महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय्… तरीही महाराष्ट्र अजूनही थंड का? असा सवाल आता काही तथाकथित आघाडीचे पुरोगामी, सेक्युलर आणि महाराष्ट्राचे स्वयंघोषित ठेकेदार करताना दिसत आहेत. बरोबरही आहे त्यांचं. महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल कोणीही अवमानजनक वक्तव्य करूच नये. यामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याच पाहिजे, ही त्यांची अपेक्षा माफकच म्हणावी लागेल. यातूनच आता महाराष्ट्रातील आधारवडाला आणि ‘शिल्लक सेने’च्या प्रमुखाला जाग आलेली दिसली. ‘शिल्लक सेने’च्या प्रमुखांनी तर पार पार्सल परत पाठवा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा आणि महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा देऊन टाकला.
ठीक आहे. एखाद्याच्या भावना दुखावल्या तर त्यातून अशा प्रतिक्रिया उमटतात. पण भावना दुखावताना त्यात ‘सिलेक्टिव्हनेस’ नसावा. जर खरंच आपण छत्रपतींविषयी आदर राखतो तर त्यांच्याविषयी कोणीही अस्वीकारार्ह विधानं केल्यास त्याचा निषेध आणि विरोध झाला पाहिजे. त्यालाच आपण खर्या अर्थाने महाराजांप्रतीचा आदरभाव समजू शकतो. मात्र, भाजपा समर्थक किंवा आपल्या विचारधारेच्या विरुद्ध विचारधारेचा असल्यास विरोध आणि आपला समर्थक किंवा आपल्या विचारधारेचा असल्यास मूग गिळून बसायचे, अशा ‘सिलेक्टिव्ह’ विरोधाला महाराजांप्रती आदरभाव किंवा प्रेम असल्याचे म्हणता येणार नाही. केवळ राज्यपाल हे पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते राहिले असल्याने आणि त्यांनी तुमच्या अवास्तव आणि असंवैधानिक मागण्या मागील अडीच वर्षे मान्य केल्या नाहीत म्हणून विरोध आणि निषेध करायचा. बाबासाहेब पुरंदरेंना वैचारिक विरोधक म्हणून त्यांच्या ‘शिवचरित्रा’ला विरोध करायचा. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे नाव पुस्तकाला दिल्याने पंतप्रधानांची तुलना थेट छत्रपतींशी केली म्हणून डांगोरा पिटायचा. याला महाराजांप्रतीचा आदरभाव म्हणता येणार नाही. यात कुठेतरी राजकारणाचा वास येतो; तो येतोच…
मागील काळात शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ म्हणण्याची गरज नाही, असे विधान केले होते. तर, त्यावेळच्या शिवसेना पक्षाचे आणि आताच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराजांच्या वारसांकडे पुरावे मागितले. शरद पवारांनी महाराजांची उपाधी जाणता राजा नव्हती, असे संबोधून महाराजांपासून ही उपाधी हिरावून स्वतःला जाणता राजा संबोधून घेण्याचा प्रताप केला होता. त्यावेळी या पुरोगामी, सेक्युलर, शिवप्रेमींपैकी कोणीही आवाज उठवल्याचे, रस्त्यावर उतरल्याचे, निषेध नोंदविल्याचे किंवा विरोध केल्याचे दिसले किंवा ऐकले नाही. एकीकडे छत्रपतींच्या नावाने पक्ष चालवला जातो आणि त्याच पक्षाच्या नेत्याने छत्रपतींच्या वारसांकडे वंशज असल्याचा पुरावा मागून थेट छत्रपतींचा अवमान केला नाही?
‘शिववडा’ सुरू करून दोन-तीन वेळा शिवजयंती साजरी करून महाविकास आघाडीतून ‘शिव’ बाजूला काढला; शिवसेना भवनावर बाळासाहेबांच्या भव्य प्रतिमेच्या खाली महाराजांची प्रतिमा लावताना, संभाजी राजेंना अटी-शर्ती लादून खासदारकी नाकारून स्वतःच्या दरवाजातून रिक्त हस्ते पाठवताना छत्रपतींचा अवमान झाला नाही? जेम्स लेन प्रकरणात हेच उद्धव ठाकरे कुठे दिसले नाहीत. मुख्यमंत्री असताना स्वत:च्या वडिलांच्या स्मारकासाठी ४०० कोटी देणार्या उद्धव ठाकरे यांनी अरबी समुद्रात उभारल्या जाणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी खडकू दिला नाही. त्यावेळी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान वगैरे झाला नाही. अशी एक नव्हे तर अनेक उदाहरणे देता येतील, पण त्यावेळी आता महाराज आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बाहेर आलेली बांडगुळं कोणत्या बिळात लपून बसली होती, हे तेच जाणोत.
