दंग झालो..” (सुरेश भट)
असे आतल्याआत काहीसे नाराज होत त्यांनी कलेला आपलेसे केले होते. परंतु वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या कलेला नाराजीपासून कोसो दूर ठेवले हे मान्यच करावे लागेल.
तुझ्यातला पेंटर जिवंत आहे!
जे जे कला महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर सादर केलेलं एका सादरीकरण पाहून त्यांनी ‘तुझ्यातील पेंटर जिवंत आहे’ अशी शाबासकी दिल्याचे सांगून अभिनेते अमोल पालेकर म्हणाले की, त्यांनी कधीही व्यावसायिकतेला आपल्यावर स्वार होऊ दिले नाही. ते नेहमी वर्तमानात जगले. दडपण न घेता त्यांनी त्यांना हवी तीच चित्रे काढली.
आपण त्यांच्यावर केलेल्या उपचारांनंतर त्यांनी त्यांच्या कलेला पुन्हा सुरुवात केली ही खासरोखरच माझ्यासाठी समाधानाची बाब असल्याचे सांगून प्रख्यात डॉ. नंदू लाड म्हणाले की, मी आज एका वेगळ्याच जगात बोलायला आलो आहे. गायतोंडे यांच्यासाठी मी काही करू शकलो हे खरोखरच माझे भाग्य आहे.
या पुस्तकाच्या निमित्ताने गायतोंडे यांचा जीवनसंघर्ष जवळून पाहण्याचा योग आला, असे लेखिका शांता गोखले यांनी सांगितले. याप्रसंगी केतन करनानी म्हणाले की, यांनी सतीश नाईक यांच्या मराठी ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर झालेच पाहिजे असा आग्रह मी धरला होता व माझा हट्ट सतीश नाईक यांनी पूर्ण केला.
याप्रसंगी डॉ. शरयू दोशी, डॉ. फिरोजा गोदरेज, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आदींची भाषणे झाली. यावेळी वासुदेव कामत आणि अच्युत पालव यांचाही सत्कार करण्यात आला.
कलासंग्रहालयाने केलेला गौरव कलेचा वारसा सांगणाऱ्या व जपणाऱ्या देशातील एका प्रमुख वस्तूसंग्रहालयाच्या हिरवळीवर झालेला हा सुखद समारंभ सुमारे तीन तासांनी संपन्न झाला. एका अर्थाने कलासंग्रहालयाने गायतोंडे यांच्या कलेचा हा गौरवच केल्याचे मी मानतो.
“The purpose of art is washing the dust of daily life of our souls” असं का म्हणत असतील, या प्रश्नाचे उत्तर मला तरी समारंभानंतर मिळाल्यासारखे वाटते.
कलेबद्दल महान कलाकार पिकासो यांनी म्हटल्याचे पटते की “I do not seek, I found it!” हेच बहुदा खरे असावे.
छायाचित्रंः चिन्ह प्रकाशन
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर