श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारीपासून साखर, खाद्यतेल, चनाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या ६ वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिकाधारकांना देण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कु़टुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या सहा वस्तूंचा समावेश असलेला संच “आनंदाचा शिधा” म्हणून वितरित करण्यात येणार आहे. या वितरणाकरीता येणाऱ्या 549.86 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहिनांना एक लाख रुपयांचे अनुदान
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाच्या अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
केंद्र व राज्य शासनाने सन २०२४पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटूंबांना घरे उपलब्ध करुन देण्याची महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. तथापि, या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन, राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे.
या योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु, बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटूंबांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सद्य:स्थितीत जागांच्या किंमती पाहता, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान १ लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.