प्रत्यक्षात ८०व्या वर्षी शिवनेरी गडावर पायी जाणार्या या तरुण राज्यपालांना महाराजांप्रती किती आदरभाव आहे, हे वेगळ्याने सिद्ध करण्याची किंवा राजकारणासाठी महाराजांची सोयीने आठवण करणार्यांना सिद्ध करून दाखविण्याची गरज नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असताना, केवळ शिवाजी महाराज पायी यायचे म्हणून मी पण पायी आलो. त्यांच्या जन्मभूमीचे दर्शन माझ्या दृष्टीने पुण्याचा क्षण आहे, असे कोश्यारी म्हणाले होते. मला सांगितले गेले होते की, शिवनेरी चढताना पाऊस, चिखल आणि चढण आहे. या वयात पायी जाऊ नका. तरीही मी श्रद्धेपोटी पायी आलो. छत्रपती शिवाजी महाराज हे खरे पूजनीय आदर्श आहेत. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. शिवराय सर्वसामान्य व्यक्ती नव्हते तर अवतारी पुरुष होते. सद्यस्थितीत राम, कृष्ण, गुरू गोविंद सिंग, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायला हवेत. असे झाल्यास कोणी देशाकडे वाकड्या नजरेने पाहणार नाहीत, असेही त्यावेळी माध्यमांशी बोलताना राज्यपाल म्हणाले होते.
स्वतःला जाणता राजा म्हणवून घेणारे आणि महाराजांचे कैवारी समजणारे कधी कुठला गड-किल्ला चढल्याचे ऐकिवात नाही. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला तेव्हा रस्त्यावर न उतरणारे, नव्हे साधा निषेध न नोंदवणारे आता रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत आहेत. मुख्यमंत्र्यांना या कारणावरून राजीनामा देण्याचे आव्हान देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानादेखील दोन वेळा राज्यपालांच्या वक्तव्यावरून असाच गदारोळ महाविकास आघाडीने केला होता. तेव्हा नुसता गदारोळ करण्यापेक्षा राज्याचे प्रमुख असणार्या अशा राज्यपालांच्या हाताखाली काम करणार नाही, असे सांगून ठाकरेंनी सत्तेला लाथ का मारली नव्हती? स्वतः खुर्चीला चिकटून बसणार आणि लोकांचा राजीनामा मागणार? कोणत्या हक्काने विद्यमान मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हे मागत आहेत? संवैधानिक पदाची प्रतिष्ठा राखण्याचा सल्ला देणार्या ठाकरेंना त्या पदाचा गौरव ठेवता आला का? गेली अडीच वर्षे या पदाचा किती गौरव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठेवला, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ‘मुख्यमंत्र्याला कानफटात मारलं असतं’ म्हटलं म्हणून, अदखलपात्र गुन्ह्यात केंद्रीय मंत्र्याला अटक करणार्या या ठाकरे आणि मंडळींवर आता राज्यपालांबद्दल वापरल्या जाणार्या भाषेसाठी कुठला गुन्हा दाखल केला पाहिजे? लोकशाहीच्या नावाखाली हे राजकारणी आपली पोळी शेकत असून महाराजांच्या नावाचा गैरवापर करीत असल्याचे उदयनराजेंनी म्हटले; ते खरं आहे.
खर्या अर्थानं सत्तेत बसल्यानंतर महाराजांचा सपशेल विसर पडलेल्या या ठाकरे आणि सातत्याने महाराजांचा अपमान करीत आलेल्या शरद पवार आणि त्यांच्या पिलावळींना आता यावर तसूभरही बोलण्याचा अधिकार उरलेला नाही. महाराष्ट्राला सगळं कळतं, राजकीय स्वार्थ आणि स्वार्थासाठी वेळोवेळी बदललेल्या भूमिकादेखील कळतात. महाराष्ट्र थंड नाही, पण तो कुणाच्या उचकावण्याने उचकत नाही. कोणाच्याही भूलथापांना बळी पडणारा नाही. महाराष्ट्र पेटून उठेल आणि महाराजांच्या नावाचा गैरवापर करणार्या अशा लबाडांची लवकरच २०१९पेक्षाही दुर्गती करेल, यात शंका नाही.